30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयअजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नवी डोकेदुखी; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना...

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नवी डोकेदुखी; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अनुभवानुसार खाती पाहिजेत

छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम आदी जाणकार आमदारांची फौज घेऊन अजित पवार रविवारी सत्तेत दाखल झाले. त्यामुळे एकनाथ शिंदे गट एकीकडे नाराज असताना अजित पवार यांच्याबरोबर मंत्री पदाची शपथ घेतलेल्या तसेच कॉँग्रेस काळात मंत्री राहिलेल्या अनेक अनुभवी मंत्र्यांना अनुभवानुसार खाती पाहिजे आहेत. त्यासाठी राज्य मंत्री मंडळाचे खाते वाटप रखडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. अजित पवार यांच्या बरोबर आलेले अनेक आमदार हे शरद पवार यांचे खास विश्वासू म्हणून ओळखले जातात, ईडीच्या भितीने ते सरकारमध्ये सामील झाल्याचे बोलले जाते, असे असताना नवी डोकेदुखी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर उभी झाली आहे.

अजित पवार यांनी रविवारी राष्ट्रवादीत बंड करून फडणवीस यांचा हात पकडला. या घडामोडीला दोन दिवस उलटले असताना राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता खाते वाटपावरुन तिढा निर्माण झाला आहे. सरकारला शिंदे गटाच्या 40 हून अधिक आमदारांनी पाठिंबा दिला. पण अजून अनेक आमदार मंत्री पद मिळेल या आशेवर आहेत. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण होत नसल्याची चर्चा आहे. भाजप आणि शिंदे गटाकडे असलेली खाती काही मंत्री सोडायला तयार नाहीत. तर राष्ट्रवादीचे मंत्री अनुभवी असल्याने त्याचप्रमाणात खाती मिळावी अशी भूमिका राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आहे. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी पुन्हा एकदा तीनही पक्षात चर्चा होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे पालकमंत्री पदावरुनही तिढा निर्माण झाल्याची माहिती आहे.

दरम्यान अजित पवार यांनी 2 जुलै 2023 रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवला. अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये अजित पवार यांच्यासह 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाशी शपथ घेतली, त्यांना कोणती मंत्रिपदे मिळणार? याची चर्चा सुरु झाली. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदासह जलसंपदा हे खाते असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. अजित पवार यांच्या गटातील आमदारांना मिळणाऱ्या मंत्रिपदाबाबतची माहिती समोर आली आहे. अजित पवार-जलसंपदा, छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा, दिलीप वळसे पाटील – ऊर्जा, हसन मुश्रीफ – कौशल्य विकास, धनंजय मुंडे – गृहनिर्माण, आदिती तटकरे – महिला व बालकल्याण, संजय बनसोडे – पर्यटन, अनिल पाटील – लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, आणि धर्मरावबाबा आत्राम यांना आदिवासी कल्याण हे खाते मिळण्याची दाट शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा:

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; अनेक महत्त्वाचे निर्णय मंजूर

डॉ. अमोल कोल्हे देणार खासदारकीचा राजीनामा; शरद पवार यांच्या सोबतच राहणार असल्याचे स्पष्ट

राणादाचा शिंदे गटात प्रवेश, अनेक मराठी कलाकारही उपस्थित

दरम्यान मागील वर्षी शिंदे सरकारचा शपथविधी झाल्यापासून शिवसेना शिंदे गटातील नेते/ आमदार यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. अनेकांनी या संदर्भातील भावना माध्यमा बरोबर बोलून दाखवली होती. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील आणि भाजपामधील काही नेत्यांना संधी मिळेल, अशी चर्चा असताना अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांच्या/ आमदारांच्या इच्छेला सुरुंग लागला आहे. जी मंत्रिपदं शिवसेना आणि भाजपमधील आमदारांना मिळणार होती, ती आता अजित पवार यांच्या गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस गटाचे आमदार नाराज आहेत. उद्धव ठाकरे यांच्याशी पंगा घेऊन आम्ही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर येत करियर पणाला लावले, अशी दबक्या आवाजातील चर्चा शिंदे गटाच्या आमदारांनी सुरू केली आहे. तर दुसरीकडे सगळ्यात जास्त आमदार आमचे निवडून येऊनही फडणवीस अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे चोचले का पुरवत आहेत, असा सवाल केला जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी