35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रVIDEO: ‘पुढील 25 वर्षे राज्यात भाजप – शिवसेनेची सत्ता राहणार आहे’

VIDEO: ‘पुढील 25 वर्षे राज्यात भाजप – शिवसेनेची सत्ता राहणार आहे’

लय भारी न्यूज नेटवर्क : राजू थोरात

तासगाव :  भाजप – शिवसेनेचे सरकार पुढील 25 वर्षे सत्तेतून हलणार नाही. अगोदरच आपला मतदारसंघ विकासाच्या बाबतीत मागे पडलेला आहे. त्यामुळे मतदारसंघाचा विकास करून घ्यायचा असेल तर आपल्याला भाजप – शिवसेनेला साथ द्यायला हवी, असे आवाहन माजी मंत्री अजित घोरपडे यांनी केले.

घोरपडे यांनी तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील, पृथ्वीराज देशमुख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

घोरपडे पुढे म्हणाले की, मागील अनेक वर्षे राष्ट्रवादीने सत्ता दडपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतरही सत्ता राष्ट्रवादीच्याच हातात राहिली आहे. त्यामुळे विकास थंड पडला आहे. पुन्हा सत्ता हस्तगत केली पाहीजे. देशामध्ये प्रगतीपथाचे राजकारण सुरू आहे. पुढील 25 वर्षात जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणे हेच एकमेव काम आपल्याला करायचे आहे. देशात व राज्यात महायुतीचे राज्य आहे. केंद्रात नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस – उद्धव ठाकरे हे अत्यंत चांगले काम करीत आहेत. या मतदारसंघात खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून विकास झाला. येथून पुढे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून उरलेल्या पाणी योजना व उर्वरित कामे पूर्ण करू, असेही आश्वासन घोरपडे यांनी दिले.

निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता

तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. भाजप, शिवसेना, आरपीआय व इतर  घटक पक्षांच्या महायुतीकडून अजितराव घोरपडे यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे खासदार संजयकाका पाटील,  माजी आमदार रमेश शेंडगे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बजरंग भाऊ पाटील उपस्थित होते.

खासदार संजयकाका पाटील यांनी सभेत आक्रमक भाषण केले. संजय काका म्हणाले की, मी ज्या ज्या वेळेला अडचणीमध्ये होतो. त्यावेळेला अजितराव घोरपडे हे धावून आले व मला मदत केली. तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील माझ्या कार्यकर्त्यांना मी आताच सांगतो की, अजितराव घोरपडे हेच आमदार झाले पाहिजेत. रात्रीचा दिवस करा. कामाला लागा व अजितराव घोरपडे यांच्या मागे खंबीरपणे उभे रहा असे आवाहन त्यांनी केले.

माझा व आर आर पाटील यांचा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. पण आबांचे निधन झाल्यानंतर मी त्यांच्या घरावर कोणतीही टीका केली नाही, याकडेही संजयकाका यांनी लक्ष वेधले.

महिलांचा लक्षणीय सहभाग

पदयात्रेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. महिलांच्या सर्वात पुढे शिवसेनेच्या नेत्या सुनिताताई मोरे होत्या. ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ व ‘शिवसेना झिंदाबाद’ अशा  घोषणा दिल्या जात होत्या. त्यांना साथ द्यायला इतर महिला होत्या.

लक्षवेधी वाघाची प्रतिकृती

पदयात्रेत काही उत्साही कार्यकर्त्यांनी वाघाची प्रतिकृती आणली होती. ते प्रमुख आकर्षण ठरले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदयात्रेपेक्षा भाजप, शिवसेना, आरपीआय या महायुतीची पदयात्रा मोठी दिसून येत होती. आयोजकांनी नियोजन चांगले केल्यामुळे तासगाव शहरात भगवे वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या डोक्यावर भगवी टोपी तर शिवसेनेचा मफलर दिसून येत होता.

कार्यालयांजवळ कडक पोलीस बंदोबस्त

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार सुमनताई आर आर पाटील व खासदार संजय काका पाटील यांचे कार्यालय जवळ जवळ आहे. त्यामुळे तासगावचे पोलीस उपाधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तासगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी