28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
HomeमुंबईCoronaeffect : मुंबईतील रुग्णालयातून अर्धा डझन मृतदेह गायब

Coronaeffect : मुंबईतील रुग्णालयातून अर्धा डझन मृतदेह गायब

टीम लय भारी

मुंबई : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळं (Coronaeffect) आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत असून त्यातून अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत. गेल्या काही दिवसांत मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयांतून कोरोनाबाधितांचे सहा मृतदेह गायब झाले आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तसा दावा केला आहे.

किरीट सोमय्या यांनी एक सविस्तर ट्विट करून गायब झालेल्या मृतदेहांची नावासह माहिती दिली आहे. तसंच, हे मृतदेह कोणत्या रुग्णालयांतून गायब झाले याचीही माहिती दिली आहे. या तपशीलासह सोमय्या यांनी आज आरोग्यमंत्री राजेश टोपे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना एक पत्र लिहिलं आहे. ज्यांचे मृतदेह रुग्णालयातून गायब होत आहेत, त्यांच्या कुटुंबीयांच्या मन:स्थितीचा विचार करून सरकारनं योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

सोमय्या यांनी पत्रात केलेल्या उल्लेखानुसार, केईएम रुग्णालयातून सुधाकर खाडे यांचा मृतदेह गायब झाला होता. घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयातून मेहराज शेख यांचा तर कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातून विठ्ठल मोरे यांचा मृतदेह गायब झाला होता. तो आज बोरीवली रेल्वे स्थानकावर सापडला. नायर रुग्णालयातून मधुकर पवार यांचा तर जोगेश्वरी ट्रॉमा हॉस्पिटलमधून राकेश शर्मा यांचा मृतदेह गायब झाला होता. तर, सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयानं ग्यांतीदेवी विश्वकर्मा यांचा मृतदेह कुटुंबीयांकडं देण्याच्या आधीच त्यावर अंत्यसंस्कार केले, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. ‘हे काय चाललं आहे,’ असा प्रश्नही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारला केला आहे.

महाराष्ट्राला पडलेला कोरोनाचा विळखा दिवसागणिक घट्ट होत असून बाधितांची संख्या ८८ हजारांच्याही पुढं गेली आहे. आतापर्यंत ४० हजारांहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून त्यांना रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, बरे होणा-यांच्या तुलनेत बाधित रुग्णांचं प्रमाण अधिक असल्यानं चिंता वाढत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी