29 C
Mumbai
Monday, September 23, 2024
Homeमहाराष्ट्रवारसा हक्काने नोंद झालेली जमीन ब्राह्मण कुटुंबाने कसणाऱ्या धनगरांच्या नावे केली

वारसा हक्काने नोंद झालेली जमीन ब्राह्मण कुटुंबाने कसणाऱ्या धनगरांच्या नावे केली

टीम लय भारी

सातारा / सोलापूर : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील निढळ हे एक गाव. रामचंद्र जोशी (नावात बदल) हे आपल्या ब्राह्मण कुटुंबासोबत तिथे राहतात. एके दिवशी लवटे आडनाव असलेले धनगर गृहस्थ त्यांना भेटण्यासाठी आले. ‘माळशिरस (सोलापूर) येथे एक जमीन आहे. आमचे पूर्वज कित्येक वर्षांपासून ती ही जमीन कसतात. पण सातबाऱ्यावर तुमच्या कुटुंबांची नोंद आहे. आम्ही त्या जमिनीचा मोबदला द्यायला तयार आहोत. ती आमच्या नावावर केली तर आम्ही आपले आभारी राहू’ अशी विनंती लवटे यांनी केली. त्यानंतर जोशी व त्यांच्या सगळ्या नातेवाईकांनी जो निर्णय घेतला तो अचंबित करणारा होताच, शिवाय इतरांसमोर आदर्श घालून देणाराही होता.

माळशिरस येथील मेडथ या गावात लवटे कुटुंबिय राहतात. या ठिकाणी अनेक वर्षांपूर्वी जोशी यांची पणजी राहत होती. पण जोशी यांनी पणजीला पाहिलेले नव्हते. पणजीची लेक म्हणजे, जोशी यांच्या आजीलाही त्यांनी पाहिलेले नव्हते. जोशी यांचे सध्याचे वय साधारण ६० वर्षे आहे. त्यांच्या आईचे निधन लहानपणीच झाले होते. आईकडून नातेसंबंध असलेल्या पणजीला अन्य कुणी वारसदार नव्हता. त्यामुळे पणजीची साधारण १२ गुंठे जमीन जोशी यांच्या नावावर नोंद झाली होती. जोशी यांच्यासह त्यांच्या अन्य दोन बहिणींचीही नावे सातबाऱ्यावर नोंद झाली होती. मेडथ येथील या जमिनीवर आपली वारसा हक्काने नोंद झाल्याचे या तिन्ही भावंडांना अद्यापपर्यंत ठाऊकच नव्हते. आईकडच्या वारसांनाही त्यांनी कधी पाहिले नव्हते. त्यामुळे जरी जमिनीवर वारसा हक्काने आपली नोंद झाली असली तरी त्यावर आपला हक्क नाही अशी भूमिका जोशी व त्यांच्या दोन्ही बहिणींनी घेतली. गेली कित्येक वर्षे लवटे कुटुंबियांकडे ही जमीन आहे. त्यामुळे जमिनीवर लवटे यांचाच हक्क असल्याचीही भूमिका जोशींनी घेतली.

जोशी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी लवटे कुटुंबियांना सांगितले, त्या जमिनीचा आम्हाला कोणताही मोबदला नको. ती जमीन तुमचीच आहे. तुम्ही सांगाल त्या सरकारी कार्यालयात येऊन आम्ही ही जमीन तुमच्या नावावर करून द्यायला तयार आहोत. जोशी यांच्या या निस्वार्थ प्रतिक्रियेवर लवटे सुद्धा चकीत झाले. जोशी यांनी शब्द दिला त्यानुसार ते पन्नाशी ओलांडलेल्या आपल्या दोन्ही बहिणींसोबत शुक्रवारी माळशिरसला गेले. तेथील तहसिल कार्यालयात त्यांनी हक्कसोड प्रतिज्ञापत्र दिले, अन् ती १२ गुंठे जमीन लवटे कुटुंबियांना देऊन टाकली.

जोशी व त्यांच्या दोन्ही बहिणींच्या या उदार स्वभावामुळे लवटे कुटुंबिय सुद्धा सद्गदीत झाले. त्यांनी या बहिणींना साडीचोळी देऊन मानपान केला. १५० किलोमीटर दूरवरून आलेल्या या भावंडांना त्यांनी आग्रहाने आपल्या घरचे जेवणही खाऊ घातले.

सध्याच्या चंगळवादी संस्कृतीमध्ये जमिनीसाठी सख्खी भावंडेही भांडतात. जमीन, संपत्ती यासाठी भांडणे होतात. अशा परिस्थितीत स्वतःच्या नावावर असलेली जमीन आपली नाहीच अशी भूमिका घेऊन ती कसणाऱ्यांच्या नावे करणारी उदाहरणे फारच कमी आहेत. जोशी व त्यांच्या कुटुंबियांचे त्यामुळेच कौतुक केले जात आहे.

याबाबत जोशी यांना संपर्क साधला असता ते म्हणाले की, निस्वार्थ भावनेने आम्ही हे काम केले आहे. लवटे कुटुंबियांना देऊन टाकलेल्या जमिनीचे मला कसलेही श्रेय नको आहे. या कामाचा प्रचार व्हावा अशीही माझी इच्छा नाही.

हे सुद्धा वाचा

अजितदादांना भेटण्यासाठी तुडुंब गर्दी, मंत्रालयाबाहेरही लांबलचक रांगा

VIDEO : राजू शेट्टी यांचा घणाघात : भाजप सरकारचा ‘हा’ चांगला निर्णय महाविकास आघाडीने सूडबुद्धीने बदलला

शेतकऱ्यांना अडचणी मांडण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कक्ष, आलिबागमध्ये झाली सुरूवात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी