28.2 C
Mumbai
Monday, September 23, 2024
Homeटॉप न्यूजएकनाथ खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल : ‘यांच्या’ निर्णयामुळे पक्षाचे नुकसान

एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल : ‘यांच्या’ निर्णयामुळे पक्षाचे नुकसान

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : पक्ष कधी चुकत नसतो. पण पक्षातील निर्णय घेण्याची जबाबदारी काही नेत्यांवर असते. हे नेते चुकीचे निर्णय घेतात. त्यामुळे पक्षाचे नुकसान होते अशी जळजळीत टीका भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केली.

विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्यासह विनोद तावडे, प्रकाश महेता आणि चंद्रशेखर बावनकुळेंना तिकिट दिले नव्हते. किमान आम्हाला विश्वासात तरी घ्यायला हवे होते. आम्हाला सोबत घेतले असते तर पक्षाच्या आणखी २० – २५ जागा वाढल्या असत्या, असाही घणाघात खडसे यांनी फडणवीसांवर केला. सन २०१४ मध्ये शिवसेनेसोबतची युती तोडण्याचा भाजपने निर्णय घेतला होता. तो पक्षाचा निर्णय होता. पण जाहीर करण्याची जबाबदारी माझ्यावर दिली होती. त्यावेळी भाजप व शिवसेना स्वतंत्र निवडणुका लढल्या. पण निवडणुकीनंतर एकत्र आले. पाच वर्षे चांगले सरकार चालले. २०१९ मध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढविली. लोकांनी दोन्ही पक्षांच्या महायुतीला बहुमत दिले. पण केवळ मुख्यमंत्री कोण व्हावा या एकाच मुद्द्यावरून दोन्ही पक्ष विभक्त झाले. आता महिनाभर महाराष्ट्राच्या राजकारणात जे चालू आहे ते आपण पाहात आहोत. त्यावर काय बोलावे अशी सूचक नाराजी त्यांनी व्यक्त केली.

ज्यावेळी देशात भाजपची ताकद नव्हती. लोकं आमच्यावर दगड धोंडे मारत होते. त्यावेळी आम्ही पक्ष वाढविण्याचे काम केले. गेली ३५ – ४० वर्षे तपश्चर्या केली होती. पण आमच्यासारख्यांना बाजूला सारले  – एकनाथ खडसे, भाजप नेते

अजित पवार यांच्या विरोधात भाजपकडे बैलगाडीमध्ये पुरावे दिले होते, त्याचे काय झाले असे खडसे यांना विचारले असता, ते पुरावे केव्हाच रद्दीत विकले. त्यावेळी रद्दीचा भाव चांगला होता, असा टोलाही त्यांनी फडणवीस यांना लगावला.

हे सुद्धा वाचा

उद्या ९ मंत्र्यांचा शपथविधी होणार, सोनिया गांधींसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती

मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख बदलली, २८ नोव्हेंबरला होणार शपथविधी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी