28 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमहाराष्ट्रकृषी विभागाच्या परीक्षेत कॉपीबहाद्दराची चलाखी, कॉपीसाठी एटीएमसारख्या डिव्हाईसचा वापर

कृषी विभागाच्या परीक्षेत कॉपीबहाद्दराची चलाखी, कॉपीसाठी एटीएमसारख्या डिव्हाईसचा वापर

मुंबईतीच्या पवईत सोमवारी (25 सप्टेंबर) शासकीय कृषी विभागातील सहायक संचालक आणि वरिष्ठ लिपिकपदासाठी  परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत कॉपीबहाद्दराचा हटके चलाखी समोर आली आहे. अगदी फिल्मी पद्धतीने कॉपी करणाऱ्या या युवकाने चक्क बँकेच्या एटीएम कार्डसारख्या दिसणाऱ्या पोर्टेबल डिव्हाईसचा वापर कॉपीसाठी केला होता. या डिव्हाईसशी कनेक्टेड असलेले आणि फक्त अर्ध्या इंचाचे ब्लुटूथ इयरफोन त्याने कानात लपवून ठेवले होते. त्याच्या असल्या फिल्मी प्रकाराने पोलीसही चक्रावले असून त्याची कसून चौकशी करत आहेत.

रामकिशन दातू बेडके (२५) असे या कॉपीबहाद्दराचे नाव आहे. शासकीय कृषी विभागातील सहायक संचालक आणि वरिष्ठ लिपिक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये त्याने हा पराक्रम केला आहे. पवईतील मोरारजी नगरमध्ये असलेल्या ऑरम आयटी पार्कमध्ये कृषी विभागाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या कॉपीप्रकरणानंतर पोलीस कामाला लागले असून बेडके सोबत कॉपीच्या गुन्ह्यात सामील झालेल्या त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.


कॉपी करण्यासाठी हे डिव्हाईस अगदी चलाखीने बनवण्यात आले आहे. हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस डेबिट कार्डसारखे डिझाईन केलेले असून ते एक ब्लूटूथ डिव्हाईस आहे. या डिव्हाईसमध्ये बॅटरी कंपार्टमेंटसह सिम कार्ड स्लॉटही ठेवण्यात आले आहेत. जेणेकरून, कोणत्याही मोबाईल फोनवरून किंवा लँडलाईनवरून यावर संपर्क साधता येऊ शकेल.

बेडके याने हे डिव्हाईस त्याच्या खांद्यावर लावले होते. या कार्डसदृश्य डिव्हाईसचा रंग हा त्याच्या त्वचेच्या रंगाशी मिळताजुळता असल्याने ही बाब परीक्षा पर्यवेक्षकांच्या सहज लक्षात आली नाही. परंतु, बेडकेच्या खांद्याचा भाग फुगलेला दिसल्याने परीक्षा पर्यवेक्षकांना त्याचा संशय आला. त्यानुसार, बेडकेची तपासणी केली असता त्याचे पितळ उघडे पडले. भांडाफोड झाल्याचे लक्षात येताच बेडकेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्याला लगेचच ताब्यात घेतले.

हे ही वाचा 

हरित क्रांतीचे जनक स्वामीनाथन यांचं निधन

शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनहून १६ नोव्हेंबरला भारतात येणार, सुधीर मुनगंटीवारांचे प्रयत्न फळाला

रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रोला पहाटे २ वाजता नोटीस, ७२ तासांत प्लांट बंद करा

राज्यात पेपरफूटीचे सत्र चालू असून याआधी, मुंबई पोलिस भरती, वन खात्याची भरती, सहकार विभागाची भरती, तलाठी भरती आणि आता कृषी विभागाच्या भरतीमध्येही घोळ झाल्याने राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत, स्पर्धा परीक्षा समन्वयक समिती, महाराष्ट्र राज्य यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी