28.3 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमंत्रालयबाळासाहेब थोरातांनी माहिती जनसंपर्क विभागाला फटकारले

बाळासाहेब थोरातांनी माहिती जनसंपर्क विभागाला फटकारले

टीम लय भारी

मुंबई : सरकारी प्रसिद्धीपत्रकात औरंगाबादऐवजी संभाजीनगर असा उल्लेख माहिती व जनसंपर्क विभागाने केला. त्याची गंभीर दखल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी घेतली आहे. थोरात यांनी माहिती व जनसंपर्क विभागाचे कान उपटणारे ट्विट केले आहे.

माहिती व जनसंपर्क विभागाने शहरांचे परस्पर नामांतर करू नये. सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तावेज असतो याचे भान बाळगावे, अशा शब्दांत थोरात यांनी माहिती व जनसंपर्क विभागाला समज दिली आहे.

थोरात यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे,’ असं थोरात यांनी ठणकावून सांगितलं आहे.

‘माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही,’ ही आठवण त्यांनी मित्रपक्ष शिवसेनेला करून दिली आहे.

‘छत्रपती संभाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचं राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या नामांतराचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आला आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये या मुद्द्यावरून मतभेद आहेत. शिवसेना नामांतराबद्दल आग्रही आहे तर, काँग्रेसचा त्यास विरोध आहे. ही संधी साधून भाजपनं हा मुद्दा लावून धरला आहे. त्यातच मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटवरून राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ करण्यात आल्यामुळं काँग्रेस कमालीची संतप्त झाली आहे. बाळासाहेब थोरात यांनी तात्काळ ट्वीट करून नाराजी बोलून दाखवली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी