35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeआरोग्यBreaking : मंत्रालयातील ‘करोना’ संशयित अधिकाऱ्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त

Breaking : मंत्रालयातील ‘करोना’ संशयित अधिकाऱ्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त

टीम लय भारी

मुंबई : ‘करोना’चा संशयित असलेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्याचा वैद्यकीय तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये या अधिकाऱ्याला ‘करोना’ची लागण झालेली नाही. या अधिकाऱ्यासह त्याची पत्नी व मुलग्याचाही अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे मंत्रालयात काम करणाऱ्या हजारभर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

‘करोना’च्या संशयावरून अधिकारी, त्याची पत्नी व मुलग्याची कस्तुरबा रूग्णालयात सोमवारी चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीचा नुकताच अहवाल आला असून तो निगेटव्ह असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी ‘लय भारी’ला दिली. मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडबल्यूडी) कक्ष अधिकारी पदावर हे अधिकारी काम करतात.

या अधिकाऱ्यांचे भाऊ, वहिनी व त्यांच्या दोन लहान मुली 6 मार्च रोजी अमेरिकेहून आले होते. या चौघांपैकी तिघांना ‘करोना’ची लागण झाल्याचे आढळून आले आहे. पण ‘करोना’ची चाचणी होण्याअगोदर दोन्ही कुटुंबियांचे तब्बल चार दिवस एकमेकांकडे येणे जाणे सुरू होते. त्यामुळे अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांचीही संशयित म्हणून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सुदैवाने अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला आहे. परंतु सोमवारी मात्र अधिकाऱ्याच्या ‘करोना’ संशयामुळे मंत्रालयात खळबळ उडाली होती. अधिकारी वर्ग व कर्मचाऱ्यांनी मोठा धसका घेतला होता. या घटनेनंतर गृह विभागाने तातडीने एक परिपत्रक जारी करून सामान्य लोकांना मंत्रालय प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला. बैठकांवरही निर्बंध आणले.

ताज्या बातम्यांच्या अपडेट मिळविण्यासाठी आमच्या ‘लय भारी’ ट्विटर अकाऊंटला फॉलो करा

दरम्यान, ‘करोना’ची लागण झालेले संबंधित चार सदस्यीस कुटुंब 6 मार्च रोजी अमेरिकेहून पहाटे मुंबई विमानतळावर आले. त्यानंतर 7 मार्च रोजी सिद्धेश्वर एक्स्प्रेसने हे चारही जण सोलापूरला नातेवाईकांच्या लग्नाला गेले. सोलापूरमध्ये 8 मार्च रोजी एका विवाह सभारंभासाठी हे कुटुंबिय उपस्थित राहिले. यावेळी भाऊ असलेले मंत्रालयातील संबंधित अधिकारी सुद्धा होते. लग्न सोहळा आटोपल्यावर अमेरिका रिटर्न्स कुटुंबिय व मंत्रालयातील हे अधिकारी रात्री सिद्धेश्वर एक्स्प्रेसने मुंबईला परतले. 9 मार्च रोजी हे कुटुंबिय कल्याणमधील तिसाई कुंज रेसिडेन्सी या इमारतीत आले. अमेरिकन भावाचे घर इमारतीत 7 व्या मजल्यावर आहे, तर अधिकाऱ्याचे घर याच इमारतीत तिसऱ्या मजल्यावर आहे. 9 मार्च ते 12 मार्च असे चार दिवस या दोन्ही भावांच्या कुटुंबियांचे एकमेकांकडे येणे जाणे सुरूच होते.

अशातच 13 मार्च रोजी अमेरिका रिटर्न्स बंधूला खोकला व तापाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना कल्याण – डोंबिवलीच्या महापालिका रूग्णालयात हजर केले. रूग्णालयाच्या शिफारसीनुसार या बंधूंना कस्तुरबा रूग्णालयात दुपारी दाखल करण्यात आले. त्यांची ‘करोना’ची चाचणी घेतली गेली. 14 मार्च रोजी त्यांचा अहवाल आला. त्यात त्यांना ‘करोना’ची लागण झाल्याचे आढळून आले. 15 मार्च रोजी त्यांची पत्नी व तीन वर्षाच्या लहान मुलीलाही ‘करोना’ची लागण झाल्याचे आढळून आले. या तिघांनाही कस्तुरबा रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

त्यानंतर 16 मार्च रोजी मंत्रालयात अधिकारी असलेले बंधू, पत्नी व मुलग्याची कस्तुरबा रूग्णालयात चाचणी घेण्यात आली. या चाचणीचा आज, मंगळवारी सकाळी अहवाल प्राप्त झाला. त्यात या तिघांनाही ‘करोना’ची लागण झालेली नसल्याचे आढळून आल्याची माहिती सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना दिली.

दरम्यान, अमेरिका रिटर्न कुटुंबियांनी मुंबई ते सोलापूर व पुन्हा कल्याण अशी मोठी मुशाफिरी केली आहे. त्यामुळे या कुटुंबियांच्या संपर्कात अनेक लोक आले असू शकतात. रेल्वे व लग्नाच्या गर्दीत ते मिसळल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी काही अज्ञातांना ‘करोना’ची लागण झाली तर नसेल ना अशी भिती आता उद्भवली आहे.

‘करोना’ग्रस्ताचा मृत्यू

‘करोना’ची लागण झालेल्या एका रूग्णाचा कस्तुरबा रूग्णालयात मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच ‘करोना’ग्रस्ताचा मृत्यू आहे. हे गृहस्थ दुबईवरून आले होते. त्यांचे वय 65 वर्षे होते. त्यांना कस्तुरबा रूग्णालयात भरती केले होते. त्यांना मधुमेहाचाही आजार होता. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होती, असे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

‘करोना’च्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्र्यांची उद्योजकांसोबत बैठक सुरू, महत्वाचे निर्णय घेणार

खासदार सुप्रिया सुळेंची राजेश टोपेंना शाबासकी; म्हणाल्या ‘सुपरमॅन’

शाळांतील शिक्षकांनाही सुटी, अतिनिकडीचे काम असेल तरच शाळेत यावे लागणार

VIDEO : यात्रा, जाहीर कार्यक्रम रद्द करा, लग्नामध्येही गर्दी नको : उद्धव ठाकरे, अजितदादा, राजेश टोपेंच्या सुचना

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी