30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeआरोग्यNarendra Modi यांचे संतापजनक आवाहन

Narendra Modi यांचे संतापजनक आवाहन

संदीप सारंग

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी काल संताप आणणारे विधान केले. यापूर्वी ज्या ज्या वेळी देशावर समरप्रसंग ओढविला त्या त्या वेळी देशातल्या माता – भगिनींनी आपले दागिने दान केले, हे ते विधान ! हे विधान करून ते आताच्या आणीबाणीच्या परिस्थितीत महिलांनी आपले दागिने दान करावेत असे सुचवित आहेत. त्यांचे हे आवाहन सर्वसामान्य जनतेला त्याग करायला उद्युक्त करणारे असून म्हणूनच चीड आणणारे आहे.

देशावर संकट ओढविले की त्याग कुणी करायचा, बलिदान कुणी द्यायचे, मरायचे कुणी, हे आपल्या देशात ठरलेले आहे. ज्या सर्वसामान्य महिलांनी आयुष्यभर कष्ट करून, घाम गाळून, काटकसर करून अडीअडचणीला उपयोगी येतील म्हणून दोन चार दागिने बनवून ठेवले आहेत, ते मोडावेत आणि देशाला मदत करावी ही मोदींची ( Narendra Modi ) अपेक्षा आहे. वाह् मोदीजी ! तुम्ही गरीबांच्याच देशभक्तीची अशी परीक्षा का घेत आहात ?

श्रीमंतांना असे आवाहन का करत नाहीत ? एखादा उद्योग विका आणि राष्ट्राला मदत करा असे का सांगत नाही एखाद्या गडगंज उद्योजकाला ? कोरोनाच्या या आपत्तीत टाटा, अझीम प्रेमजी यांच्यासारख्या सामाजिक उत्तरदायित्त्व मानणार्‍या ज्या उद्योगपतींनी आर्थिक सहकार्याचा हात पुढे केला त्यांचे स्वागत आणि अभिनंदनच केले पाहिजे. पण असे किती माईचे लाल आहेत ?

उच्चभ्रू – उच्चवर्णीय समाजातले बहुसंख्य लोक, जे कायम स्वार्थी भूमिकेतून प्रत्येक संधीकडे आणि प्रत्येक संकटाकडे पाहतात त्यांचे काय ? ते कधी आपले दागिने आणि आपली संपत्ती दान करणार आहेत आपल्या प्रिय राष्ट्रासाठी ? देशातल्या तमाम शेटजी – भटजींना नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) असे आवाहन करतील काय ? आणि केले तरी हे लोक त्यांना दाद देतील काय ?

मोदीजींनी ( Narendra Modi ) केलेल्या आवाहनाच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपर्‍यात साचून राहिलेल्या एका संपत्तीकडे निर्देश करणे औचित्याचे ठरेल. आपल्या देशात हजारो मंदिरं आणि देवस्थानं आहेत. त्यांच्याकडे अब्जावधी रुपयांचे दाग – दागिने, सोने – नाणे आणि अब्जावधी रुपयांची रोख रक्कम पडून आहे. हे सगळे धन अक्षरश: सडत – कुजत पडले आहे.

ही संपत्ती कशासाठी कुजवत ठेवली आहे ? त्याचा उपयोग कुणासाठी होतो ? खरं म्हणजे, ही सगळी संपत्ती सामान्य जनतेची आणि सामान्य भाविकांची आहे. त्यांनी ती या देवांना श्रद्धाभावनेने अर्पण केली आहे. भाविकांनी हे सारे दान देवाला विनाकारण दिलेले नसून त्यांच्या कडून काहीएक अपेक्षा ठेवून त्यांनी ते देवाच्या देवालयात सुपूर्द केले आहे.

देवापुढे नतमस्तक होताना ‘देवा, आम्हाला सुखी ठेव, आमचे रक्षण कर, संकटातून आम्हाला वाचव,’ ही आर्त मागणी करत त्यांनी हे दान देवाच्या चरणी वाहिलेले आहे. याचा अर्थ, ‘देव आपले रक्षण करील,’ या खात्रीतूनच सर्वसामान्य जनता हे दान देत असते, हे स्पष्ट आहे. आणि सर्व मंदिरांचे सर्व पुजारीही हे दान भाविकांकडून घेताना त्यांना ‘देव तुमचे रक्षण करील’ याची हमी देत असतात. मग आता भाविकांचे आणि जनतेचे प्रत्यक्ष रक्षण करण्याची वेळ आलेली असताना त्या कार्यात देवांनी आणि देवाच्या पुजार्‍यांनी पुढाकार घ्यायला नको का?

देवांची क्षमता सिद्ध करण्याचा क्षण आलेला असताना भाविकांनी त्यांच्या स्वत:च्या रक्षणासाठी दिलेली संपत्ती त्यांना परत देण्याऐवजी या देवस्थानांचे मालक, ट्रस्टी, पुजारी हे सगळेजण या संपत्तीला आपली स्वत:चीच संपत्ती का समजत आहेत ? सामान्य लोकांनी त्यांचे दान देताना या पुजार्‍यांना देवाचे प्रतिनिधी मानलेले असते. परंतु हे विसरून आता हे पुजारी आणि ट्रस्टी या संपत्तीवरचा हक्क सोडायला तयार का होत नाहीत ?

संकटकाळी सगळे देव मैदान सोडून पळाले, असे संजय राऊतांनी लिहिल्यावर अनेकांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. या मंडळींनी आता त्या मिरच्या बाजूला काढून ‘देव मैदान सोडून पळालेले नाहीत’ हे सिद्ध करण्यासाठी पुढे आले पाहिजे. देवाच्या वतीने दान घ्यायला तुम्ही पुढे येता ना, आता देवाच्या वतीने दान द्यायलाही तुम्ही पुढे आले पाहिजे आणि अब्जावधी रुपयांचे दागिने आणि अब्जावधी रुपयाची संपत्ती सरकारजमा केली पाहिजे.

देश संकटात आहे. देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आहे, देशातली जनता चिंतित – संभ्रमित – भयभीत आहे. राज्यकर्ते हतबल अवस्थेत आहेत. अशा परिस्थितीत तरी देव मदतीला येणार आहे की नाही? अशा परिस्थितीत तरी जनतेने देवाकडे मोठ्या विश्वासाने ठेवलेले तारण जनतेला तारणार आहे की नाही ? रक्षणासाठी कामी येईल म्हणून देवाच्या दारी ठेवलेली रक्कम आता मदतीला येणार नाही तर कधी येणार? का जनता मेल्यावर देव जागे होणार आहेत ?

नरेंद्र मोदीजी ( Narendra Modi ), देश जगतोय की मरतोय अशी अभूतपूर्व आपत्ती उद्भवली आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत जे जे देशासाठी आवश्यक असते ते ते ताब्यात घेण्याचा सरकारला अधिकार असतो. तुम्ही ताबडतोब मंदिरातली संपत्ती ताब्यात घ्या आणि ताबडतोब देशभरातली आरोग्यव्यवस्था सुसज्ज करा.

आज डॉक्टरांकडे / नर्सेसकडे आवश्यक साधनं नाहीत. उद्या डॉक्टर आणि नर्सेसच या रोगाच्या शिकार झाल्या तर किती भयंकर स्थिती निर्माण होईल, याची कल्पनाही करवत नाही. मोदीजी ( Narendra Modi ), तुमचे ऐतिहासिक नेतृत्त्व सिद्ध करण्याची तुम्हाला मिळालेली ही ऐतिहासिक संधी आहे. ती साधा आणि एकसे तीस करोड लोकांना वाचवा. ‘मेरे प्यारे देसवासियो’, अशी साद घालण्यासाठी समोर देसवाशीय शिल्लक राहतील, हे पाहा.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Covid19 : सुप्रिया सुळेंचा नरेंद्र मोदींना सवाल : महाराष्ट्राचा फंड घेतलात, पण तो महाराष्ट्रासाठीच वापरणार का ?

Coronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र

JanataCurfew : नरेंद्र मोदींच्या आवाहनाचा उलटाच परिणाम, टाळ्या – थाळ्या वाजविण्यासाठी लोकांनी केली गर्दी

Coronavirus : मोदी समर्थकांचा कळस : शिवराय, महात्मा गांधीं, डॉ. आंबेडकरांच्या कार्यासोबत ‘मेणबत्त्या इव्हेन्ट’ची तुलना

कोरोनाबद्दल WHO ने प्रसिद्ध केलेली माहिती

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी