31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeमहाराष्ट्रया कारणामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद!

या कारणामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद!

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशात सलग तीन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात कोरोना लसींचा केवळ दोन दिवस पुरेल, इतकाच साठा उपलब्ध आहे. राज्यात अनेक ठिकाणी लसींचा साठा संपल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. राज्यात सातारा, सांगली, कोल्हापूर, पनवेलसह अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहे. तर पुणे, मुंबई, नागपूर आणि सोलापूर जिल्ह्यात दोन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक राहिला आहे. पुण्यातही काल काही भागातील लसीकरण केंद्रांवरुन लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना परतावे लागल्याचा प्रकार घडला. त्यामुळे या मुद्द्यावरुन केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष पुन्हा तापण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अनेकांनी केंद्र सरकारला लसींचा पुरवठा करण्याबाबत विनंती केली आहे.

राज्यात अनेक भागात लसीकरण केंद्र बंद

राज्यात फक्त २ ते ३ दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापुरातील लसीकरण केंद्रांवर लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण केंद्र बंद करावी लागली. त्यापाठोपाठ संध्याकाळच्या सुमारास पनवेलमधील लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली. पनवेल महापालिकेकडून त्याबाबत एक पत्रकच जारी करण्यात आले.

पनवेल महापालिकेचे पत्रक

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोविड -१९ लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु आहे. परंतु लसींचा तुटवडा असल्याकारणाने पुढील लस उपलब्ध होईपर्यंत सर्व शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रामध्ये लसीकरण कार्यक्रम बंद राहील, याची नोंद घ्यावी, असे पनवेल महापालिकेकडून सांगण्यात आले.

सुप्रिया सुळेंची डॉ. हर्षवर्धन यांना विनंती

“राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल ट्वीट करुन पुण्यातील लसीकरण केंद्राची माहिती दिली. पुणे जिल्ह्यात काल ५५ हजार ५३९ जणांना ३९१ केंद्रांवर लस दिली गेली. तर लसीकरण केंद्रांवरील लसीचा साठा संपल्यामुळे हजारो लोकांना लस न घेताच परतावे लागले”, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

“कोरोना लस उपलब्ध नसल्यामुळे १०९ लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली होती. लसीचा साठा नसल्यामुळे लसीकरणाचा वेग हरवला जाऊ शकतो. जीव वाचवण्यासाठी, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था लवकरात लवकर परत आणण्यासाठी प्रत्येक गरजू व्यक्तीला लस देण्याचा आमचा निर्धार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना विनंती आहे की, कोरोना लसीबाबत त्यांनी महाराष्ट्राची मदत करावी”, असे आवाहन ही सुप्रिया सुळे यांनी डॉ. हर्षवर्धन यांना केले आहे.

आठवड्याला ४० लाख लसी हव्या आहेत : राजेश टोपे

डॉ. हर्षवर्धन यांच्याशी बोललो. महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख वॅक्सिन लागतात. त्यामुळे ती दिली जावीत. सातारा, सांगली, पनवेलला लसीकरण बंद पडले. लसीकरणाची केंद्र वाढवली. या गोष्टी हर्षवर्धन यांना कळवल्या. महाराष्ट्राला साडे सात लाख आणि इतर राज्यांना जास्त लसी का? असा सवाल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. केंद्र सरकार मदत करत आहे. पण जशी मदत करायला हवी तशी मदत होत नाही. महाराष्ट्र आणि गुजरातची तुलना केली असता. गुजरातची लोकसंख्या किती? महाराष्ट्राची लोकसंख्या किती? गुजरातला १ कोटी लसी दिल्या आणि महाराष्ट्राला १ कोटी ४ लाख लसी दिल्या, असे ही टोपे म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी