33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रमनुकुमार श्रीवास्तव कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकता, स्थितप्रज्ञता, सहनशीलता,अन् संयमाची शांत मूर्ती..!

मनुकुमार श्रीवास्तव कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकता, स्थितप्रज्ञता, सहनशीलता,अन् संयमाची शांत मूर्ती..!

शांत, संयमी अन् धीरगंभीर स्वभाव पण चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असणारे, कर्तव्यनिष्ठता, प्रामाणिकता, सहनशीलता, स्थितप्रज्ञता आणि ध्येयनिष्ठता कायम जपणारे कलासक्त व सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व लाभलेले राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव ३७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सेवानिवृत्त झाले.

अजित देशमुख :

मनुकुमार श्रीवास्तव सरांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागात मी सुमारे अडीच वर्षे काम केले. त्यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबरोबर कार्यरत असल्याने दादांच्या कामांच्या माध्यमातून सरांशी जुजबी परिचय होता. सरांच्या कामाच्या प्रचंड व्यासंगाबाबत खूप ऐकलं होतं.

प्रत्यक्ष काम करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आणि कंगोरे जवळून अनुभवायला मिळाले. कामावरील त्यांच्या जाज्वल्य निष्ठेबरोबर त्यांच्यातील सुसंस्कृत, नम्र व्यक्ती मला अधिकच भावली. सचिव किंवा त्यापेक्षा उच्च पदावर काम करायचं म्हणजे संपूर्ण राज्यासाठी प्रशासकीय विभागाचे नेतृत्व करण्याचा योग असतो. विभागाचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना वेळप्रसंगी निर्दयी, कठोर व्हावे लागते. पण सरांनी आपल्या कृतीतून हा सिद्धांत फोल ठरवला आहे.

ना तेरी शान कम होती, ना तेरा रुतबा घटा होता जो घुस्से मे कहा तूने जरा हसकर कहा होता

श्रीवास्तव सरांनी अधिकाऱ्यांसाठी नेहमीच आपल्या भाषणातून हा संदेश दिलेला आहे. परंतु केवळ सांगण्यापुरताच नाही तर आजीवन सरांनी त्याचं अत्यंत काटेकोरपणे पालन केले आहे.

परिस्थिती कितीही गंभीर असो, बिकट असो, कसोटीची असो. सरांनी धीरोदात्तपणें आपली जबाबदारी स्वीकारून, आपल्या तत्वांशी प्रतारणा न करता स्थितप्रज्ञतेने, संयम ढळू न देता शांतपणे सर व्यक्ती किंवा प्रसंगांना सामोरे गेलेले आहेत. परिस्थिती कशीही असो, कोणीही अधिकारी किंवा व्यक्ती त्यांच्या दालनातून कधीही अपमानित होऊन बाहेर पडलेला नाही ही सरांच्या उदात्तत्तेची ग्वाही देणारी बाजू आहे.

सनदी सेवेच्या पूर्वार्धातच त्यांनी धुळे जिल्हा परिषदेत धर्म भास्कर वाघाचा कोट्यावधींचा घोटाळा उघडकीस आणला. आपल्या कामाचा दर्जा त्यांनी सेवेच्या उत्तरोत्तर काळात उंचावतच नेला. कोल्हापूर जिल्हाधिकारी, नागपूर सुधार प्रन्यास मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, मंत्रालयात नगर विकास, महसूल-वने,गृह खात्यांचे अशा अनेक महाकाय व संवेदनशील खात्यांचे सचिव म्हणून काम आणि शेवटी मुख्य सचिव म्हणून काम करताना त्यांनी आपले काम चोख बजावून पदांची गरिमाच वाढवलेली आहे.

अक्षरशः पहाटे तीन चार वाजेपर्यंत काम करून पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत कामाला रुजू होण्याचे एक ना अनेक दिवसांचे विक्रम सरांच्या नावावर आहेत. विशेष म्हणजे सकाळचे ताजेतवाने, उत्साही, प्रसन्नमुद्रेचे साहेब, रात्री- पहाटेचे साहेब आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळचे साहेब जसेच्या तसे. मी तरी सरांना कधी आळसाची जांभई देताना पाहिलेले नाही.

अक्षरशः नियमितपणे, १५-१५ तास अव्याहतपणे काम करण्याची सरांची क्षमता त्यांना लाभलेली दैवी देणगीच आहे. कामांचा कितीही व्याप असो, समोर आलेला प्रत्येक कागद अत्यंत बारकाईने वाचून त्यात सुधारणा सह सकारात्मक मूल्यवृद्धी करूनच तो कागद- धारिका पुढे सरकवत असत. सरांचा मराठी शब्दसंग्रह तर अचंबित करणारा आहे. संकल्पित, परामर्श असे एक ना अनेक शब्द हे सरांनी मंत्रालयाच्या कार्यप्रणालीला देणगी दिलेले आहेत.

सरांनी नियमित कामकाजाचा दर्जा उंचावण्याबरोबरच सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी संबंधित विभागाचे कायदे- नियम यात अभ्यासपूर्ण सुधारणा केल्या. सरांच्या मार्गदर्शनातून आणि सहभागातून तयार झालेले शासन निर्णय परिपत्रके न्यायालयीन शपथपत्रे किंवा इत्यादी कामकाज साहित्य हे सर्वार्थाने परिपूर्ण आणि शब्दसमृद्धीने नटलेले असत.

मनुकुमार श्रीवास्तव हे एक कलासक्त व्यक्तिमत्व आहे. विशेषतः ते मुकेशच्या गाण्यांचे दर्दी आहेत. कामाचा व्याप आटोपून मध्यरात्री – पहाटेपर्यंत नियमितपणे संगीत साधनेसाठी वेळ देण्याची त्यांची कसरत खरोखरच थक्क करणारी आहे. किंबहुना सरांना अव्याहतपणे कार्यरत राहण्याची ऊर्जा आणि शक्ती यातूनच मिळत असावी. कितीही घाई गडबड असो, कितीही बिकट परिस्थिती, असो शांत-स्थितप्रज्ञ राहून काम करणे हा सरांचा अतिविशेष स्थायीभाव आहे. त्याचे उत्तम दर्शन आम्हाला अनेक प्रसंगांतून वेळोवेळी झाले. महसूल विभागाच्या मंत्री महोदयांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनासंदर्भात विभागाने काय कार्यवाही केली याचा आढावा घेण्यासाठी आश्वासन समितीची बैठक होत असते.

एकदा एका आमदार महोदयांनी कदाचित त्यांचे हितसंबंध दुखावले गेले असल्यामुळे जाणवण्या इतपत सरांना आश्वासनाच्या मुद्द्यावरून मुद्दाम धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. सरांच्या संयमाची फार मोठी कसोटी त्यावेळी लागली होती. परंतु सरांनी अत्यंत शांतपणे उत्तरे दिली. सरांची थोडी नामुष्की झाली ही वस्तुस्थिती होती. सरांच्या सहनशीलता आणि क्षमाशीलतेची आणि स्थितप्रज्ञतेची प्रचिती त्यावेळी आम्हाला अधिक प्रकर्षाने आली. आपल्या अधिनस्त असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबर सरांचे नाते हे अत्यंत आपुलकीचे आणि औपचारिकतेच्या पलीकडचे होते.

 

जयंत पाटलांच्या तोंडात साखर पडो ; मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांचे मार्मिक उत्तर

संजय राऊतला मख्यमंत्री व्हायचे होते पण…एकेरी उल्लेख करीत नितेश राणेंचा राऊतांवर हल्ला 

पुण्यातील “महाराष्ट्र पोलीस मेगासिटी” गृहप्रकल्पात ५२५ कोटींचा घोटाळा, ७ हजार पोलिसांची फसवणूक..! 

आदरणीय सरांनी सनदी अधिकारी म्हणून शासनाला दिलेल्या भरीव योगदानाची जाणीव ठेवून, त्यांच्यातील प्रगल्भ विद्वत्तेचा ठेवा उपयोगात आणण्यासाठी शासनाने त्यांची सेवा निवृत्तीनंतरही सेवा हमी कायद्याच्या आयुक्तपदी नियुक्ती केलेली आहे. सरांना सेवानिवृत्ती नंतरचे जीवन आणि व ही आयुक्त पदाची नवीन इनिंग ही सुख, आरोग्य आणि भरभराटीची जावो याच त्यांना हृदयपूर्वक शुभेच्छा…!

(लेखक मंत्रालयात उपसचिव पदावर कार्यरत आहेत.)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी