29 C
Mumbai
Tuesday, May 14, 2024
Homeमहाराष्ट्रतुम्ही भिजण्यापेक्षा शेतकऱ्याची जमीन भिजवा, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांवर...

तुम्ही भिजण्यापेक्षा शेतकऱ्याची जमीन भिजवा, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला

टीम लय भारी

मुंबई :- सध्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार बहरात आला आहे. भाजप तसेच राष्ट्रवादीचे बडे नेते आपापल्या उमेदवाराच्या विजयासाठी जीवाचे रान करत आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या रोज येथे सभा होत आहेत. पंढरपूर येथील भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे भर पावसात भिजले आणि सातारामधील शरद पवार यांच्या पावसातील सभेची आठवण पंढरपूरकरांच्या डोळ्यासमोर तरळली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पावसात भिजण्यापेक्षा ३५ गावांचा पाण्याच्या प्रश्न मिटवावा. तुम्ही भिजण्यापेक्षा शेतकऱ्याची जमीन भिजवा, अशा शब्दात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने बोराळे गावात भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी खोत उपस्थित होते.

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजप विकासाच्या मुद्द्यांवरुन लढत आहे. अजित पावर यांना पोटनिवडणुकीत काही देणेघेणे नाही. त्यांची नजर विठ्ठल सहकारी कारखान्यावर आहे. पवार घराणे राज्यातील सहकार चळवळ मोडीत काढत आहे. अजित पवार हे गल्लोगल्ली फिरत आहेत, अशा शब्दात सदाभाऊ खोतांनी उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल चढवला.

जयंत पाटलांच्या पावसातील सभेवरुन घणाघात

जयंत पाटील यांनी रविवारी भर पावसात सभा दणाणून सोडली. राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ पंढरपूर मतदारसंघात जयंत पाटलांनी सभा घेतली. पावसाच्या व्यत्ययानंतरही जयंत पाटलांनी भाषण सुरु ठेवल्याचे पाहून उपस्थितांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झाली.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पावसात भिजण्यापेक्षा ३५ गावांचा पाण्याच्या प्रश्न मिटवावा. तुम्ही भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवा, अशी मागणी खोत यांनी केली. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीक कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली, असेही खोत म्हणाले.

निवडणुकीच्या आधी अजित पवार सातबारा कोरा करणार, असे सांगत होते. नाही केले तर पवार आडनाव लावणार नाही, असेही म्हणाल्याची आठवण सदाभाऊ खोत यांनी करुन दिली. वीज बिलाच्या मुद्द्यावर बोलताना महाविकास आघाडी सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपले असल्याचा घणाघात खोतांनी केला.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर मंगळवेढा पंढरपूर विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यानंतर होणारी पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादीने भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालकेंना तिकीट दिले आहे. तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी