29 C
Mumbai
Wednesday, August 2, 2023
घरराजकीयनगर जिल्ह्यातील दोन मातब्बर नेत्यांची विधानसभेत रंगली जुगलबंदी

नगर जिल्ह्यातील दोन मातब्बर नेत्यांची विधानसभेत रंगली जुगलबंदी

अहमदनगर जिह्यातील बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे सख्य तसे राज्याला माहिती आहे. पुर्वी काँग्रेसमध्ये असणारे विखे-पाटील यांनी 2019 मध्ये भाजपप्रवेश केला सध्या त्यांच्याकडे महसुल आणि पशुसंवर्धन ही खाती आहेत. महसुल खात्याशी संबंधीत वाळू धोरणाच्या प्रश्नावरुन आज थोरात आणि विखे-पाटलांमध्ये विधानसभेत जुगलबंदी पहायला मिळाली.

महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नुकतेच राज्यासाठी नवे वाळूधोरण अंमलात आणले आहे. या वाळू धोरणाशी संबधीत एक प्रश्न विचारुन बाळासाहेब थोरात यांनी विखे-पाटलांना सभागृहात कोंडीत पकडले. थोरात यांनी राज्यात नेमके किती तालुक्यात वाळूचे डेपो सुरू झाले आणि किती तालुक्यांमध्ये सुरळीत पुरवठा सुरू आहे? तसेच नव्या धोरणामुळे चोऱ्यामाऱ्या आणि वाळूचा काळाबाजार थांबला का? असा सवाल उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना सध्या ही माहिती आता उपलब्ध नाही, नंतर सभागृहाच्या पटलावर ठेवतो असे उत्तर दिले.

सभागृहात बोलताना थोरात म्हणाले, सरकारमार्फत किती तालुक्यात वाळूचे डेपो केले आणि विक्री होत आहे हा माझा प्रश्न आहे, जनता सर्व ऐकत आहे, किती तालुके असे आहेत जिथे पुरेसा पुरवठा होतो आहे ज्यामुळे वाळूचा पुरवठा समाधानकारक होतो आहे का ? असा प्रश्न काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला.

त्यावर उत्तर देताना महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज्य सरकारचा हा पहिला प्रयत्न होता की, वाळू माफियांनी जो राज्यभरात उच्छाद मांडला याच्यावर अंकुश आणण्याचे काम करु शकलो नाही, या आधीच्या काळात काही ठिकाणी त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम घडले. म्हणून या सगळ्याला अटकाव आणण्याचा आपला प्रयत्न होता. आज बऱ्याच जिल्ह्यात, तालुक्यांमध्ये जे वाळू डेपो सुरु केले आहेत. त्या प्रमाणे त्याचा प्रतिसाद चांगला आहे. आज काही ठिकाणी नद्यांमध्ये पाणी असल्याने वाळू काढणे अडचणीचे आहे. तसेच हरित लवादाचे देखील काही निर्देश आहेत ते पाळावे लागतात.

हे सुद्धा वाचा

गणेशोत्सवापूर्वी चिपी विमानतळावरुन प्रवासी विमानांच्या फेऱ्या वाढणार

भिडे गुरुजी आम्हाला गुरुजी वाटतात; उपमुख्यमंत्री फडणवीस यांना संभाजी भिडे प्यारे

बीडीडी चाळीत वाढलेल्या मुलाने बॉलीवुडला हवेली, महालांचे भव्य दर्शन घडविले

विखे-पाटील म्हणाले, आता डिझास्टर मॅनेजमेंटच्या अनुशंगिक नदीपात्रातून वाळू काढली तर मग शेवटी पुराच्या परिस्थिती गंभीर होईल म्हणून जलसंपदा खात्याचा त्यामध्ये अंतर्भाव करुन अधिकाधिक डेपो सुरु करण्याचा प्रयत्न आहे. हे मान्य करतो की, पुरेशा प्रमाणात वाळूचा पुरवठा करण्याचा प्रयत्न सरकारचा चालु आहे. पुर्वी काही ठिकाणी रात्रीचा वाळू पुरवठा व्हायचा आता दिवसा होत आहे. या व्यवसायातील माफीयाराज संपवायचे आणि सामान्य नागरिकांना वाळू मिळावी हा आमचा प्रयत्न आहे. घरकुल योजनेतील धारकांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा आपण प्रयत्न केला.

थोरात यांनी किती तालुक्यात डेपोतून वाळू पुरवठा सुरु आहे, याची आकडेवारी विचारली असता विखे यांनी हि माहिती आत्ता उपलब्ध नसून ती पटलावर ठेवू असे सांगितले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी