30 C
Mumbai
Wednesday, August 2, 2023
घरसिनेमाबीडीडी चाळीत वाढलेल्या मुलाने बॉलीवुडला हवेली, महालांचे भव्य दर्शन घडविले

बीडीडी चाळीत वाढलेल्या मुलाने बॉलीवुडला हवेली, महालांचे भव्य दर्शन घडविले

रात्री उशिरा दिल्लीवरुन विमानाने परत आल्यानंतर त्यांनी सहकाऱ्याला उद्या काही रेकॉर्डिंग्ज करायचे आहेत असे सांगितले होते. मात्र त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांसाठीच नव्हे तर सबंध कला विश्वासाठी ती सकाळ जीवघेणा आवंढा गिळायला लावणारी असेल असा अंदाज देखील नव्हता.

विख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकात देसाई यांचे वयाच्या 57 व्या वर्षी बुधवारी (दि.2) रोजी निधन झाले. त्यांनी कर्जत (रायगड) येथील त्यांच्या एनडी स्टुडीओमध्ये आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला.

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिराणी, संजय लिला भंन्साली यांच्या चित्रपटांसाठी त्यांनी कला दिग्दर्शक म्हणून काम केले. प्रेम रतन धन पायो, हम दिल दे चुके सनम, देवदास, लगान, जोधा अकबर, अशा अनेक हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी सेट उभारले.

राजा शिवछत्रपती मालिका, बालगंधर्व अशा मराठीतील मालिका चित्रपटांसाठी देखील त्यांनी काम केले होते. सर जेजे स्कुल ऑफ आर्टमध्ये फोटोग्राफीचे शिक्षण घेतलेल्या नितीन देसाई यांना पुढे मनोरंजन क्षेत्रात मोठी भरारी घेता आली. मुंबईच्या बीडीडी चाळीत लहानपण गेलेल्या मराठी कुटुंबात वाढलेल्या या मुलाने आपल्या कलेच्या अविष्काराने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले. चित्रपटांसाठी हवेल्या, महाल, किल्ल्यांचे भव्य दर्शन त्यांनी बॉलीवूडला घडविले. एतिहासिक चित्रपटांचे सेट उभारताना त्यात त्यांनी जिवंतपणा चितारला.

तमस या हिंदी मालिकेतून त्यांनी कला दिग्दर्शनात पाऊल ठेवले. त्यानंतर १९९३ साली आलेल्या विधू विनोद चोप्रा यांच्या ‘1942 अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटासाठी त्यांनी कला दिग्दर्शन केले. मोठी स्टारकास्ट अललेल्या या चित्रपटाने त्यांना मोठी ओळख मिळवून दिली आणि कला दिग्दर्शन क्षेत्रातील त्यांची कारकिर्द देखील पुढे अतिशय कसदारपणे घडत गेली. चारवेळा राष्ट्रीय पुरस्कार, तीनवेळा फिल्मपुरस्काराने गौरविलेला या माणूस कसलाही अभिनिवेश न बाळगता कायम कलेची सेवा करत राहिला.

नितीन देसाईंचे फिल्म स्टुडीओचे मोठे स्वप्न देखील त्यांनी साकार करुन दाखवले. मुंबईपासून काही मैल अंतरावर रायगड जिल्ह्यात निसर्गाच्या सानिध्यातील कर्जत येथे त्यांनी एन डी स्टुडीओ उभारला. सन 2005 साली त्यांनी 52 एकर जागेवर या स्टुडीओची उभारणी केली. एनेक एतिहासिक मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण या स्टुडीओमध्ये झाले. जोधा अकबर, बाजीराव मस्तानी, प्रेम रतन धन पायो, बालगंधर्व या चित्रपटांसह राजा शिव छत्रपती मालिका, बिग बॉस रिअॅलिटी शो देखील येथे चित्रित झाले. सन २०२१ साली एन डी स्टुडीओत आग लागल्याने मोठे नुकसान झाले होते. मात्र त्यानंतर देखील नितीन देसाई यांनी खचून न जाता स्टुडीओची डागडूजी केली.

हे सुद्धा वाचा

कुठे जात आहोत आपण? आपल्या देशाची आपल्याला ओळख आहे का?

धार्मिक द्वेषातून रेल्वेमधील हत्याकांड; भर पावसात आमदार आव्हाडांचे मूक निदर्शने

समृद्धी महामार्ग झालाय जीवघेणा; क्रेन अपघातातील मृतांचा आकडा 17, मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून मदत

नितीन देसाई यांनी स्टुडीओसाठी १८० कोटींचे कर्ज घेतले होते. काही काळ त्यांनी कर्जाचे हप्ते देखील फेडले. मात्र नंतर आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या कर्जाचे हप्ते थटल्याने कर्ज 249 कोटींवर गेले. कर्जाची परतफेड होत नसल्याने वित्तीय संस्थेने त्यांच्या स्टुडीओवर जप्तीची कारवाई करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिल्याची माहिती आता समोर येत आहे. याच विवंचनेतून नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची चर्चा देखील आता होत आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. नितीन देसाई हे हिंमतबाज माणूस मात्र त्यांनी त्यांच्या अडचणी कधी बोलून दाखविल्या नाहीत असे देखील कलाकारांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी