32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयफडतूस- काडतूस वादात नेटकऱ्यांनी काढली बावनकुळेंची औकात !

फडतूस- काडतूस वादात नेटकऱ्यांनी काढली बावनकुळेंची औकात !

उध्द्वव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना “फडतूस” गृहमंत्री असे संबोधल्यांनंतर खुद्द फडणवीस यांनी मी फडतूस नाही “काडतूस” आहे असे प्रत्युत्तर दिल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात क्रिया- प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे यांच्या विधानाचा निषेध करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापुढे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अशा खालच्या पातळीवर टीका केली तर आम्ही त्यांना मातोश्री बाहेर पडू देणार नाही, असा दमच बावनकुळे यांनी भरला आहे. मात्र, बावनकुळे यांनी दिलेली ही धमकी उध्द्वव ठाकरे यांना मानणाऱ्या शिवसैनिकांना आणि नेटकऱ्यांना अजिबात रुचलेली नाही.

सध्याच्या राजकारणात एकमेकांवर अगदी खालच्या पातळीवर टीका केली जात असली तरीही यातून महाराष्ट्राच्या संस्कृतीला धक्का बसला आहे. आपल्या राज्यात यशवंतराव चव्हाणांपासून वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख यांच्यासारखे दिग्गज नेते मुख्यमंत्रीपदावर राहिले होते. या नेत्यांनी त्यांच्या कार्यकाळात एकमेकांवर राजकीय कुरघोडी करताना विशिष्ट शब्दप्रयोग केले. जाहीर भाषणांमधून आपल्या विरोधकांवर तोफ डागताना संबंधित नेत्याच्या पदाचा आणि व्यक्तिमत्वाचा मान ठेवला जात होता. विरोधी नेत्यावर कितीही जहाल टीका केली तरीही विशिष्ट मर्यादा सांभाळली जात होती. राजकीय मतभेद बाजूला सारून महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर एकत्र येण्याची त्यांची भावना होती.

उदाहरण द्यायचे झालेच तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोन दिग्गज नेत्यांचे आहे. दोघांनीही एकमेकांवर टीका करताना महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कृतीची जाणीव ठेवली होती. राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी एकमेकांशी व्यक्तिगत मैत्री जपली. त्यांच्यात कधीही व्यक्तिगत द्वेष, मत्सर व सुडाची भावना नव्हती. बाळासाहेब ठाकरे हे तर प्रसिद्ध व्यंगचित्रकार असल्याने त्यांच्या कुंचल्यातून शरद पवार यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघत होते. त्यामुळे पवार यांच्यावर जहाल टीका करताना बाळासाहेब ठाकरे त्यांना कधी ‘ बारामतीचा ममद्या’ तर कधी ‘साखरेचं पोतं’ असे संबोधत होते. मात्र, या शब्दांवर पवार यांनी कधीही आक्षेप घेतला नाही अथवा खालच्या पातळीवर जाऊन बाळासाहेबांचा अपमान केला नाही. ठाकरे आणि पवार यांच्या दोस्तीचे किस्से महाराष्ट्रातील जनतेमध्ये मशहूर होते. महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकेल, असे शिवसेनाप्रमुख जाहीर सभेतून नेहमी सांगायचे. शरद पवार यांना ही नुसती वल्गना वाटत होती. मात्र, अखेर १९९५ मध्ये शिवसेनाप्रमुखांनी आपले स्वप्न पूर्ण करून दाखवले. सत्तांतरानंतरही या उभय नेत्यांमध्ये व्यक्तिगत आयुष्यात कधीही वितुष्ट बघायला मिळाले नाही.

सद्याचे राजकारण पाहिल्यास बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी घालून दिलेल्या आदर्शाला तडा बसल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळलेले देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगलेले आहे. ठाण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिक रोशनी शिंदे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना उद्धव ठाकरे यांनी राज्याचे गृहमंत्री म्हणून फडणवीस यांच्यावर तोफ डागली होती. फडणवीस हे “फडतूस” गृहमंत्री असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. त्यांच्या या शब्दप्रयोगाला देवेंद्र फडणवीस यांनी अगदी पुष्पा स्टाईलमध्ये ‘फडतूस’ नही ‘काडतूस’ हूं मै..झुकेंगा नही, असे खुमासदार उत्तर दिले होते. खरे पाहता, या दोन्ही शब्दांवरून इतके रणकंदन माजविण्याची गरज नव्हती. विरोधकांच्या टीकेला दिलखुलासपणे घेऊन त्यावर मार्मिकपणे उत्तर देण्याची परंपरा महाराष्ट्राच्या राजकारणाला लाभली आहे. जेव्हा दोन मोठ्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले असेल तर त्यामध्ये त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती. फडतूस शब्दाला काडतूस हे प्रत्युत्तर अगदी चपखल होते. त्यामध्ये व्यक्तिगत द्वेष, मत्सर, हेवा अथवा राग बाळगण्याचे कारण नाही.

मात्र, या दोन नेत्यांनी एकमेकांविषयी केलेल्या विशिष्ट शब्दप्रयॊगाचे पडसाद राज्याच्या राजकारणावर आणि जनमानसावर पडला असल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर दोन्ही बाजुंनी जोरदार प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या दोन नेत्यांच्या वादात विनाकारण उडी घेतल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मानणाऱ्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. फडणवीस यांच्यावर यापुढे अशी टीका केल्यास उद्धव ठाकरे यांना मातोश्रीबाहेर पडू देणार नाही, अशी धमकी बावनकुळे यांनी दिल्यामुळे आगीत तेल ओतल्या गेले आहे. कितीही झाले तरीही उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असून राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांना गर्भित इशारा देताना बावनकुळे यांनी आपली मर्यादा ओळखणे गरजेचे होते. मात्र, आता त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडल्याने त्याचे परिणाम बावनकुळे यांना भोगावे लागणार आहे. बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिल्यामुळे नेटकऱ्यांनी देखील तीव्र संताप व्यक्त केला आहे. बावनकुळे यांना ट्रोल केले जात असून फडतूस-काडतूस शब्दावरून सुरु झालेला वाद चिघळला आहे.

हे सुध्दा वाचा  

एकनाथ शिंदे यांना वेळच मिळत नसल्याने मुंबईतील तीन पूलांचे उदघाटन रखडले

फडतूस- काडतूस वादात नेटकऱ्यांनी काढली बावनकुळेंची औकात !

आणखी कितींचे तोंड दाबणार; 50 खोकेनंतर ‘भोंगळी’ गाणाऱ्या रॅपरला अटक होताच नागरिक संतप्त

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी