27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात महाविकास आघाडीला पसंती; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सहानुभूती

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पसंती; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सहानुभूती

राज्यात गेल्या चार वर्षांपासून ‘सत्ता पे सत्ता’ असा खेळ सुरू आहे. सन २०१९ च्या निवडणुकीनंतर कोणीही विचार केला नसेल असे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीचे सरकार अडीचवर्षे टिकले. कोरोना महामारीचे संकट टळते न टळते तोच मोठा राजकीय भुकंप करत एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेत बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वर्ष होते तोच अजित पवारांनी राष्ट्रवादीत भुकंप करत नऊ आमदारांसह सत्तेत सामील होत उपमुख्यमंत्री झाले. सत्तेची ही लचकेतोड मात्र मतदारांना पसंत नसल्याचे दिसून आले आहे.

साम सकाळने आज एक सर्व्हे करत जनतेचा कौल जाणून घेतला. यामध्ये पक्षफोडाफोडीला जनता वैतागल्याचे दिसून आले. तसेच भाजपसोबत सहभागी झालेले शिंदे-पवार गट यांच्याबाबत जनतेचा टक्का कमीच असल्याचे दिसून येत आहे. या उलट शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना जनतेची सहानुभूती मिळत असल्याचे या सर्व्हेवरुन दिसून आले. साम टीव्हीने केलेल्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) राष्ट्रादी (शरद पवार गट) ला जनतेची सर्वाधिक पसंती असून महाविकास आघाडीला 41. 5 टक्के जनतेची पसंती असून महायुती भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) शिवसेना (शिंदे गट) यांना 37.4 टक्के जनतेने पसंती दर्शविली आहे.

राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनी हा सर्वे करण्यात आला असून जर 2024 साली मतदान केले तर कोणत्या पक्षाला पसंती राहिल या प्रश्नावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 14.9 टक्के जनतेने पसंती दिली आहे, तर भाजपला 26.8 टक्के जनतेने पसंती दिली आहे. काँग्रेसला 19.1 टक्के, शिवसेना (ठाकरे गट) 12.7 टक्के, शिवसेना (शिंदे गट) 4.9 टक्के, राष्ट्रवादी (अजित पवार गट) 5.7 टक्के, मनसे 2.8 टक्के, वंचित 2.8 टक्के तसेच इतर (शेकाप, एमआयएम, स्वाभिमानी, प्रहार, बविआ, केसीआर, आप) यांना 10.3 टकके जनतेने पसंती दिली आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना पहिली पसंती

मुख्यमंत्रीपदासाठी जनतेने दिलेल्या पसंतीमध्ये पहिले स्थान देवेंद्र फडणवीसांनी पटकावले आहे (21.9%) त्यानंतर उद्धव ठाकरे (19.4) टक्के, अजित पवार (9.5 टक्के) एकनाथ शिंदे (8.5%) सुप्रिया सुळे (8.5%) बाळासाहेब थोरात (4.2%) अशोक चव्हाण (6.6%) जयंत पाटील (3.6 %) असा पसंतीक्रम आहे.

शिंदे गट फुटल्याचे शिवसेना मतदारांना आवडले नाही

शिंदे गट फुटल्यानंतर शिवसेनेच्या मतदारांना हि बाब पटली नसल्याचे या सर्वेतून दिसून येते. शिवसेनेच्या 39 टक्के मतदारांना या आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी असे वाटते. तर 33 टक्के शिवसेनेच्या मतदारांना फुटलेल्या आमदारांना निवडणुक लढविण्यास कायमस्वरुपी बंदी घालावी असे वाटते. तर 12 टक्के मतदारांना या नेत्यांची राजकीय अपरिहार्यता मान्य आहे. तर 16 टक्के मतदारांनी यापैकी कशाला देखील पसंती दर्शविली नाही.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांना मोठी सहानुभूती

त्याच बरोबर राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या मतदारांचा कौल घेतला असता राष्ट्रवादीतील फुटीनंतर 64 टक्के मतदारांना शरद पवारांना सहानुभूती मिळेल असे वाटते. 18 टक्के आमदारांना पवारांना सहानुभूती मिळणार नाही असे वाटते. तर 18 टक्के लोकांनी सांगता येत नाही असे उत्तर दिले आहे.

सत्तेसाठी नवा पायंडा जनतेला मान्य नाही

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूळ पक्षात वेगळा गट करुन सत्तेत सहभागी होण्याचा खेळ मतदारांना अजिबात आवडलेला नसल्याचे दिसून आले. हा नवा पायंडा 80.9 टक्के मतदारांनी नाकारला आहे. तर हे सत्तासमीकरण 19.1 टक्के लोकांना मान्य असल्याचे सर्वेत म्हटले आहे.

काँग्रेसच्या मतदारांना काय वाटते?

फुटीर आमदारांबद्दल काँग्रेसच्या मतदरांचे मत जाणून घेतले असता. काँग्रेसच्या 41 टक्के मतदारांना आमदारांनी राजीनामा द्यावा असे वाटते. 29 टक्के मतदारांना या आमदारांवर कायमची बंदी घालावी असे वाटते. 14 टक्के मतदारांना आमदारांचा निर्णय मान्य वाटतो. तर 15 टक्के मतदारांना वरील पैकी कोणतेच मत मान्य नाही. तर 1 टक्का मतदारांना याबाबत काहीच सांगता येत नाही असे म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

डोळे हे जुल्मी गडे…. अजित पवार यांच्या नेत्रपल्लवाने सत्ताधाऱ्यांची धाकधूक वाढली

नाशिकच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन

घरी बसणाऱ्यांना जनता घरी बसवते; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

शरद पवारांची बाजू राष्ट्रवादीच्या मतदारांना योग्य वाटते

अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणाची बाजू योग्य वाटते याचा कौल जाणून घेतला असता. 43.6 टक्के जनतेला शरद पवार यांची बाजू योग्य वाटते. 23.1 टक्के जनतेला अजित पवार योग्य वाटतात. तर 33.3 टक्के जनतेला याबाबत काहीही सांगता येत नसल्याचे वाटते.

राष्ट्रवादीतल फुटीवबाबत राष्ट्रवादी भाजपच्या मतदारांना काय वाटते ?

राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर कोणाची बाजू बरोबर हे राष्ट्रवादी आणि भाजपच्या मतदारांकडून जाणून घेतले असता राष्ट्रवादीच्या 61 टक्के तर भाजपच्या 19 टक्के मतदारांना शरद पवार यांची बाजू योग्य वाटते, तर राष्ट्रवादीच्या 25 टक्के आणि भाजपच्या 41 टक्के मतदारांना अजित पवार यांची बाजू योग्य वाटते तसेच याबाबत 14 राष्ट्रवादीच्या मतदारांना आणि 40 टक्के भाजपच्या मतदारांना काहीही सांगता येत नसल्याचे वाटते.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी