33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयशरद पवार ५ हजार युवकांशी संवाद साधणार, जंगी सोहळ्याचे आयोजन

शरद पवार ५ हजार युवकांशी संवाद साधणार, जंगी सोहळ्याचे आयोजन

टीम लय भारी

मुंबई : ८० वर्षाचा तरूण अर्थात शरद पवार पंचविशीतील युवकांशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रभक्ती, समाज, नवी आव्हाने, बदलते जग, तरूणांपुढील संधी, देशासमोरील आव्हाने अशा विविध मुद्द्यांवर ते तरूणांशी हितगुज करणार आहेत. ‘संवाद साहेबां’शी या नावाने हा सोहळा येत्या २३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.

वडाळ्यातील भारतीय क्रीडा भवनमध्ये सकाळी १० वाजता हा सोहळा होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष एड. अमोल मातेले यांनी पुढाकार घेऊन हा सोहळा आयोजित केला आहे. ‘सजग तरूणांशी संवाद… कशासाठी, देशासाठी… नव्या स्वराज्याच्या उभारणीसाठी’ अशी टॅगलाईन देऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तरूण वर्गामध्ये शरद पवार यांच्याविषयी कमालीचे आकर्षण आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. पवार जिथे जातील, तिथे तरूणांची गर्दी जमायची. रस्त्या रस्त्यांवर तरूण वर्ग पवारांच्या स्वागतसाठी थांबायचा. पवारांच्या भाषणांना तरूणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा. टाळ्या आणि शिट्यांनी पवारांच्या भाषणांना तरूणांनी दाद दिली होती. एवढेच नव्हे तर, प्रचारातील हे वातावरण निवडणुकीच्या निकालात रूपांतरीत करण्याची किमया शरद पवार यांनी साधली होती, ती केवळ तरूणांच्याच जोरावर.

पवारांचे वय ८० वर्षे आहे. पण ‘मी अजून म्हातारा झालेलो नाही’ असे पवार वारंवार सांगत असतात. पवारांच्या या दांडग्या उत्साहाबद्दल तरूणांमध्ये कुतूहल आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यात पूर्णतः भाजपमय वातावरण झालेले होते. मातब्बर नेते राष्ट्रवादीला सोडचिट्टी देवून भाजपच्या वळचणीला गेले होते. तरीही निराश न होता पवार यांनी राष्ट्रवादीमधील तरूण कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पूर्ण निवडणूक ढवळून काढली होती. निवडणुकीच्या निकालावंतरही त्यांनी शिवसेना व काँग्रेससोबत मोठ बांधून राज्यातील सत्ता भाजपकडून हस्तगत केली.

पवार यांच्या आशिवार्दाने ‘महाविकास आघाडी’ सरकार आता स्थिर स्थावर झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीनंतर ते पहिल्यांदाच तरूणांसोबत संवाद साधणार आहेत. ज्या तरूणांनी निवडणुकीत पवारांना साथ दिली, त्यांना पवार विसरले नाहीत. हेच ‘संवाद साहेबां’शी या कार्यक्रमातून दाखवून दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या कक्षेतील विविध महाविद्यालयांचे जवळपास ५ हजार विद्यार्थी या संवाद सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, आयटीआय, वैद्यकीय अशा विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा त्यात समावेश असेल, अशी माहिती एड. अमोल मातेले यांनी ‘लय भारी’शी बोलताना दिली.

हे सुद्धा वाचा

अण्णा हजारे, सुजय विखे, निलेश लंके, विजय औटी आज भिडणार कुस्तीच्या फडात

मंत्रालयातील कामांसाठी आमदार पत्नीच्या सोबतीने करतात पाठपुरावा

भाजपला चीतपट करण्यासाठी ‘महाविकास आघाडी’ची आणखी एका निवडणुकीत एकजूठ

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी