24 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमुंबईमुंबईत 'जय श्रीराम' म्हणण्याची जबरदस्ती, मराठी माणसाला परप्रांतीयांकडून मारहाण!

मुंबईत ‘जय श्रीराम’ म्हणण्याची जबरदस्ती, मराठी माणसाला परप्रांतीयांकडून मारहाण!

भारतात नव्याने सुरू झालेले आणि मुख्यत्वेकरून उत्तरेकडील राज्यांमधील वाढत्या धार्मिक तणावांचे आणि उन्मादाचे लोण आता मुंबईतही येऊन ठेपले आहे. आता चक्क परप्रांतीयांकडून मराठी तरुणाला मारहाण झाल्याची घटना मुंबईमधील कांदिवली येथे घडली आहे. “जय श्रीराम” ची घोषणा देण्याची जबरदस्ती करून उत्तर भारतीय तरुणांच्या टोळक्याने मराठी युवकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आहे. यानंतर, पीडित तरुणाने वंचित बहुजन आघाडीकडे धाव घेतली. ‘वंचित’ने याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी, पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल केले असून पुढील चौकशी चालू आहे.

सिद्धार्थ किसन अंगुरे (35) हे सोमवारी, (25 सप्टेंबर) रात्री 11.30 च्या सुमारास कामावरून घरी परतत होते. त्यावेळी, कांदिवली पूर्वेकडील गोकुळनगर परिसरात काही परप्रांतीय तरूणांनी त्यांना अडवले आणि  “जय श्रीराम” च्या घोषणा देण्याची जबरदस्ती त्यांच्यावर केली. यावेळी, सिद्धार्थने घोषणा करण्यास नकार दिला असता त्यांना शिवीगाळ आणि बेदम मारहाण करण्यात आली. सिद्धार्थचा भाऊ आणि नातेवाईकांनी मध्यस्थी केल्यामुळे ते थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्यावर मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांदिवली येथे उपचार सुरू आहेत.


मारहाण करणाऱ्या इसमांची नावे सुरज तिवारी, अरुण पांडे आणि राजेश रिक्षावाला अशी आहेत. याप्रकरणी, पीडित तरुणाच्या कुटुंबियांनी वंचित बहुजन आघाडीकडे मदतीसाठी धाव घेतली. वंचित बहुजन आघाडीकडून पोलिस तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम 341, 504, 323, 506 आणि 34 अन्वये कांदीवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पोलिसांशी बोलून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा 

मराठी महिलेला जागा नाकारण्यावरून सेना-मनसेत चिखलफेक!

भारतीय शेतकऱ्यांचे भाग्यविधाते हरित क्रांतीचे प्रणेते एम. एस. स्वामीनाथन

कृषी विभागाच्या परीक्षेत कॉपीबहाद्दराची चलाखी, कॉपीसाठी एटीएमसारख्या डिव्हाईसचा वापर

देशभरात धार्मिक कट्टरतेमुळे हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून मुंबईसारख्या शहरातदेखील अशा घटना घडू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. तसेच, मुंबईतील मराठी माणसांवर सातत्याने होत असलेल्या परप्रांतीयांच्या मुजोरीसारख्या घटनाही दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.

मुंबईमधील मुलुंड परिसरात मराठी महिलेला मराठी असल्याकारणाने ऑफिससाठी जागा नाकारण्याचे प्रकरण ताजेच आहे. अश्यातच, मराठी तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे, मराठी माणसाच्या हक्काच्या मुंबई शहरातच आता मराठी माणसाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी