35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमंत्रालयCoronavirus च्या मुकाबल्यासाठी 11 आयएएस अधिकाऱ्यांची फौज

Coronavirus च्या मुकाबल्यासाठी 11 आयएएस अधिकाऱ्यांची फौज

Coronavirus च्या संकटांवर मात करण्यासाठी नियंत्रण कक्ष सज्ज

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’चा विषाणूचा ( Coronavirus ) संसर्ग वाढत चालला आहे. त्यावर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने मंत्रालयात ( Mantralaya ) नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षासाठी वरिष्ठ ११ आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मनोज सौनिक, डॉ. नितीन करीर, राजीव जलोटा, डॉ. प्रदीप व्यास, डॉ. भूषण गगराणी, आश्विनी भिडे, डॉ. संजय मुखर्जी, संजय खंदारे, प्राजक्ता लवंगारे, डॉ. अनुपकुमार यादव, किशोरराजे निंबाळकर या अधिकाऱ्यांवर नियंत्रण कक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता ( Ajoy Mehata ) यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.

Coronavirus च्या मुकाबल्यासाठी 11 आयएएस अधिकाऱ्यांची फौज

Coronavirus च्या मुकाबल्यासाठी 11 आयएएस अधिकाऱ्यांची फौज

Coronavirus च्या मुकाबल्यासाठी 11 आयएएस अधिकाऱ्यांची फौज

‘कोरोना’मुळे ( Coronavirus ) आरोग्य यंत्रणा तत्पर करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, खालावलेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणणे, लोकांसाठी खाद्यान्नाचा तुटवडा कमी होऊ न देणे अशा विविध समस्यांवर उपाय शोधावे लागणार आहेत. त्यानुसार प्रत्येक अधिकाऱ्यांकडे विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

‘कोरोना’मुळे ( Coronavirus ) राज्याची संभावित विस्कळीत अर्थव्यवस्था सुरळीत करण्याची जबाबदारी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. उद्योजकांसमवेत चर्चा करून त्यांच्या नुकसानीबाबत उपाययोजना तयार करणे, नुकसान झालेल्या समाजातील विविध घटकांना राज्याच्या संबंधित खात्यांमार्फत तात्काळ मदत करणे यासंदर्भातील जबाबदारी सुद्धा सौनिक यांच्याकडे देण्यात आली आहे.

‘कोरोना’बाबत केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती मंत्र्यांना देणे, तसेच मंत्र्यांकडून आलेल्या सुचनांची माहिती घेण्याची जबाबदारी डॉ. नितीन करीर पाहणार आहेत.

सरकारच्या विविध खात्यांमार्फत घ्यावयाच्या धोरणात्मक निर्णयांसाठी उपाययोजना करणे, विविध विभागांनी घेतलेले निर्णय राज्यभरातील विविध कार्यालयांना व्हॉट्सअप व ईमेलवरून पाठविणे, विभागीय आयुक्तांकडून आढावा घेणे याबाबतची जबाबदारी अपर मुख्य सचिव राजीव जलोटा यांच्यावर आहे.

राज्यातील आरोग्य विषयक सगळ्या बाबींचे नियंत्रण करण्याची जबाबदारी प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याकडे आहे. सरकारने घेतलेल्या विविध उपाययोजनांची माहिती पत्रकारांना देणे तसेच माहिती तंत्रज्ञानासंदर्भातील खासगी कंपन्यांच्या समस्या जाणून घेणे व त्यांना मार्गदर्शन करणे ही जबाबदारी प्रधान सचिव डॉ. भूषण गगराणी यांच्याकडे दिली आहे.

राज्यातील व एमएमआर क्षेत्रातील बेस्ट, एसटी महामंडळ, महानगरपालिका यांच्याशी समन्वय साधून वाहतुकीचे नियोजन करण्याची जबाबदारी प्रधान सचिव आश्विनी भिडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. खासगी वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी सुद्धा भिडे यांच्याकडेच आहे.

उपचारासाठी राज्यात आस्तित्वात असलेल्या साहित्य व साधनांचा आढावा घेणे, नवीन साहित्य खरेदीबाबत उपाययोजना करणे, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचा आपत्कालिन परिस्थितीत उपयोग करून घेणे, सेवा निवृत्त व अन्य तांत्रिक वैद्यकीय सेवेशी निगडीत लोकांचा उपयोग करून घेणे याबाबतची जबाबदारी सचिव संजय मुखर्जी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

‘कोरोना’च्या ( Coronavirus ) पार्श्वभूमीवर अन्नधान्य व इतर जीवनाश्यक वस्तुंचा पुरवठा नियमित सुरू ठेवण्याची जबाबदारी सचिव संजय खंदारे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन ती मुख्य सचिवांना देणे, विविध संस्था व नागरिकांनी सुचविलेल्या उपायांचे संकलन करणे याबाबतची जबाबदारी सचिव प्राजक्ता लवंगारे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

‘कोरोना’चे ( Coronavirus ) रूग्ण व या रूग्णांबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती आकडेवारीसह संकलित करणे व नियमित स्वरूपात वरिष्ठांना देण्याची जबाबदारी आयुक्त अनुपकुमार यादव यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून येणाऱ्या महत्वाच्या आदेशांची अंमलबजावणी करणे व मंत्रालयातील ‘कोरोना’ नियंत्रण कक्षाचे व्यवस्थापन सांभाळण्याची जबाबदारी किशोरराजे निंबाळकर यांच्यावर सोपविली आहे.

ताज्या अपडेटसाठी आमच्या ट्विटर अकाऊंटला फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Coronavirus Update : साताऱ्यात 2 रूग्ण आढळले

Corona Effect : आर्थिक वर्ष 30 जून, कालावधी वाढविला

Corona पसरविणाऱ्या वटवाघळाला समजून घ्या ( डॉ. महेश गायकवाड )

WHO : कोरोनाची लक्षणे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी