30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयराम शिंदे म्हणतात, थांबणे मला मान्य नाही

राम शिंदे म्हणतात, थांबणे मला मान्य नाही

लयभारी न्यूज नेटवर्क 

जामखेड : विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री राम शिंदे यांना राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी पराभवाची धुळ चारत नवा इतिहास रचला. भाजपचा सर्वात मजबूत बालेकिल्ला असलेल्या कर्जत – जामखेड मतदारसंघात राम शिंदे यांनी मंत्रीपदाच्या माध्यमांतून करोडोंचा निधी आणूनही भाजपचा मजबूत बालेकिल्ला ढासळला. विधानसभेत वाटेला आलेल्या दारूण पराभवामुळे महायुतीच्या गोटात नैराश्याचे वातावरण पसरले आहे. पराभवाने खचलेले महायुतीचे नेते व कार्यकर्त्यांनी नैराश्यग्रस्त होऊ नये यासाठी माजी मंत्री राम शिंदे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. पराभवाने खचून न जाता चला तर मग थांबणे मला मान्य नाही असे सांगत कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर अगामी पाच वर्षे रोहित पवार विरूद्ध राम शिंदे या संघर्षासाठी सज्ज राहण्याचेच संकेत त्यांनी दिल्याचे बोलले जात आहे.

रोहित पवारांकडून पराभूत झालेले राम शिंदे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, आयुष्यात अनेक टप्प्यांवर वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जायला लागते, तसेच अनेक संघर्षाना तोंड द्यावे लागते. जेव्हा या संघर्षमय प्रवासात आपली माणसं सोबत असतात… समजून घेणारी… समजावून सांगणारी असतात तेव्हा पराभवाची धग नकळत निश्चित कमी होते. आपण सर्व नेहमीच माझ्या वाटचालीत सोबत होतात आणि मला खात्री आहे पुढे ही साथ कायम ठेवाल. या नंतर सुध्दा जेव्हा जेव्हा माझ्या मदतीची, सहयोगाची गरज पडेल तेव्हा तेव्हा मी तेवढ्याच ताकदीने उभा राहील हा माझा शब्द आहे. माझे सामर्थ्य, माझी निष्ठा आणि प्रेरणा तुम्हीच आहात. चला तर मग थांबणे मला मान्य नाही. आपले अखंड परिश्रम असेच सुरू ठेवू या. असे सांगत राम शिंदे यांनी पराभवाने खचून न जाता पुन्हा जनतेच्या सेवेत पुर्ण ताकदीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असाच संदेश आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमांतून कार्यकर्त्यांना दिला आहे.

निवडणूक निकाल लागल्यानंतर निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित आमदार रोहितदादा पवार यांनी गुरूवारी सायंकाळी पराभूत उमेदवार पालकमंत्री राम शिंदे यांची चौंडी येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीत राम शिंदे यांनी रोहीत पवारांना विजयी फेटा बांधत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान यावेळी रोहित पवारांनी राम शिंदे यांच्या आईंचे दर्शन घेत आशिर्वाद घेतले होते. रोहित पवारांनी मतदारसंघाच्या विकासासाठी कटीबद्ध राहू असे सांगत विकास कामांत राजकारण आणू नये असेही सांगितले होते. रोहित पवार व राम शिंदे यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोघा नेत्यांच्या राजकीय प्रगल्भतेचे राज्यभरात कौतुक झाले होते.

दरम्यान, रोहित पवारांनी सर्वांना सोबत घेत मतदारसंघाचा विकास करण्याचा मनोदय जाहीर केला. त्याला चोवीस तास लोटत नाहीत तोच राम शिंदे यांनी पराभवाने खचून न जाता सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे अवाहन फेसबुकद्वारे केले आहे. आपले अखंड परिश्रम असेच सुरू ठेवूया असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी