27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयअजित पवार यांचा पुणे पालकमंत्री पदावर दावा; चंद्रकांत पाटील यांचे ‘पालकमंत्रीपद’ धोक्यात!

अजित पवार यांचा पुणे पालकमंत्री पदावर दावा; चंद्रकांत पाटील यांचे ‘पालकमंत्रीपद’ धोक्यात!

अजित पवार यांचे लाड भाजपा पुरवायला लागल्यापासून शिवसेना एकनाथ शिंदे गट काहीसा सावध झाला आहे. अजित पवार यांना अर्थमंत्री पद देऊ नये, यासाठी शिंदे गटातील एक गट आक्रमक झाला आहे. दुसरा गट आपल्या पदरातील चांगली खाती राष्ट्रवादीला देऊ नका असा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करत आहे. यात मुख्यमंत्री शिंदे यांचे सँडविच झालेले असताना, अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदावर दावा केल्याने विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे हे पद धोक्यात आले आहे.

महाविद्यालयीन जीवनात चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एबीव्हीपीत सक्रिय होते. शिवाय शहा यांची सासुरवाडी कोल्हापूर असल्याने पाटील यांच्याकडे भाजपचे राज्यातील नेते शहा यांचा दूत म्हणून पाहतात. आता पालकमंत्री पद वाचवण्यासाठी पाटील हे अजित शहा यांची मनधरणी करतात का, यावर त्यांचे हे पद वाचू शकते असे बोलले जाते. हे पद राखण्यास भाजपला यश न् आल्यास पुण्यातील वर्चस्वाला धक्का बसण्याची मोठी शक्यता आहे.

आरएसएसच्या तालमीत तयार झालेले पुण्याचे विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सलग तेरा वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अ.भा.वि.प.) पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून काम केले आहे. अभाविपमध्ये कार्यरत असताना त्यांना यशवंतराव केळकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सहवासात भाजपाने संघटनात्मक कार्याची जबाबदारी दिल्यानंतर कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये त्यांनी पक्षाचा पाया विस्तारला. २००८ मध्ये ते पुणे पदवीधर मतदारसंघातून प्रथमच विधान परिषदेवर निवडून आले.

२०१४ मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर त्यांच्यावर भाजप प्रदेश उपाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी आली. पण भाजपला त्यांना विधान सभेची उमेदवारी द्यायची होती. त्यामुळे सुरक्षित मतदारसंघ म्हणून कोथरुडची जागा निश्चित केली आणि विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना भाजपने घरी बसवले. सिटिंग आमदार कुलकर्णी यांनी अश्रू ढाळून पक्षासाठी काम करण्याचे ठरवले. पण त्यांच्या कार्यकर्त्यांना वाईट वाटले. असे असताना चंद्रकांत पाटील यांच्यासाठी या मतदार संघातील कार्यकर्त्यांनी काम केले. पाटील निवडून आल्यावर शहा यांचे खास असल्याने त्यांना नगरविकास, अर्थ, महसूल यापैकी एखादे महत्वाचे खाते मिळेल, असे वाटत होते. पण सार्वजनिक बांधकाम हे खाते देण्यात आले.

हे सुद्धा वाचा

‘फेसबुक गेम’ चित्रपटातून उलगडणार मर्डर मिस्ट्रीचा थरार

महापालिकांच्या दोन हजार शाळांमध्ये सरकार व्यायामशाळा उभारणार; भाजपची मुंबई पालिकेची जोरदार तयारी

महिला आणि पुरुष थोडा फरक येतो; अदिती तटकरें विषयी बोलताना भरत गोगावले यांचे महिलांबाबत आपमानस्पद विधान

दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत पक्षात कुरबुरी वाढल्या होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दोन महिन्यांपूर्वी पुण्यात कार्यकारिणीची आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी, आमदार, खासदारांनी पक्ष विस्तारासाठी ‘त्याग’ करण्याची भूमिका ठेवावी, असे आवाहन केले होते. त्यामुळे पुण्यातून चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्रीपदाचा त्याग करावा लागेल, असे चित्र दिसत आहे. दरम्यान, अजित पवार यांना अर्थ खाते देण्यावरून शिवसेना एकनाथ शिंदे गट नाराज आहे. त्यामुळे फडणवीस यांचीही गोची झाल्याने हे प्रकरण दिल्लीश्वराकडे पाठवण्यात आले असून् तिथून आदेश मिळताच मंत्री मंडल विस्तार आणि खाते वाटप होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी