31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeटॉप न्यूजज्युनियर आर. आर. पाटलांनी ठणकावले : विरोधकांना प्रत्येक निवडणुकीत वेगळा पक्ष का...

ज्युनियर आर. आर. पाटलांनी ठणकावले : विरोधकांना प्रत्येक निवडणुकीत वेगळा पक्ष का लागतो ?

लय भारी न्यूज नेटवर्क : राजू थोरात

तासगाव : आर. आर. पाटील हयात असताना त्यांनी तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघासाठी अनेक योजना आणल्या. 1500 कोटी रुपयांची आरफळ, ताकारी – म्हैसाळ योजना आणली. त्यामुळे हजारो हेक्टर शेतजमीन ओलिखाखाली आली असे प्रतिपादन आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी केले. शिवसेनेचे उमेदवार अजित घोरपडे यांचे नाव न घेता त्यांच्यावरही हल्ला चढविला. विरोधकांना प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळा पक्ष का लागतो असा चिमटा रोहित यांनी घोरपडेंना काढला.

ज्युनियर आर. आर. पाटलांनी ठणकावले : विरोधकांना प्रत्येक निवडणुकीत वेगळा पक्ष का लागतो ?

रोहित पाटील यांच्या मातोश्री व आर. आर. पाटील यांच्या सौभाग्यवती सुमनताई पाटील यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आयोजित केलेल्या सभेत रोहित पाटील बोलत होते. जनतेच्या हितासाठी सरकारकडून विकासाची कामे करून घेऊ. लोकशाही मार्गाने कामे आणू. सरकारने सहकार्य केले नाही तर हिसकावून कामे आणू असाही इशारा रोहित यांनी दिला.

सुमनताई पाटील म्हणाल्या की, मतदारसंघातील जनतेने आर. आर. पाटलांना सतत साथ दिली. जनतेचा आशिर्वाद आर. आर. आबांना मिळाला होता. तसाच आशिर्वाद माझ्याही पाठी राहू द्या. स्व. आबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला निवडून द्या. मी जनतेच्या विकासासाठी निश्चितपणे कामे करीत राहीन, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

तत्पुर्वी आयोजित केलेल्या पदयात्रेमध्ये सुमनताई यांच्यासह स्मिता थोरात, अनिताताई सगरे सहभागी झाल्या होत्या. उघड्या जीपवर उभ्या राहून मतदारांना हात जोडून त्या आशिर्वाद मागत होत्या. सुरवातीला स्व. आर. आर. आबा पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही पुतळ्याचे दर्शन त्यांनी घेतले. पुढे पदयात्रा गुरूवार पेठ, गणपती मंदिर, सांगली नाका ते प्रशासकीय ऑफिस येथे आली. तेथे पदयात्रेचे रूपांतर सभेत करण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, आपल्या सर्वांना आर. आर. आबा पाटील यांचे स्वप्न पूर्ण करावयाचे आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार हे जाणता राजा आहेत. त्यांचे नेतृत्व जपण्यासाठी, मराठ्यांची अस्मिता राखण्यासाठी व येथील महिला भगिनी सुरक्षित ठेवण्यासाठी आमदार सुमनताई पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे.

यानंतर महाकाली साखर कारखान्याच्या चेअरमन अनिताताई सगरे म्हणाल्या, या भाजप शिवसेना सरकारने नोटबंदी केली,  जीएसटी लागू केला, सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या खात्यावर 15 लाख रुपये देतो म्हणाले व देशातील तरुणांना वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणाले. पण या सरकारने काहीही न देता सर्वसामान्य गोरगरीब जनतेला व शेतकऱ्यांना फसवलं आहे.

पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील म्हणाले की, सुमनताई पाटील आमच्या कुटुंबातीलच आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी स्वतः जयंतराव पाटील साहेब यांनी मला तासगावला पाठवलेले आहे. आमदार सुमनताई पाटील यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन प्रतीक पाटील यांनी केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहन कदम यांनीही सुमनताई पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्यायचे आवाहन केले.

पदयात्रेमुळे वाहतुकीची कोंडी

गुरुवारचा दिवस असल्या कारणाने तासगावमध्ये बाजार मोठा भरतो. तासगाव तालुक्यातून बरेच शेतकरी आपला शेतीमाल विकण्यासाठी तासगाव शहरात आणतात. पण सुमनताई आर आर पाटील यांच्या पदयात्रेमुळे तासगाव शहरात दोन तास वाहतुकीची कोंडी झाली. सांगली बारामती महामार्ग हा तासगाव शहरातून जातो याच महामार्गावर आयोजकांनी पदयात्रेचे आयोजन केले गेले होते. त्यामुळे शहरातील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. विट्याहुन सांगलीकड़े जाणाऱ्या दोन रुग्णवाहिका वाहतुकीमध्ये अडकल्या होत्या. त्यामुळे रूग्णांचे हाल झाले. वाहतुकीचा बोजवारा उडाला गेला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भ्रमनिरास
मतदार संघातील येळावी ते हरलकट्टीपर्यत आयोजकांनी कार्यकर्ते आणायचा विढा उचलला होता. पण कार्यकर्ते मोजकेच आले होते.
सयोजकांनी नामी शक्कल लढ़वली. अर्ज भरताना गर्दी दिसावी म्हणून खानापूर आटपाडी मतदारसंघातील कार्यकर्ते बोलवले. विसापूर सर्कल मधील बोरगाव शिरगाव, हातनोली, मांजर्डे, विसापूर येथील कार्यकर्तेच जास्त दिसून येत होते. मतदार संघातील कार्यकर्ते कमी व खानापूर आटपाडी मतदार संघातील कार्यकर्तेच जास्त दिसून येत होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी