29 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रMPSC ची पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर

MPSC ची पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने येत्या रविवारी १४ मार्च होणारी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग पुर्व परीक्षा २०२० पुढे ढकलली आहे. राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आलेल्या निर्देशांनंतर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. ११ ऑक्टोबर २०२० रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा मराठा आरक्षणप्रश्नी मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती.

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पत्रानंतर निर्णय

यासंदर्भात राज्य लोकसेवा आयोगाच्या सहसचिवांनी गुरुवारी ११ मार्च रोजी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यात असे म्हटले आहे की आयोगाला राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून १० मार्च रोजी यासंदर्भातले निर्देश पत्राद्वारे कळवण्यात आले. या पत्रात असे म्हटले होत की, राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी वेगवेगळे निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित करणे योग्य नसल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. शासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्यात येत असल्याचे आयोगाने जाहीर केले. परीक्षेची सुधारित तारीख यशावकाश जाहीर करण्यात येईल, असे आयोगाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

कोरोना आणि मराठा आरक्षण स्थगितीमुळे परीक्षा पुढे ढकलेल्या

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर ठाकरे सरकारने MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यावेळी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. MPSC च्या परीक्षेची पुढची तारीख लवकरच जाहीर करू, असे ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्यांनतर आता आज परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे राज्यात प्रतिष्ठेचं वलय असणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या होत्या. अनेक वर्षांपासून तयारी करत असलेले उमेदवार या परीक्षांची वाट पाहत होते. अनलॉक अंतर्गत सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षादेखील लवकरात लवकर घेण्यात याव्यात अशी मागणी या उमेदवारांकडून केली जात होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी