30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रभारतीय कांदा गायब : श्रीलंका, नेपाळमधील जनतेच्या डोळ्यात पाणी

भारतीय कांदा गायब : श्रीलंका, नेपाळमधील जनतेच्या डोळ्यात पाणी

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : कांद्याचा दर वाढल्याने नेपाळ आणि श्रीलंकेतील जनतेच्या डोळ्यातून आता पाणी येऊ लागले आहे. भारताने कांदा निर्यातीवर बंदी घातली असल्याने नेपाळ व श्रीलंकेमध्ये कांद्याचा तुटवडा भासू लागला आहे. परिणामी या दोन्ही देशांतील जनतेची बिकट स्थिती झाली आहे.

काळमांडू ते कोलंबोपर्यंत कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने या दोन्ही देशांमध्ये कांद्याच्या दरांत दुपटीने वाढ झाली आहे. श्रीलंकेत प्रती किलो तब्बल 280 ते 300 श्रीलंकन रुपयांमध्ये (भारतीय चलनानुसार अंदाजे 150 रुपये) कांद्याचा दर वाढला आहे. बांगलादेशसारख्या देशाने अन्य देशांतून कांदा आयात करायला सुरूवात केली आहे. म्यानमार, तुर्कस्थान, इजिप्त, चीन इत्यादी देशांतून बांगलादेशने कांदा आयात केला आहे. अन्य देशही तसा प्रयत्न करीत आहेत. पण भारताच्या तुलनेत अन्य देशांतून पुरेशा प्रमाणात कांदा प्राप्त होत नाही. त्यामुळे अनेक देशांना दरवाढीचा फटका बसला आहे. विशेषतः भारतावर अवलंबून असलेल्या श्रीलंका, नेपाळ या देशांची बिकट स्थिती झाली आहे. चिकन, बिर्याणी किंवा सांबर अशा सगळ्याच खाद्य पदार्थांमध्ये कांदा नितांत आवश्यक आहे.

गेल्या वर्षी भारताने 2.2 दक्षलक्ष टन कांदा निर्यात केला होता. पण भारतात कांद्याचे उत्पादन घसरले. कांद्याचे दर वाढू नयेत म्हणून केंद्र सरकारने यंदा कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे.

शेतकऱ्यांची नाराजी

केंद्रातील भाजप सरकारने कांदा निर्यातीवर घातलेली बंदी चुकीची आहे. भारतातील लोकांना स्वस्तात कांदा उपलब्ध व्हावा, दर आटोक्यात राहावेत म्हणून भारतात कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. यावर भारतातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना परदेशात कांदा पाठविल्याने चार पैसे वाढवून मिळणार असतील तर सरकारच्या पोटात का दुखते अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे. शहरांतील मध्यमवर्गीयांचे चोचले पुरविण्याचा ठेका शेतकऱ्यांनीच घ्यावा काय असा सवाल करतानाच मध्यमवर्गीयांच्या दबावामुळे भाजप सरकार शेतमालाचा भाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करीत असते. पण सरकारच्या या भूमिकेमुळे शेतकरी देशोधडीला लागत चालला आहे. शेतमालाला चार पैसे जास्त मिळाले तर शेतकऱ्याचे जीवनमान उंचावले जाणार आहे. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालून सरकार शेतकऱ्यांच्या पोटावर लाथ मारत असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी