29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणखेडोपाड्यात 5 जी पोहोचले, पण रोह्यातील 'या' गावात 13 वर्षांपासून पाण्यासाठी वणवण

खेडोपाड्यात 5 जी पोहोचले, पण रोह्यातील ‘या’ गावात 13 वर्षांपासून पाण्यासाठी वणवण

खेडोपाड्यात 5 जी पोहोचले, पण आमच्या बौध्दवाडीत अजून पाणी पोहोचले नाही!…. ही व्यथा आहे रोह्याच्या तळाघरमधील ग्रामस्थांची. त्यामुळेच की काय घोटभर पाण्यासाठी गुरुवारी (दि. १५ जून) सकाळी ११.००वा .ता. रोहा, जि.रायगड, तहसील कार्यालयाच्या आवारात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच सुस्त सरकारी यंत्रणा आणि असंवेदनशील प्रशासकीय व्यवस्थेचा जाहीर निषेध करण्यात येणार आहे.

रायगडचा विकास झपाट्याने होत असल्याची लोणकढी थाप आमदार, खासदार मारत असताना गेली १३ वर्षे तळाघर, बौद्धवाडी (वैशाली नगर) येथे पाण्यासाठी संघर्ष चालू आहे. पण अजूनही बौद्धवाडी पाण्यापासून वंचितच आहे. खेडोपाड्यात 5 जी पोहोचले, पण आमच्या बौध्दवाडीत अजून पाणी पोहोचले नाही…अशी व्यथा स्थानिक ग्रामस्थांनी मांडली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबागपर्यन्त एमएमआरडीएत आले आहे. त्यातच दिल्ली-अलिबाग -विरार कॉरिडोरचे काम वेगाने सुरू आहे. येत्या काळात हा महामार्ग सुरू झाल्यावर रायगडमध्ये नवी क्रांती येणार आहे. रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. एकीकडे नवी मुंबई विमानतळाचे काम वेग घेत आहे.

दुसरीकडे नैना प्रकल्पामुळे रायगड मुंबईला जोडले जात आहे. त्यामुळे येत्या काळात रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. पण रोहयासह रायगडातही पाण्याची समस्या मोठी आहे. 1 हजार 92 गावे आणि पाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी 3 कोटी 3 लाखांचा उपाययोजना आराखडा तयार केला होता. असे असताना रायगडात एकीकडे विकास होत असल्याचे गोंडस चित्र उभे करताना पाणीटंचाईने रोहयातील तळाघर, बौद्धवाडी (वैशाली नगर) पाण्यासाठी तळमळत आहे हे त्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे अपयश असून आगामी विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून ग्रामस्थ हिसका दाखवण्याच्या तयारीत आहेत.

गेली १३ वर्ष आमच्या बौद्धवाडीत पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे एक किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते. एका हंड्यासाठी स्थानिक लोकांचे पाणी भरून झाल्याशिवाय आमचा नंबर येण्याकरिता प्रचंड कसरत करावी लागते. त्यातून प्रसंगी किरकोळ वाद, मानसिक आणि शारीरिक त्रास होतो. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही पाण्यासारख्या मूलभूत सुविधांसाठी आम्हा बौद्धांना संघर्ष करावा लागतोय. बिसलरीचं पाणी आणि इंटरनेट गावागावात पोहोचलं पण हाकेच्या अंतरावर एमआयडीसी आणि कुंडलिका नदी असलेल्या आमच्या बौद्धवाडीत मात्र अद्याप पाणी पोहोचलं नाही.याबाबत २०१३ पासून ते २०२० पर्यंत प्रशासनाकडे अर्ज,तक्रार,विनंती करून लेखणी झिजली पण आमची साधी दखलही घेतली गेली नाही, अशी स्थानिकांची तक्रार आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकरी आंदोलनावेळी सरकारचा ट्विटरवर दबाव; माजी सीईओच्या आरोपानंतर राजकारण तापले

चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने उरकला साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे त्याची जीवनसाथी

मुंबई- पुणे एक्सप्रेसवर मोठा अपघात, ऑइल टॅंकरला आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

२६ जून २०१९ रोजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे पत्रही रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवण्यात आले. पुन्हा आम्ही २२ नोव्हेंबर २०२१ रोजी तहसीलदारांना स्वतंत्र पाईपलाईन देऊन नळ जोडणीची व्यवस्था करणे बाबत अर्ज केला. ७ मार्च २०२२ रोजी जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी साहेब रायगड,अलिबाग आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड यांनाही अर्ज केला. परंतु कोणतीच दखल घेतली गेली नाही, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी