31 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeमहाराष्ट्रपंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत चक्क मनसे करणार राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत चक्क मनसे करणार राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार

टीम लय भारी

मुंबई :- सध्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार बहरात आला आहे. भाजप तसेच राष्ट्रवादीचे बडे नेते आपापल्या उमेदवाराच्या विजयासाठी जीवाचे रान करत आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या रोज येथे सभा होत आहेत. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांना पाठिंबा देऊ केला आहे. मनसेचे राज्य सचिव दिलीप धोत्रे यांनी ही माहिती दिली. मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त पाठिंबाच जाहीर केलेला नाही. तर मनसेचे नेते मतदारसंघात फिरून भगीरथ भालके यांचा प्रचारही करणार आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे आणखी जड झाले आहे.

राष्ट्रवादीचे माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर होणारी पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. सांगली आणि जळगाव महानगरापालिकेत ओढावलेल्या नामुष्कीनंतर भाजपने आता पंढरपुरात संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावायची ठरवली आहे. त्यासाठी भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या निवडणुकीसाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पंढरपूरमध्ये जोरदार प्रचार करत आहेत. कोरोनामुळे राज्यावर लॉकडाऊनचे ढग दाटले असतानाही पंढरपुरात सभा घेतल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पंढरपूरात सभा घेतल्या होत्या.

कल्याण काळे राष्ट्रवादीत

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची प्रचारसभा झाली. या प्रचारसभेत अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये भाषण केले. अजित पवारांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. या प्रचारसभेत भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

हा भाजपसाठी मोठा धक्का होता. सहकार शिरोमणी वसंतराव कारखान्याचे अध्यक्ष असलेले कल्याणराव काळे यांचा पूर्ण गट राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा प्रचार करत आहे.

भारतनानांचे अधुरे स्वप्न भगीरथ पूर्ण करेल”

“पाच वर्षांसाठी इथल्या जनतेने भारत नानांना (दिवंगत आमदार भारत भालके) निवडून दिले होते, त्यांचं काम पण सुरु होते, मात्र काळाने घाला घातला. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील नागरिकांनी भगीरथ भालकेला विधानसभेत पाठवायचे आहे. भगीरथ भालके यांनी भारत नानांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करावे, राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सर्व ताकद लावीन” अशी हमी अजित पवारांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी