28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रअरेरे : गुजरातवरून आलेला मृतदेह कर्नाटकने नाकारला, महाराष्ट्राने अंत्यसंस्कार केले

अरेरे : गुजरातवरून आलेला मृतदेह कर्नाटकने नाकारला, महाराष्ट्राने अंत्यसंस्कार केले

सुरेश डुबल : टीम लय भारी

कराड : कोरोना (Coronavirus) महामारीमुळे अख्या जगाचा कायापालट होऊ लागला आहे. एरवी समूहाने राहणारा माणूस आता आपापसात अंतर ठेवू लागला आहे. या काळात माणुसकीचा हात देणे गरजेचे असताना कर्नाटकात माणुसकीची व्याख्या धुळीला मिळवल्याचे समोर आले आहे. कर्नाटक पोलिसांनी कामानिमित्त बाहेर असणा-या त्यांच्याच राज्यातील इसमाचा मृतदेह राज्याच्या सीमेवरून आत घेण्यास नकार दिला. मृतदेहाची दोन दिवस हेळसांड झाली. अखेर तिस-या दिवशी कराडच्या येथे या मृतदेहाचे दफन करण्यात आले.

असिफ लतीफ सय्यद (वय 54) असे त्या अभाग्याचे नाव. कर्नाटक येथील कारवार हे असिफ यांचे मूळ गाव. मात्र ते नोकरी निमित्ताने गुजरातला स्थायिक झाले होते. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी गावी न येता आहे तेथेच राहणे पसंत केले. मात्र तीन दिवसांपूर्वी त्यांचे हार्ट अॅटकने गुजरातला रात्री निधन झाले. निधनानंतर त्यांचा मृतदेह कागदोपत्री सोपस्कर पूर्ण करुन कर्नाटकला रवाना केला. मृतदेह घेऊन जाणारी गाडी लॉकडाऊनच्या नियमामुळे कर्नाटक पोलिसांनी अडवली. त्यामुळे सय्यद यांचा मृतदेह त्यांच्या मुळगावी कारवारला पोचलाच नाही.

मृतदेह घेवून रूग्णवाहीका मध्यरात्री पुन्हा कोल्हापूरला आली. तेथे दफनविधी करण्याचे निश्चित झाले. मात्र तेथील पोलिसांनी याला आडकाठी घेत घटनेचे गांभीर्य व आवश्यकता न ओळखता त्यांचा मृतदेह दफन करण्यास नकार दिला. त्यामुळे पुन्हा मृतदेहाची हेळसांड सुरू झाली. मात्र असिफ सय्यद यांच्या मित्रांनी कराडच्या मुस्लीम बांधवांना याबाबत माहिती दिली. मुस्लिम समाजाने लगोलग त्यांच्या मृतदेहाचे दफन कराड येथे करण्यासाठी पुढाकार घेतला. पोलीसांची परवानगी घेतली. कराडच्या मुस्लिम समाजातील काही लोकांनी दाखवलेल्या माणुसकीने अखेर येथील इदगाह मैदानात मृतदेहाची हेळसांड थांबली अन मृत असिफ सय्यद यांचा दफनविधी पार पडला.

मूळचे कर्नाटक येथील रहिवाशी असलेले असीफ सय्यद हे नोकरी निमित्त गुजरातला होते. कर्नाटकातील कारवार हे त्यांचे मुळगाव आहे. त्यांचे 17 मे रोजी रात्री हार्ट अॅटकने निधन झाले. सय्यद यांचे कोणीच नातेवाईक नसल्याने गुजरात मधील सय्यद यांचे मित्र व तेथील सामाजिक कार्यकर्ते मुबारक व मकबूल यांनी त्यांच्या मृतदेहाचे कागदपत्रांचे सोपस्कर पूर्ण करून तो मृतदेह ताब्यात घेतला. मृत्यूचा दाखला, दवाखान्याची परवानगी, राज्य ओलांडण्याची परवानगी घेवून सय्यद यांना रूग्णवाहीकेतून घेवून मुबारक व मकबुल कारवार या सय्यद यांच्या मुळगावी निघाले. महाराष्ट्रात प्रवेश करताना त्यांना काहीही अडचण आली नाही. मात्र कर्नाटकात त्यांना प्रवेश नाकारला. कोगनळी येथे कर्नाटकच्या सीमेवर सय्यद यांना घेवून निघालेली रूग्णवाहीका पोलिसांनी अडवली. सर्व कागदपत्रे असतानाही मुळच्या कर्नाटकातील नागरीकालाच कर्नाटक पोलिसांनी प्रवेश नाकरला. यापेक्षा दुर्दैवं ते काय.

प्रवेश नाकारल्याने तेथून परतलेल्या रूग्णवाहीकेतील मुबारक यांनी कोल्हापूरला मुस्लीम बोर्डाचे गणी अजरेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांना याबाबत माहिती सांगितली व कागदपत्रेही दाखवली. त्यावेळी आजरेकर यांनी सय्यद यांच्या कुटूंबियाच्या लेखी संमतीने बागल चौकातील दफनभूमीत विधी करण्यास मंजुरी दिली. त्याबाबत त्यांनी कोल्हापूर पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक देशमुख कर्नाटक पोलिसांशी बोलत असतानाच तोपर्यंत कर्नाटक पोलिसांनी ती रुग्णवाहीका हायवेवरुन थेट पेठवडगाव येथे आणून सोडली होती. तोपर्यंत सांगलीचीही हद्द आली होती. त्यावेळी कोल्हापूरचे आजरेकर यांनी कराडच्या इकबाल संदे यांच्याशी संपर्क साधला. संदे यांनी त्याची माहिती कब्रस्तान ट्रस्टींना दिली. ज्येष्ठ नगरसेवक फारूक पटवेकर यांनी त्यात पुढाकार घेतला. त्यांना सामाजिक कार्यकर्ते इरफान सय्यद, हाजी बरकत पटवेकर, साबीरमिया मुल्ला, झाकीर शेख यांनी पुढाकार घेतला. कर्नाटकच्या सय्यद यांची कागदपत्र पाहिली. त्यांचा पोस्ट मार्टम अहवाल, मृत्यूचा दाखला व त्यांच्या नातेवाईकांची लेखी परवानगी पाहिल्यानंतर मध्यरात्री अडीचच्या सुमारास येथील दफनभूमीत अंतीम विधी झाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी