31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजचार युद्धाचे साक्षीदार : शांताराम शिंदे

चार युद्धाचे साक्षीदार : शांताराम शिंदे

डॉ. दीपक महिपत दळवी : टीम लय भारी

काही माणस जन्माला येतात तीच काही साहसी, वैशिष्टपूर्ण कामगिरी करण्यासाठीच. खडतर प्रवास अनेकांच्या आयुष्यात येतो, परंतु त्या खडतर प्रवासावर, बिकट परिस्थितीवर मात करून समाजापुढे आदर्शवत उदाहरण उभे करणारे फार थोडे असतात. आपलं परिवार, आपला देश यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारे ही थोडे असतात. राष्ट्रहित जोपासत समाजाप्रती आपण काही देणे लागतो, ही प्रामाणिक भावना जोपासत एक सचोटीचा इतिहास उभा करणारे शिंदे – सोंडकर घराण्यातील कर्तृत्ववान पुरुष म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल, अशा शांताराम विश्राम शिंदे यांचा आज (१५ नोव्हेंबर) ८० वा जन्मदिवस. अर्थात सहस्त्र चंद्र दिन.. आणि त्या निमित्ताने जागृत झालेल्या त्यांच्या जीवनप्रवासातील आठवणींना उजाळा देण्याचा दिवस (Shantaram Vishram Shinde’s 80th birthday).

कोकण पुत्र शांताराम विश्राम शिंदे यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९४२ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यामधील कादवण या निसर्गाच्या खुशीत आणि डोंगरावर वसलेल्या छोट्याशा गावात झाला आहे. गावात शिक्षणाचे धडे घेण्यास सुरूवात केली. घरच्या अंगणात तर पडवीत शाळा भरत असे. अशा बिकट परिस्थितीत शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन त्यांच्या आईवडिलांनी त्यांना शिक्षणाचे धडे गिरवायला भाग पाडले.

बाबासाहेब पुरंदरेंनी शिवछत्रपतींचा इतिहास समोर ठेवला, काही वादग्रस्त मुद्दे सुद्धा होते : शरद पवार

ESIS Recruitment 2021: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा रुग्णालय ठाणे येथे भरती

Shantaram Vishram Shinde's 80th birthday today
कोकण पुत्र शांताराम विश्राम शिंदे

मात्र घरात दारिद्र्य पाचवीला पुजले असल्याने पुढे खेड तालुक्यातील दिवाण खावटी या मामाच्या गावी त्यांचे चौथी पर्यन्त शिक्षण झाले. आई वडिलांची होणारी परवड पाहून शैक्षणिक मर्यादेत त्यांचे मन रमेना. आपल्या आणि कुटुंबियांच्या भविष्यासाठी दोन वर्षानंतर त्यांनी मुंबई गाठली. आजच्या प्रमाणेच त्या काळी देखील मुंबई हे स्वप्नपूर्ती करणारं शहर असल्याने शांताराम मुंबईत जाऊन भविष्य घडवायचं ही खूणगाठ मनाशी बांधली आणि थेट लोअर परळ येथील मामाच्या घरी मुक्कामास आले.

डोळ्यापुढे अनेक स्वप्ने आणि मनात ध्येयाची उर्मी असल्याने मिळेल ते काम करायचं ठरवलं. सुरुवातीलाच हॉटेलमध्ये काम मिळालं आणि शांताराम यांच्यावर मुलगा कमवता झाला हा शिक्का बसला.साहजिकच कमवत्या आणि प्रामाणिक मुलाच्या कर्तव्याने वयाच्या १५ व्या वर्षापासूनच त्यांनी गावी आपल्या परिवारासाठी पैसे पाठवायला  सुरुवात केली.चार बहिणी आणि एक भाऊ , आई वडिलांसह मोठ्या कुटुंबाला शांताराम यांनी मोठा हातभार लावला.

लोअर परळ येथील शंकर विलास हॉटेल आणि माटुंगा येथील प्रभाकर रेस्टॉरंट मध्ये नोकरी करत असताना त्यांना दहा रुपये , १५ रुपये असा पगार होता. भावंडांमध्ये दुसरा क्रमांक असला तरी कर्तव्य कायम नंबर एकचे होते. केवळ घर चालविणे नव्हे तर भावंडांच्या शिक्षणासाठी ही त्यांनी मदत केली. कौटुंबिक जबाबदारी बरोबरच काही तरी शोधलं पाहिजे,यामुळे त्यांच्या जीवनातील संघर्ष चालूच होता.आणि एक दिवस ते थेट उभे राहिले ते मिलिटरी भरतीसाठी. मियत्रंच्या सोबत मुंबईतील कुलाबा येथील गेट वे ऑफ इंडिया येथे मिलिटरी भरतीसाठी उभे राहिले आणि निवड ही झाली.

किरिट सोमय्यांच्या विरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल! : अतुल लोंढे

Curfew In Maharashtra’s Amravati Expanded To Four Towns As BJP Stages Protest

मिलिटरी मधील निवड हा शांताराम शिंदे यांच्या आयुष्यातील खरा टर्निंग पॉइट ठरला. १९६० साली मिलिटरी मध्ये निवड झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी बेंगलोर येथे जावे लागले  मात्र मुलाचे हे प्रताप  आई वडिलांना माहिती नव्हते. त्यांच्या मते त्यांचा मुलगा मुंबईत कुठतरी नोकरी करतोय इतकेच होते. त्यांचा कुठलाच संपर्क गावाला झाला नाही. तब्बल वर्षभर आपला मुलगा नक्की कुठे आहे, याचा थांगपत्ता आईवडिलांना नव्हता.

Shantaram Vishram Shinde's 80th birthday today
शांताराम विश्राम शिंदे यांचा 80 वा जन्मदिवस

माझ्या पोराचे काय झाले असेल, कुठे राहत असेल, काही झाले तर नसेल ना? अशा भीतीदायक प्रश्नाचं काहोर त्यांच्या मनात मजला होता. कुणी काही ही बोलायचे आणि आई डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटायचा.दुसरीकडे त्यांचे खडतर प्रशिक्षण सुरु झाले होते. तब्बल वर्षभरानंतर त्यांना काही दिवस सुट्टी मिळाली आणि त्यांनी थेट गाव गाठले.  आपल्या आईवडिलांसमोर उभे राहिले. ते दृश्य आठवून आजही त्यांचे डोळे पाणवतात. जेव्हा ते गावी गेले तेंव्हा खऱ्या अर्थाने कर्तृत्वान मुलाची गावाला नव्हे पंचकृषीला ओळख पटली. गावातील मुलगा सीमेवर लढण्यासाठी जाणार या कल्पनेने संपूर्ण गावानेच टाहो फोडला.

अखंड गाव त्यांना पाहण्यासाठी  आतुर झाले. १९६२ साली भारत आणि चीन युद्ध झाले. पुढे त्यांची सिक्कीमला पोस्टिंग झाली आणि हॉटेलच्या कामापासून सुरु झालेला प्रवास देशसेवेच्या वळणावर येऊन ठेपला.  ते ए. एस. सी. ( आर्मी सर्व्हिस कोर्स ) मध्ये होते. त्यानंतर १९६४ साली त्यांची पोस्टिंग पंजाबला झाली. १९६५ च्या पाकिस्तनाच्या युद्धाच्या वेळी ते फिरोजपूर येथे कर्तृव्यावर होते. युद्धात सहभागी होऊन पाकिस्तानी सैनिकांना धूळ चरणाऱ्या भारतीय सैनिकांमधील ते एक अविभाज्य भाग होते, हे निश्चितच आमच्यासाठी गौरवास्पद आहे.

युद्ध संपल्यानंतर ते पुण्याला आले. केंद्र सरकारने मिलिटरी मध्ये सुधारणा करीत नव्याने बटालियन बनवल्या. त्यामुळे ते बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप मध्ये सामील झाले. त्यात पुन्हा इंजिनीअरिंग ट्रेनिंग गेले. ती संपल्यानंतर ते  राजस्थानला गेले. देसलमेल येथे कॅम्प होता. दोन वर्षात रेगिस्तान मध्ये खडतर जीवन जगत देशसेवा करीत होते , त्यानंतर ते  काश्मीर मधील पट्टी या ठिकाणी गेले.  श्रीनगर पुढे, बारामुल्ला जवळ, हे पट्टी सेक्टर आहे. या अतिशय खडतर ठिकाणी आणि रोज कुठून गोळ्या येतील, याची शाश्वती नसलेल्या काश्मीरमध्ये चार वर्ष राहिले. पाकिस्तानला पहिल्या युद्धात पराभूत केल्यानंतर पुन्हा पाकिस्तानशी १९७१ चा युद्ध झाले. त्यावेळी पाकिस्तानचे दोन तुकडे करून भारताने बांगलादेश मुक्त केले आणि नवीन देशाची निर्मिती केली.

या युद्धानंतर त्याचे युनिट चंदीगडला  आले. तीन महिन्यानंतर कलकत्ता येथे बदली झाली. ते १९७७ पर्यंत  टी. ए. आर्मी येथे चार वर्ष होते. त्यावेळी सर्व कुटुबीयांना सोबत नेण्याची संधी मिळाली.  १९७४ ला आणीबाणी लागू झाली त्यावेळी ते कलकत्ता येथे होते. १९७७ मध्ये १५ वर्ष देशसेवा केल्यानंतर सेवा निवृत्त झाले. त्यांना बडोद्याला पुन्हा संधी मिळत होती, परंतु त्यांच्या आईच्या आग्रहाखातर त्यांनी  मुंबईतील बँक ऑफ इंडियाची निवड केली आणि १९७८ मध्ये महालक्ष्मी येथील शाखेत ते रुजू झाले. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत . दीपक हा अकाऊंटट असून दुसरा मुलगा दिलीप हा पत्रकारिता क्षेत्रात नाव लौकीक करीत आहे. संगीता आणि गीता या दोन्ही मुली  संसारात रममाण आहेत.

१९८४ पासून कल्याण पूर्व येथे राहणारे शिंदे हे बँकेतून २०००  मध्ये सेवा निवृत्त  झाले. त्यानंतर ते मुलासोबत  ठाण्याला राहत आहेत. पत्नी सुलोचना हीचे २८ऑक्टोबर २०१२ निधन झाले. त्यानंतर त्यांची सुन करुणा आणि मुलगा दिलीप हा त्यांचा  उत्तमरीत्या सांभाळ करीत आहेत. शस्त्रक्रियेनंतर  सुन करुणा ही  त्यांची मुलीपेक्षा अधिक काळजी घेत आहे.

आर्मीत  असताना इंग्रजी आणि हिंदी शिकले आणि मुलांना शिकविले.  सामाजिक काम करताना परिसरातील लोकांना मदत करणे, गावातील विकासकामे, मंदिर आणि अडल्या नाडल्या मदतीचा हात देत आहेत. देशसेवा आणि राष्ट्रसेवा आजही आपल्या नातवच्या मनात रुजवात आहेत. युद्ध आणि त्याची चर्चा .. त्यांना पुन्हा ते देशभक्तीने भारावलेले दिवस आठवतात आणि त्यात ते रममान होतात. दोन पाकिस्तान युद्ध, चीन युद्ध, गोवा मुक्ती संग्राम, आणीबाणी, पाय कसला मोडला, पाकिस्तानच्या सीमा ओलांडून ते कसे सावज आणायचे आदींबाबत  ते आवर्जून आठवणी सांगत असतात.

आजही ही पेन्शनची आठवण झाली की आवर्जून तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवार यांनी संरक्षण दलातील सैनिक आणि अधिकारी यांना कशी पेन्शन वाढविण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्याचा फायदा कसा लाखो माजी सैनिकांना झाला हे सांगत असतात. १२० रुपये निवृत्ती घेतना पेन्शन होती. ती आता सन्मानजनक आहे.

अनेक जण जन्माला येतात, वर्षानुवर्षे जगून फक्त वाढत्या वयाचे साक्षीदार होतात. परिणामी त्यांच्या जगण्याला काहीच अर्थ नसतो. परंतू पुरुषार्थ जाणून आपल्या जन्मभूमी बरोबर आपल्या देशाचे ऋण  कधीही विसरत नाही. माता – पित्याच्या भावंडांच्या मुलांच्या कर्तव्यात कधी कसूर ठेवतनाहीत, अशी व्यक्तिमत्वे इतिहास घडवितात. कोकणचे सुपुत्र चार युद्धाचे साक्षीदार लढवय्ये शांताराम विश्राम शिंदे यांनी समाजासमोर खूप मोठा आदर्श ठेवला आहे. आजही ते सामाजिक बांधिलकी जपून कुटुंब सांभाळतात. अशा या मनस्वी, थोर  व्यक्तिमत्वाला सहस्त्र चंद्र दिनानिमित्त  अनंत शुभेच्छा आणि शतशः: प्रणाम !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी