27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeक्राईममुंबईत वसतीगृहातील मुलीसोबतच्या दुर्देवी घटनेनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले

मुंबईत वसतीगृहातील मुलीसोबतच्या दुर्देवी घटनेनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले

मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई फुले शासकिय वसतीगृहात 19 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली. त्यानंतर महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरुन विरोधकांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, विरोधीपक्ष नेते अजित पवार, शिवसेना (ठाकरे गट) आमदार मनीषा कायंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी याघटनेनंतर प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, ही घटना अत्यंत दुर्देवी असून महिला सुरक्षेबद्दल केंद्र आणि महाराष्ट्र सरकार गंभीर नाही. मला असे वाटते जिथे महिलांचे होस्टेल आहे, तिथे कॅमेरे, चांगली लॉकिंग सिस्टम मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलेच पाहिजे. त्यामुळे सातत्याने मुलींच्या किंवा महिलांच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारचा जो अप्रोच आहे, त्याच्यात ते सिरीयस दिसत नाहीत. या घटनेत ज्याने कृत्य केले आहे, त्याने देखील आत्महत्या केली आहे. त्यामुळे होस्टेलने तातडीने बिल्डिंगची सेफ्टी, सुक्योरिटी म्हणजे मुलींसाठी हेल्पलाईन्स, आलार्म बेल अशी काही रचना आणि कॅमेरे हे प्राधान्याने महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी सरकारने लवकर निर्णय घेतला पाहिजे. बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा देणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारचे हे अपयश अल्याचे त्या म्हणाल्या.

या घटनेवर बोलताना अजित पवार म्हणाले, मुली शिकणाऱ्या असतील अथवा नोकरी करणाऱ्या असतील ज्यांना राहण्याची जागा नाही, सुरक्षित वाटत नाही अशाप्रकारच्या मुली तेथे येऊन राहतात आणि त्या वसतीगृहाला वेगळा नावलौकीक आहे, मरिन ड्राईव्ह वरुन आपण ज्यावेळी गिरगाव चौपटीवर, राजभवनवर किंवा मुख्यमंत्री, मंत्री राहतात तिकडे जातो. त्यामुळे हा रस्ता सतत रहदारीचा असा रस्ता आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मुंबई कधी झोपत नाही. अशा ठिकाणी एका विदर्भातील निष्पाप मुलीवर अन्याय केला जातो. तिथे माहिती घेतली असता, तिथल्या गार्डनेच माणूसकीला काळीमा फासणारे कृत्य केले. खरे तर सरकारला अतिशय शरमेने मान खाली घालणारी अशी ही बाब आहे, घटना सातत्याने वाढत आहेत. सरकार खंबीर भूमिका का घेत नाही, हे खरेतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी या निमित्ताने सवाल विचारू इच्छितो की, आपण देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याची राजधानी असणाऱ्या मुंबईत पहाटे पहाटे अशा घटना घडतात, मुंबईच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यात मुलींना मुलांना किंवा स्त्रीयांना सुरक्षित असे वाटत नाही. याला पोलीस जबाबदार आहेत, सरकार जबाबदार आहे, सरकार कठोर भूमिका घेताना दिसत नाही.

शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या, मुंबईतील मरिन ड्राईव्हवर मुलींचे सरकारी वसतीगृह आहे, या ठिकाणी चौथ्या मजल्यावर मुलीचा मृतदेह आढळला आणि बलात्कार केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला असे पोलिसांचे म्हणणे आहे. जो संशयीत आहे, त्याचा देखील मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला. परंतू प्रश्न असा आहे, या मुलीने वारंवार वसतीगृहाच्या वॉर्डनकडे तक्रार केली होती आणि तक्रार करुन देखील तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाले हे अक्षम्य आहे. आपले गृहमंत्री म्हणतात चौकशीचे आदेश दिले आहेत. परंतू या अनुशंगाने महाराष्ट्रातील सर्वच होस्टेल्सची तपासणी झाली पाहिजे. तिकडे सीसीटीव्ही आहे का, कोणत्याप्रकारचे सुरक्षा रक्षक आहेत, कोणती एजन्सी आहे. तसेच होस्टेलची जी वॉर्डन आहे तीला कामावरुन काढून टाकले पाहिजे. एफआयआर झालेला आहेच पण शिक्षा झाली पाहिजे,

नाना पटोले यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांचे निवसस्थान असणाऱ्या मलबार हिल पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वसतीगृहात दिवसाढवळ्या एका विद्यार्थिनीवर अत्याचार करुन तिची हत्या केली जाते ही महाराष्ट्राला लाज आणणारी बाब आहे. मात्र सत्तेवर बसलेल्या लोकांन याच काहीच वाटत नाही, ही अत्यंत दुर्देवाची गोष्ट आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, मंत्रालयापासून पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या सावित्रीबाई फुले हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या अकोला येथून मुंबईत शिकायला आलेल्या दलित मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली. राज्यात कायदा व सुव्यस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. या राज्यात महिला, तरुणी, आदिवासी, दलित सुरक्षित नाहीत.

हे सुद्धा वाचा

मुंबईत 19 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार करुन हत्या; आरोपी सुरक्षारक्षकाने रेल्वेखाली केली आत्महत्या

जपानी नागरिक पैसे देऊन घेतायत हसण्याचे धडे; जाणून घ्या काय आहे नेमकं कारण,…

अवतार 2 आता ओटीटी फ्लॉटफॉर्मवर होणार प्रदर्शित, जाणून घ्या कधी आणि कुठे येणार पाहता ?

विधानपरिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे की, मुंबई येथे एका शासकीय वसतीगृहात एका मुलीचा मृतदेह सापडलेला आहे, यातील जो संशयीत आरोपी आहे त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला आहे. या सावित्रीबाई फुले वसतीगृहामध्ये मी स्वत: 1976-77 च्या काळात काही दिवस वास्तव्य केले आहे. मुलींच्या थोड्याफार तक्रारी असल्या तरी तिथे राहणाऱ्या मुली अतिशय धीट आणि थोडी जरी चुकीची गोष्ट वाटली तरी ताबडतोब तक्रारी करणाऱ्या आणि चांगल्या पद्धतीच्या शिक्षणामध्ये प्रगती करणाऱ्या असणाऱ्या असा माझा अनुभव आहे. त्याच्यामुळे मुलींच्या संदर्भात प्रचंडमोठा हादरा सुरक्षिततेला बसला आहे. मी या घटनेचा निषेध करतेच आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी निवेदन दिले आहे, या घटनेच्या पाठीमागे अजून कोणी आरोपी आहे का याचा शोध घ्यावा आणि सध्या वसतीगृहात सुरक्षिततेची प्रणाली युद्धपातळीवर अंमलबजावणी झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे. मुलीच्या कुटुंबियांच्या आम्ही पाठीशी आहोत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी