30 C
Mumbai
Sunday, June 30, 2024
Homeराजकीयअहमद पटेल निधन : काँग्रेसची अविरत सेवा करूनही महत्वकांक्षा नसेलला नेता हरपला

अहमद पटेल निधन : काँग्रेसची अविरत सेवा करूनही महत्वकांक्षा नसेलला नेता हरपला

टीम लय भारी

मुंबई : सोनिया गांधी यांचे अत्यंत विश्वासू असलेले खासदार अहमद पटेल यांचे आज पहाटे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते ( Ahmed Patel passed away ).

त्यांचे पुत्र फैजल पटेल यांनी ट्विट करून अहमद पटेल यांच्या निधनाची माहिती दिली आहे. पटेल यांना ‘कोरोना’ची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना गुरगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानात ‘मल्टी ऑर्गन फेल्युअर’चीही ( महत्वाचे अवयव निकामी होणे ) समस्या उद्भवली होती. त्यामुळे त्यांचे पहाटे 3.30 वाजता निधन झाले.

साधारण 20 वर्षांपूर्वी ‘काँग्रेस’ची धुरा सोनिया गांधी यांच्याकडे आल्यानंतर त्यांचे प्रमुख राजकीय सल्लागार म्हणून पटेल यांनी काम केले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे केंद्रात 10 वर्षे सरकार होते. सोनिया गांधी यांचा करिश्मा आणि अहमद पटेल यांची रणनिती यामुळेच काँग्रेसला त्यावेळी सुगीचे दिवस आले. त्या पार्श्वभूमीवर अहमद पटेल यांचे काँग्रेसमध्ये प्रचंड महत्व होते.

अहमद पटेल यांच्या निधनाबद्दल सोनिया गांधी, राहूल गांधी यांच्यासह प्रमुख सर्व नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

अभ्यासू व जाणकार नेता हरपला : अशोक चव्हाण

खा. अहमद पटेल यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू, जाणकार आणि उत्तम संघटनात्मक कौशल्य असलेले समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

खा. अहमद पटेल हे राष्ट्रीय राजकारणातील अत्यंत प्रभावशाली नेते होते. एक मुत्सद्दी राजकारणी आणि पेचप्रसंगांमध्ये कौशल्याने तोडगा काढणारे नेते म्हणून परिचित होते. देशाच्या कानाकोपऱ्यातील राजकारण आणि काँग्रेसच्या संघटनेचा त्यांचा दांडगा अभ्यास होता.

आयुष्यभर त्यांनी काँग्रेस पक्षाची सेवा केली. मात्र कधीही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाळगली नाही. नेहमी व्यापक पक्षहित डोळ्यासमोर ठेवून काम केले.

मागील अनेक वर्षांपासून मी खा. अहमद पटेल यांच्याशी संपर्कात होतो. विविध कामानिमित्त त्यांच्या भेटीगाठी व विस्तृत चर्चा होत असत. आपल्या जबाबदारीविषयी त्यांची कटिबद्धता विलक्षण होती. साधेपणा, संयमी व मुद्देसूद संभाषण असे त्यांचे अनेक स्वभाव गुण प्रत्येकाच्या मनाला भावणारे होते.

पटेल यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांचे कार्य आणि त्यांचे व्यक्तिमत्व दीर्घकाळ प्रत्येकाच्या स्मरणात राहील, अशा भावना चव्हाण यांनी व्यक्त केल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी