31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयसत्तेतील 'शंभरी'नंतर अजितदादांचं मोठं विधान, यशवंतरावांचा वारसा जपणार, जनतेशी पत्रातून संवाद

सत्तेतील ‘शंभरी’नंतर अजितदादांचं मोठं विधान, यशवंतरावांचा वारसा जपणार, जनतेशी पत्रातून संवाद

भाजप आणि शिवसेना या दोन इंजिनच्या सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाले आणि त्याला आता १०० दिवस झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी राज्यातील जनतेशी पत्ररुपी संवाद साधला आहे. कामाच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणे हा माझा काम करण्याचा पिंड असे अजित पवार यांनी यातून सांगितले आहेत. त्याचवेळी रोजगार, समाजातील सर्व घटकांचे आर्थिक सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार, अशी ग्वाहीदेखील अजित पवारांनी या पत्रातून दिली आहे. तीन इंजिनचे महायुती सरकार आता राज्यात अस्तित्वात असून ते प्रभावीपणे काम करत असल्याचा दावा नेहमी केला जातो. याची प्रचिती देणारे अजित पवार यांचे हे पत्र आहे.

शिवसेना आणि भाजप यांच्या सरकारमध्ये २ जुलै २०२३ रोजी अजित पवार सहभागी झाले. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. या घटनेला आता १०० दिवस झाले आहेत. म्हणून पत्राच्या माध्यमातून अजित पवारांनी जनतेशी संवाद साधून पुढे काय करणार, याची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

अजित पत्रातून काय म्हणतात?

राजकारणासाठी राजकीय टीका हा माझा प्रांत नाही. मी सकारात्मक, विकासात्मक राजकारणावर विश्वास असणारा राजकीय कार्यकर्ता आहे. हाती घेतलेले कुठलेही काम मार्गी लावणे, त्या कामाच्या मार्फत लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणे हा माझा काम करण्याचा पिंड आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श, फुले, शाहू आंबेडकरांचे विचार आणि वंदनीय यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या लोककल्याणाच्या धोरणाचा वारसा जपला आहे. माझ्या नेतृत्वाखाली हीच परंपरा जपणार असल्याचे वचन अजित पवार यांनी दिले आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात यापूर्वीही अनेक मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका असणारे निर्णय घेतले आहेत. अशा प्रकारचे निर्णय हे त्या-त्या वेळच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीप्रमाणे प्रत्येक राजकीय नेत्याला घ्यावे लागतात. अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने २ जुलै २०२३ रोजी महायुतीमध्ये सहभागी  झाली, याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले आहे.

यशवंतराव चव्हाणांचा आदर्श

यशवंतराव चव्हाणसाहेबांनी समाजकारण करताना मांडलेले ‘बहुजनांना सत्तेतून पाठबळ आणि लोकांना उत्तरदायित्व’ हे सूत्र ही प्रेरणा असल्याचे सांगतानाच याच भूमिकेतून महापुरुषांचा आदर्श घेत लोककल्याणासाठी हाती घेतलेला ‘वसा विकासाचा आणि विचार बहुजनांचा’ अशी ग्वाहीही अजित पवार यांनी पत्रातून दिली आहे.

येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या, युवकांच्या, महिलांच्या तसेच विविध समाजघटकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या भूमिकेतून राज्य सरकारमध्ये कार्यरत असेल, असा शब्द अजित पवार यांनी पत्रातून दिला आहे. नव्या सरकारमध्ये सहभागी होताना पत्रात मांडलेली भूमिका आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. याच मार्गावर गेले शंभर दिवस वाटचाल केली आहे आणि पुढेही करत राहू असा विश्वासही अजित पवार यांनी पत्राच्या शेवटी जनतेला दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी