31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमंत्रालयबाळासाहेब थोरात म्हणजे लोभस राजहंस, अधिकाऱ्याने व्यक्त केल्या भावना

बाळासाहेब थोरात म्हणजे लोभस राजहंस, अधिकाऱ्याने व्यक्त केल्या भावना

टीम लय भारी

‘महाविकास आघाडी सरकार’ पायउतार झाले. त्यामुळे सर्व मंत्र्यांनी निरोप घेतले आहेत. मावळते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही सोमवारी अधिकाऱ्यांसोबत निरोपाची बैठक घेतली होती. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील महसूल विभागाचे उपसचिव श्री. अजित देशमुख यांनी थोरात यांच्याविषयी भावना व्यक्त करणारा लेख लिहिला आहे. तो आम्ही जसाच्या तसा प्रसिद्ध करीत आहोत.

थोरात साहेबांनी सोमवारी संध्याकाळी महसूल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांना आवर्जून बोलावून घेतले. सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक छोटेखानी निरोप समारंभ आयोजित केला होता. विभागांतर्गत झालेल्या चांगल्या निर्णयांचा परामर्श घेताना समाधान व्यक्त करताना काही अपरिहार्य कारणांमुळे, वेळेच्या अभावाने, कोरोना महामारीमुळे जनहिताचे काही व्यापक निर्णय पूर्णत्वास जाऊ शकले नाहीत याबाबत त्यांनी मनोमन खंत व्यक्त केली. हे निर्णय पूर्णत्वास नेण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. विभागातील अधिकार्‍यांनी केलेल्या सहकार्याबद्दल खुल्या मनाने आभार मानले.

मी तसा साहेबांच्या मतदारसंघातील आहे. साहेबांनी आमच्या परिसरात सहकारी चळवळीच्या आणि आपल्या सुमारे 37 वर्षाच्या प्रदीर्घ आमदारकीच्या माध्यमातून अत्युच्च दर्जाच्या साखर, दूध, वित्तीय संस्था, शिक्षण संस्था उभारल्या आहेत. रस्ते, शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी उभारलेली धरणे, पाणी पुरवठा योजना, इतर इन्फ्रास्ट्रक्चर व विकासाच्या क्षेत्रातील विक्रमी कामे या रूपाने एक समृद्ध मतदार संघ नावारूपाला आणला आहे.

त्यांच्या रूपाने आम्ही निश्चितच कृतकृत्य झालो आहे. पण त्यांनी राज्याच्या प्रशासनात जे आदराचे, अजातशत्रूत्वाचे, असामान्य दूरदर्शीपणा याचे जे निर्विवाद स्थान प्राप्त केले आहे त्यामागची साहेबांची दृढ साधना, तळमळ, संवेदनशीलता मागील अडीच वर्षात अगदी जवळून पहायला मिळाली.

त्यांचा संयम, उदार – उमदेपणा, अभ्यासू वृत्ती, नितळ स्वभाव हे सर्व लोभसवाणं होत. त्यांनी व्यापक धोरणे आखताना आम्हाला खूप स्वातंत्र्य, आत्मविश्वास दिला. मार्गदर्शन केले. चुकीच्या गोष्टींचा कधीच आग्रह धरला नाही. त्यामुळे आमच्यात एक आत्मियता आणि परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण झाले. आणि त्यातून अनेक चांगले – क्रांतिकारक निर्णय झाले. त्याची अंमलबजावणी झाली.
साहेबांनी आमची प्रत्येकाची मनापासून चौकशी केली. आग्रहाने खाऊ घातले. चहा पाजला. स्वतःच्या राजकीय कारकिर्दीत घडलेले मजेशीर किस्से मोकळेपणाने सांगताना राजकीय अपरिहार्यता बाबतच्या प्रांजळ कबुली दिल्या. व्यक्त होताना कृत्रिमपणाचा, दिखाऊपणा याचा कुठेही लवलेश नव्हता. अंगभूत साधेपणा, सच्चेपणा होता.

आमचा प्रवास साहेबांच्या आस्थापनेवर असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अधिक सहज, सुखद केला. आम्ही सर्वजण उद्यापासून साहेब खात्याचे मंत्री नसणार या कल्पनेने हिरमुसले झालेलो होतो. साहेब खऱ्या अर्थाने राजकारणातील राजहंस आहेत ही भावना मनात तरळत होती.
अजित सोपानराव देशमुख, उपसचिव, महसूल विभाग, मंत्रालय.

हे सुध्दा वाचा :

दिल्लीहून दुबईला जाणारे विमान कराची विमानतळावर उतरवले

फडणवीस आणि शहा यांच्यात नेमकं बिनसलंय काय ?

बाळासाहेब थोरातांच्या कन्येने मनसे नेत्याला फटकारले!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी