35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजEntertainment : इनडोअर खेळांसह चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरु होणार, राज्य सरकारची अनलॉक संदर्भात...

Entertainment : इनडोअर खेळांसह चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरु होणार, राज्य सरकारची अनलॉक संदर्भात नवी नियमावली प्रसिद्ध

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेसह (Entertainment) ५ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहेत. कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या सगळ्या थिएटर्सना, नाट्यगृहांना आणि मल्टिप्लेक्सना ही संमती देण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. कोरोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोन वगळता तरण तलावही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. मात्र मल्टिप्लेक्स, नाट्यगृह, सिनेमागृहात खाण्याचे पदार्थ घेऊन जाता येणार नाही.

मार्च महिन्याच्या मध्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थिएटर्स, नाट्यगृहे, शाळा सगळे बंद करण्यात आले होते. आता अनलॉकच्या पार्श्वभूमीवर हळुहळू अनेक आस्थापनांना संमती देण्यात येत आहे. याचसोबत कोरोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या योगा इन्स्टिट्यूट आणि इन डोअर स्पोर्ट्सनाही संमती देण्यात आली आहे.

थिएटर्स सुरु करण्यात येणार असले तरीही कोरोना संदर्भातले सुरक्षेचे सगळे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. कंटेन्मेंट झोन म्हणजेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असणा-या थिएटर्स, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे उघडण्यास संमती देण्यात आली आहे. अनलॉक ५ मध्ये ठाकरे सरकारने हॉटेल आणि रेस्तराँ ५० टक्के क्षमतेसह सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.

राज्य सरकारने बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश या इनडोअर खेळांसह इनडोअर शूटिंग रेंज सुरू करण्यासही परवानगी दिली आहे. सॅनिटायझेशनची व्यवस्था आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून खेळाडूंना या ठिकाणी सराव करता येईल.

राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सरावासाठी जलतरण तलाव सुरू करण्यासही राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र कंटेन्मेंट झोनमधील जलतरण तलाव बंदच राहतील.

कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असणारी योगा अभ्यास केंद्रं सुरू करण्याची मुभादेखील देण्यात आली आहे. यासाठीची नियमावली सार्वजनिक आरोग्य विभाग जारी करेल. त्यासाठी हा विभाग केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीचा आधार घेईल, असे सरकारने पत्रकात म्हटले आहे. गेल्या सात महिन्यांपासून राज्यातील चित्रपटगृहं, नाट्यगृहं बंद आहेत. त्यामुळे या क्षेत्राचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. फिजिकल डिस्टन्सिंगसह अन्य नियम पाळून चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्सेस सुरू करण्याची मागणी या क्षेत्रामधून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर राज्य सरकारने मनोरंजन क्षेत्राला दिलासा दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी