30 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रPolitics : खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चेने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

Politics : खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चेने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

टीम लय भारी

जळगाव : भाजपातील पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी (Politics) आहेत. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपाकडून न्याय मिळत नसल्याच्या भावनेतून खडसेंनी यापूर्वी अनेकदा पक्षांतराचे संकेत उघडपणे दिले. परंतु, अद्यापही ते भाजपातच आहेत. त्यामुळे खडसे खरोखर राष्ट्रवादीत जातील का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असा अंदाज बांधला जात आहे. ते खरंच राष्ट्रवादीचा पर्याय निवडतील का? हे निश्चित नसले तरी केवळ त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेमुळे जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पाहायला मिळत आहे.

उत्तर महाराष्ट्रात भाजपा वाढत असताना आपले अस्तित्त्व राखण्यासाठी ज्या खडसेंशी सामना केला, आज त्याच खडसेंना नेता म्हणून कसे स्वीकारायचे? असा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. आजवरच्या राजकीय वाटचालीत अभ्यासू व्यक्तिमत्त्व, आक्रमक नेतृत्त्व आणि मुरब्बी राजकारणी म्हणून एकनाथ खडसेंची ओळख राहिली आहे. मात्र, गेल्या चार ते साडेचार वर्षांपासून खडसेंना भाजपात सतत डावलले जात आहे. २०१४ मध्ये राज्याच्या सत्तेत आल्यानंतर खडसेंना मुख्यमंत्रीपदाची मनिषा होती. मात्र, त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकले नव्हते. महसूलसह १२ खात्यांचे ते मंत्री होते. दीड वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर खडसेंवर भोसरीतील जमिनीच्या खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला. त्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या पत्नीशी झालेले कथित संभाषण, स्वीय सहाय्यकाचे लाचप्रकरण अशी एक ना अनेक प्रकरणे लागोपाठ समोर आल्याने खडसेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

या सा-या प्रकरणात झालेले आरोप सिद्ध न झाल्याने खडसेंना मंत्रिमंडळात परतण्याची आशा होती. परंतु, त्यांना अखेरपर्यंत झुलवत ठेवण्यात आले. तेव्हापासून ते पक्षावर प्रचंड नाराज आहेत.मंत्रिपद गेल्यानंतर लोकसभा निवडणुकीत सुनेच्या तिकिटासाठी देखील त्यांना खूप प्रयत्न करावे लागले. विधानसभा निवडणुकीत तर ते स्वत:ला तिकीट मिळवू शकले नाहीत.

त्यांच्याऐवजी पक्षाने कन्येला तिकीट दिले. दुर्दैवाने त्यांच्या कन्येचा पराभव झाला. त्यामुळे खडसेंच्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला जबर धक्का बसला. कन्येच्या पराभवाला पक्षांतर्गत कुरघोड्या कारणीभूत असल्याची भूमिका घेऊन खडसेंनी भाजपा विरोधात मोट बांधली होती. आता तर त्यांच्या बंडाची धग तीव्र झाली आहे. आपल्याला त्रास देण्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रमुख हात असल्याचा आरोप खडसेंनी त्यांचे नाव घेत उघडपणे केला आहे. पक्षाकडून सतत अपमानित केले जात असल्याने आता ते वेगळा विचार करण्याच्या मन:स्थितीत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी