34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
HomeमुंबईArnab Goswami : ‘रिपब्लिक टीव्ही’ चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी अटकेत

Arnab Goswami : ‘रिपब्लिक टीव्ही’ चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी अटकेत

टीम लय भारी

मुंबई : ‘टीआरपी’ (TRP Scam) घोटाळ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘रिपब्लिक टीव्ही’ चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना अलिबाग पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केली. (Arnab Goswami, editor of Republic TV channel, arrested) इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या मृत्यू प्रकरणात गोस्वामी यांना अटक केली.

अन्वय नाईक यांनी २०१८ साली अलिबागजवळच्या कावीर गावात आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी रिपब्लिकन ३५ चॅनल च्या स्टुडिओच्या इंटेरियर डिझाईनचे काम केले. त्यातील ८३ लाख रुपये येणे शिल्लक होते. परंतु वारंवार बिल मागूनही अर्णव गोस्वामी यांच्याकडून बिल दिले जात नव्हते. अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अन्वय नाईक यांच्या मृतदेहाशेजारीच त्यांच्या आईचा मृतदेह आढळला होता. अन्वय मधुकर नाईक (५३) यांनी आर्थिक विवंचनेतून स्वत: आत्महत्या केली होती. त्यांच्या कॉनकॉर्ड या इंटेरियर डिझायनर कंपनीला व्यवसायात नुकसान झाले होते. त्यामुळे कर्जदार त्याच्याकडे पैशांचा तगादा लावत होते. याच तणावात यांनी आपले व आईचे जीवन संपविण्याचे ठरविले.

अन्वय नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी रिपब्लिकन टीव्हीचे मालक अर्णब गोस्वामी तर फिरोज शेख व नीतेश सारडा यांनी कामाचे पैसे दिले नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामुळे या तिघांचीही चौकशी पोलिसांमार्फत करण्यात आली होती. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी केलेल्या तक्रारीनंतर अलिबाग पोलिसांनी ३०६ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी चौकशीसाठी अलिबाग पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली.

अर्णब गोस्वामींना रायगड पोलिसांनी पहाटे अटक केली. पहाटे ५ वाजता पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पथकासह रायगड पोलीस त्यांच्या वरळी येथील घरी गेले होते. दीड तास पोलिसांशी हुज्जत घातल्यानंतर सात वाजता गोस्वामींना अटक केली. आधी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात डायरी नोंद करून अर्णब गोस्वामींना अलिबाग येणे नेण्यात आले.

अटकेनंतर ‘रिपब्लिक’चा दावा

पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर रिपब्लिकने प्रश्न उपस्थित केला आहे. पोलिसांनी घरात जबरदस्ती घुसखोरी करत अर्णब गोस्वामी यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा रिपब्लिकचा दावा आहे. अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून धमकावण्यात आल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसताना आणि बंद झालेल्या केसमध्ये ही अटक झाल्याचा दावा आहे. अर्णब गोस्वांमी यांनी १० पोलीस कर्मचारी घरात घुसले आणि घराबाहेर येण्यासाठी जबरदस्ती करत धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय मुंबई पोलिसांनी रिपब्लिकचे कार्यकारी संपादक निरंजन नारायणस्वामी आणि संजय पाठक यांना घरात जाण्यापासून रोखल्याचेही सांगण्यात आले आहे. अटकेची कारवाई करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांच्या घराबाहेर पोलिसांची ८ वाहने आणि ४० ते ५० कर्मचारी उपस्थित होते असा दावा करण्यात आला आहे. निरंजन यांना रिपोर्टिंग करण्यापासून रोखण्यात आल्याचाही रिपब्लिकचा दावा आहे.

महाराष्ट्रात सत्तेचा गैरवापर : अमित शाह

अमित शाह यांनी ट्विट करत अर्णब गोस्वामींच्या अटकेचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेस आणि त्यांच्या सहकाºयांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणली आहे. राज्याकडून रिपब्लिक आणि अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात होणारा सत्तेचा गैरवापर हा लोकशाहीचा चौथा खांब आणि एका व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. यामुळे पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण झाली आहे. प्रेसवर झालेल्या या हल्ल्याचा निषेध केलाच पाहिजे.

देश सोनिया गांधी, राहुल गांधींकडे उत्तर मागतोय : देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून थेट काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल राहुल गांधी यांच्याकडेच उत्तर मागितलं आहे. फडणवीस यांनी ट्विट करत काँग्रेसवर टीकेची तोफ डागली आहे. जातीय हिंसा भडकवण्याचा प्रयत्न करणाºयांसोबत असणाºया काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कटाचा भांडाफोड केल्याची शिक्षा अर्णब गोस्वामी यांना भोगावी लागत आहे. टुकडे टुकडे गँग असो की, पालघरमधील खुनी, यांना शरण देणारे कोण आहेत? याचं उत्तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे देश मागत आहे. त्याच काँग्रेसच्या इशाºयांवर नाचणारं कुमकुवत सरकार महाराष्ट्राला आणीबाणीच्या दिशेनं घेऊन जात आहे. माध्यमांच्या अभिव्यक्तीविषयी बोलणारे आता कुठे लपून बसले आहेत? आज सगळे दुतोंडी चेहरे उघडे पडले आहेत,’ अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

लोकशाहीची गळचेपी : चंद्रकांत पाटील

अर्णब गोस्वामींना अटक केल्यानंतर भाजपाने ठाकरे सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत कार्यकर्त्यांना राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आवाज उठवा, मोर्चा काढा, राज्य सरकारचा विरोध करा अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले आहे. त्यामुळे राज्यात भाजपाविरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकावता येणार नाही म्हणून एका वास्तुविशारद आत्महत्या प्रकरणी, जी केस २०१८ सालीच बंद झाली होती, ती केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली. भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आज घडली आहे. मी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि त्याहून आधी एक भारतातील नागरिक म्हणून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो असं त्यांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे ‘यालाच’ आणीबाणी म्हणतात : उपाध्ये

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. ‘विरोधात टीका करणाºया चॅनेल्सवर अशी घरात घुसून कारवाई. विरोधी विचार दडपून टाकायचा हा प्रयत्न, सुप्रिया सुळे यालाच आणिबाणी म्हणतात तेही राष्ट्रवादीचा गृहमंत्री असलेल्या राज्यात घडतंय.’ असं केशव उपाध्ये यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. याचबरोबर त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्या अटेकचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. मोदी सरकार हळुहळू देशात आणीबाणी आणू पाहतं आहे असं चित्र आहे, असं म्हणत कांजूर कारशेडच्या जागेवरुन सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून आता केशव उपाध्ये यांनी निशाणा साधला आहे.

हिसाब होगा, इंटरेस्ट लगाके; आ. नितेश राणेंचा इशारा

भाजप आमदार नितेश राणे यांनी ‘हिसाब तो होगा, इंटरेस्ट लगाके’ असे ट्विट करत ठाकरे सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ‘सत्ता आज है, कल नही. आज तुम्हारी है, कल हमारी होगी.. बस इतना याद रखना. हिसाब तो होगा.. इंटरेस्ट लगा के…’ (सत्ता आज आहे, उद्या नसेल. आज तुमची आहे. उद्या आमची असेल.. फक्त इतकंच लक्षात ठेवा, हिशेब होणार.. व्याजासकट) असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. या ट्विटमध्ये नितेश राणेंनी कोणाचाही उल्लेख केलेला नाही किंवा कोणाचे नावही घेतलेले नाही. मात्र अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर त्यांनी हे ट्विट केले आहे.

महाविकास आघाडीचा धिक्कार : भातखळकर

भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशात आणीबाणी असल्याचे सुप्रिया सुळे काल म्हणाल्या. ही आणीबाणी खरेतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या सूडबुद्धी कारभारामुळे सुरू आहे. अर्णब गोस्वामींना झालेली अटक ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे. यापुढे भकास आघाडीने लोकशाहीच्या गप्पा मारू नये. धिक्कार या शब्दात त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या कारवाईचा निषेध : जावडेकर

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही या कारवाईचा निषेध केला आहे. जावडेकर यांनी ट्विट करत म्हटलंय की, मुंबईमध्ये पत्रकारितेवर जो हल्ला झाला तो निंदणीय आहे. आणीबाणीसारखी महाराष्ट्र सरकारची ही कारवाई आहे. आम्ही याचा निषेध करतो असं त्यांनी सांगितले आहे.

…हाच का तुमचा लोकशाही कारभार : आशिष शेलार

एका प्रकरणात राज्य सरकारला उघडे पाडले म्हणून पत्रकार राहुल कुलकणीर्ला अटक केली, सरकार विरोधात सोशल मिडियावर बोलणाºया निवृत्त नेव्ही अधिकाºयांसह सामान्य माणसाला ठेचून काढणे नित्याचेच झाले. आता सरकारला खडा सवाल विचारणाºया संपादकाच्या हातात बेड्या… वा रे वा लोकशाही सरकार! काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार.. हाच का तुमचा लोकशाही कारभार? दुर्दैवाने, लोकशाहीसाठी हा काळा दिवस, अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

कायद्यानुसार कारवाई : अनिल देशमुख

कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करेल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. शिवाय, त्यांनी तसं ट्विट देखील केलेलं आहे. तसेच, ही केस बंद झाली होती. मात्र वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या पत्नीने केस पुन्हा सुरू करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर ही केस परत सुरू करण्याची परवानगी न्यायालयाने त्यांना दिली. असल्याचंही यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले.

अर्णब गोस्वामी ‘उसूलों पे चला होगा’; अमृता फडणवीसांकडून पाठराखण

अर्णब गोस्वामी प्रकरणात आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. अर्णबच्या समथार्नार्थ ट्विट करुन फडणवीस यांनी त्यांची पाठराखण केली आहे. रिपब्लिक टीव्हीने अर्णब यांना अटक केल्याचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हीडिओ रिट्विट करत अमृता फडणवीस यांनी लिहिले आहे की, ‘बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा!’ या ट्विटद्वारे फडणवीस यांनी अर्णव यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे.

कंगना राणौतचा शिवसेनेवर हल्लाबोल

अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतनं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. याबाबत कंगनानं ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत शिवसेनेचा सोनिया सेना म्हणून उल्लेख केला आहे. कंगना म्हणाली की, अर्णब गोस्वामींना घरात घुसून पोलिसांनी मारलं, अटक केली, किती घरं तोडणार?, किती जणांचा गळा दाबणार? कोणाकोणाचे आवाज बंद करणार? सोनिया सेना किती जणांची तोंड बंद करणार? असा सवाल कंगनानं उपस्थित केला आहे. तसेच आमच्याआधी किती शहिदांचे गळे कापले, त्यांना लटकवलं गेले आहे. एक आवाज बंद केला तर अनेक आवाज उभे राहतील, पेग्विंन बोलल्यानं राग का येतो? पेग्विंनसारखे दिसता तर बोलणारच, पप्पू सेना म्हटल्यावर राग येतो, तुम्ही सोनिया सेनाच आहात अशी टीका अभिनेत्री कंगना राणौतनं केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी