32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रRural Maharashtra : धनगर समाजाच्या देवीची यात्रा शेकडो वर्षानंतर रद्द !

Rural Maharashtra : धनगर समाजाच्या देवीची यात्रा शेकडो वर्षानंतर रद्द !

बिपीन जगताप 

गुढीपाडव्याच्या गुढ्या उतरल्या की महाराष्ट्राच्या गावागावात ( Rural Maharashtra ) सुरु होतात यात्रा जत्रा …! भिवाई देवीच्या यात्रेचाही आजचा दिवस. दरवर्षी मोठी धामधूम असते. यंदा मात्र ‘कोरोना’मुळे ही यात्रा रद्द झाली. 

अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा नकोसा वाटतो. पण जशी उन्हं तापू लागतात तशी गावाकडची ( Rural Maharashtra ) मंडळी बाभळीच्या वडाच्या झाडाच्या सावलीखाली बसली की यात्रा जत्रेच्या चर्चा रंगात येतात.

आमच्या गावाची ( Rural Maharashtra ) जत्रा पण तशीच चैत्र पोर्णीमेच्या दुसऱ्या दिवशी येणारी. नदीकाठी असलेले कांबळेश्वर ( Rural Maharashtra ) हे टिपीकल गाव…गावाच्या दक्षिणेला वाहणारी निरा नदी ..नदीकाठी दोन्ही तिरावर घुमटा सारखं दिसणारं भिवाई देवीच मंदीर अनेक लोकांच श्रद्धास्थान आहे…..!

आमच्या लहानपणी भिवाईची जत्रा आम्हाला फारच अप्रुप आसायची. दोन तीन दिवस चालणारी ही जत्रा मनात आजही घर करुन आहे.

जत्रेला आठ दिवस असताना सगळी शेणामातीची घर सारवली जायची. घराघरातल्या गोधड्या धुण्याची लगबग सगळ्या नदीवर असायची. तहान भुक हरवून जायची. घरोघरच्या भिंतीना मातीने सारवलेले असल्याने घरात पहिल्या पावसाचा सुंगध असायचा.

जत्रा आता अगदी गावाच्या ( Rural Maharashtra ) वेशीपर्यंत आल्याचा सांगावा हा घरातला वास मनाला सांगायचा. जत्रेची वातावरण निर्मीती होत असे. सगंळ गाव ( Rural Maharashtra ) नव्या नवरीगत नटायचं…!

वर्षभर गावाला न येणाऱ्या भुमीपुत्रांनाही या जत्रेची आंतरीक ओढ असायची. प्रत्येकाच्या घरात पाहुणे रावळी यायची. पुण्या मुंबईकडे असणारे सगळे या जत्रेला यायचे. नवी कपडे… नवी माणसं गावात दिसायची. कुणाच्या घरात किती पाहुणे आलेत याच सुद्धा खूप कौतुक असायचं….!

भिवाई देवीची जत्रा धनगर समाजाची.. हजारो लोक या निमीत्ताने चैत्र पोर्णीमेला गावात यायची. भाविकांच्या येण्या- जाण्याची सोय व्हावी म्हणून एस टी महामंडळ विशेष गाड्या सोडायंच…!

पण बहुतेक भावीक बैलगाड्यातूनच यायचं. आम्ही सगळी पोरं त्यावेळी त्या बैलांच्या घुगरांच्या आवाजानं बेभान व्हायचो. यंदा किती जत्रा भरेल यासाठी गावात ( Rural Maharashtra ) येणाऱ्या गाड्या आम्ही मोजायचो. पण अंदाज बांधण अशक्य आसायचं.

पोर्णिमेचा चंद्र आभाळात खुपच मनमोहक दिसायचा. उकाड्यान हैराण झालेली लोक अंगणात आभाळ बघत झोपायची. या जत्रेच्या दिवसात आम्हाला खळखळ चालणाऱ्या बैलगाड्या या चंद्रकोरात दिसायच्या…शितल चांदोमामा मनाला आनंद देऊन जायाचा..!

नदीच्या दुसऱ्या काठावर जत्रा भरायची. पालं ठोकली जायची. कुंकु हळदीची, बांगड्या, खेळण्याची, भेळ हाँटेल अशी अनेक दुकान लागायची. पाळण्यात बसताना आणि लाकडी घोड्याची गोल गोल फिरणारी खेळ जत्रेला रुपडं द्यायचे. सारखं नदीकडं येऊन किती पालं, दुकानं आल्यात ती आम्ही मोजून जायचो.

जत्रेच्या दिवशी गावात ( Rural Maharashtra ) मारुती मंदीरात मारुती जन्माची भजन सुरु होत असे, आणि नदीकाठावर भाविकांच्या उत्साहाला उधाण आलेले असायचे. सगळं गाव ( Rural Maharashtra ) पै पाहुण्यांनी आणि जत्रेकरुंनी भरलेले असायचं.

नदीच्या वाळवंटात जत्रेकरुंची पालं पडलेली असायची. देवीला कापलेल्या बकऱ्याचं मटन मोठ्या मोठ्या पातेल्यात शिजायचं… सगळा वास गावभर पसरलेला असायचा…!

बंधाऱ्यावरुन मुंगी शिरायलाही जागा नसायची. गावातली तरणी पोरं सारी जत्रा न्याहाळत फिरायची. कलिंगडाची लाल फोड आणि लाल पिवळं गारेगार (आईस्क्रीम) लहान पोर आवडीनं खायची.

भिवाई देवीच्या डोहात नवसाची बकरी पडायची…लाकडाच्या परड्या चालायच्या.. ढोल..पिपाण्या..झांज …रात्रभर वाजत असायच्या. भिवाईच्या नावान चांगभल…..धूळोबाच्या नावान चांगभलंच्या आरोळ्या आसमंतात भिडायच्या….. धनगरी ओव्या, अन् गीतांनी फेर धरलेला असायचा. जत्रा शिगेला पोहचलेली असायची.

माहेरवाशीणी आपल्या पोरांना भिवाईच्या पायावर घालायच्या… सुखात ठेव म्हणत आशिर्वाद घ्यायच्या.

जत्रेचा दिवस जसा जसा कलायचा तसा उत्साह शिगेला पोहचायचा.. अर्ध्या रात्री मग जत्रा फुटायची. घुगरांच्या गाड्या जशा खळखळ वाजत यायच्या तशाच खळखळत निघायच्या देखील… दोन दिवसांनी गावातली जत्रेच्या निमीत्ताने आलेली पै पाहुणेही निघायची. यावेळी मन मात्र भरुन यायचं… भरलेले गाव रीत होतं जायाचं…. मागल्या काही दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात आलेला हा प्रसन्न वसंत असा निघून जाताना हुरहुर लावायचा….!

आजही गावात भिवाईची जत्रा भरते. पण आमच्या लहानपणीची ही जत्रा अजूनही मनाचा कोपरा हळवा करते. गावाची, मातीची नात्याची ओढ लावते.

चैत्र पोर्णिमेनुसार दुसऱ्या दिवशी ही यात्रा दरवर्षी आयोजित केली. त्यानुसार आज यात्रेचा दिवस. पण ‘कोरोना’मुळे ही यात्रा रद्द झाली.  भिवाई म्हणजे सात बहिणी. त्यांचे ठिकाणी आमच्या कांबळेश्वरमध्ये आहे. भिवाईचा भाऊ धुळदेव. धुळदेव देवस्थान फलटणजवळ आहे. आमच्यापासून साधारण ३० किलोमीटर अंतरावर. भिवाईच्या यात्रेनंतर धुळदेव यात्रा साधारण तिसऱ्या दिवशी सुरू होते. यंदा भिवाईबरोबरच धुळदेव यात्राही रद्द झाली.  दरवर्षी लोकांच्या गर्दीने फुललेला भिवाई धुळदेव मंदीरांचा परिसर आज मात्र पुरता सामसूम असेल. १०० वर्षांहून चालत आलेली ही परंपरा पहिल्यांदाच खंडीत झाली. पण भिवाई जत्रेच्या आठवणी मात्र दाटून आल्या.

(लेखक महाराष्ट्र शासनामध्ये अधिकारी आहेत)

हे सुद्धा वाचा

Covid19 अबब ! धर्मांध, खोटे मेसेज पाठविल्याप्रकरणी १३२ गुन्हे दाखल, ३५ जणांना अटक

Covid19 : काँग्रसचे भाजपला आवाहन; हात जोडतो पण जातीयवादी राजकारण थांबवा

Narendra Modi यांचे संतापजनक आवाहन

पाकिस्तानातील व्हिडीओ खपवला दिल्लीतील तबलिगींच्या नावावर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी