33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमुंबई'कुठेतरी आपलं चुकतंय...' विसर्जन मिरवणुकीबद्दल राज ठाकरेंचे परखड मत!

‘कुठेतरी आपलं चुकतंय…’ विसर्जन मिरवणुकीबद्दल राज ठाकरेंचे परखड मत!

नुकत्याच संपन्न झालेला गणेशोत्सव दरवर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या धुमधडाक्यात निरोपदेखील दिला. परंतु, काही ठिकाणी या उत्सवला गालबोट लागल्याचे दिसून आले. यावरूनच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर एक खुले पत्र पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात डिजे, डॉल्बीचा वापर होत असतो. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

ट्विटरवर पोस्ट केलेल्या खुल्या पत्रात राज ठाकरे लिहितात, “मी आज ज्यावर बोलतोय त्याची पार्श्वभूमी नुकताच पार पडलेला महाराष्ट्रातील महाउत्सव आणि त्याचं बदलत चाललेलं स्वरूप हे आहे. गणपती असो, दहीहंडी असो की नवरात्रोत्सव असो, रामजन्माचा उत्सव असो की इतर हिंदू देवतांचे उत्सव असोत, ते ह्या देशात उत्साहाने साजरे व्हायलाच पाहिजेत. आणि त्यावर सरकारांनी जरी निर्बंध आणले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेळेस सरकारशी संघर्ष केला आहे आणि ह्यापुढे पण गरज पडली तर करत राहू. आपल्या धर्मातील उत्सवांना विरोध करायचा आणि इतर धर्मातील उन्मादावर मौन बाळगायचं अशी एक जमात आपल्याकडे आहे त्यांचा मुखभंग पण आम्हीच केला आहे. त्यामुळे धर्माभिमान इत्यादी गोष्टी आम्हाला कोणी शिकवू शकत नाही हे नक्की.”

“पण, ह्या उत्सवात १० दिवस आणि मुख्यतः मिरवणुकांच्या वेळेस डीजे, डॉल्बी ह्यांच्या आवाजच्या कर्कश्श पातळीमुळे हृदय बंद पडणं आणि मृत्यू येणं, किंवा तात्कालिक किंवा कायमचं बहिरेपण येणं, किंवा गेले काही वर्ष तर मिरवणुकीच्या दरम्यान लेझर लाईटमुळे अनेकांची दृष्टी जाणं हे प्रकार वाढले आहेत. ह्यात मिरवणुकीत येऊन, नाचून, आनंद व्यक्त करून लोकं निघून जातात पण पोलीस असतील किंवा इतर प्रशासकीय यंत्रणांमधील लोकं असतील, त्या भागात राहणारे स्थानिक रहिवासी असतील त्यांची अवस्था खरंच गंभीर आहे. सलग २४, २४ तास आवाज कानावर पडून अनेकांची श्रवण शक्ती कमी झाली असेल तर आश्चर्य वाटायला नको. आपल्या आनंदाची, उत्सवाची मोजावी लागणारी ही किंमत ही मोठी नाही का ?” असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.

पुण्यातील मावळ येथे घरातील तरुणाचा मृत्यू झाला असल्याने घरासमोरून जाणाऱ्या गणेश विसर्जन मिरावणुकीतील डिजे बंद करायला सांगितल्याचा राग मनात ठेवून त्या घरातील लोकांना मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी टीका करत म्हंटले, “एका कुटुंबात एका तरुणाचा मृत्यू झाला होता, आणि त्या घराच्या बाहेर सुरु असलेला डीजेचा आवाज कमी करा सांगितलं म्हणून राग येऊन त्या घरातील लोकांना मारहाण झाली. ही घटना एखादीच असेल, त्यामुळे शितावरून भाताची परीक्षा करण्याचं कारण नाही. पण कुठेतरी आपलं चुकतंय ह्याचा विचार करायला लावणारी नक्कीच आहे.”

हे ही वाचा

वाघनखांनी काढला आरोपांचा कोथळा, ‘ती’ वाघनखे शिवरायांची नसल्याचा दावा

लोकसभेत आंबेडकरांची वेगळी चूल, ४८ जागांवर निवडणूक लढवणार

विदेश दौऱ्यांवरून आदित्य ठाकरेंनी केली सरकारची धुलाई!

याशिवाय, सण-उत्सव, वाढदिवस आणि इतर राजकीय आणि वैयक्तिक कार्यक्रमानिमित्त लावण्यात येणाऱ्या होर्डिंग्सबाबतही राज ठाकरे यांनी टीका केली आहे. “शहरातील होर्डिंग्स ह्याने शहर विद्रुप होतात असे ताशेरे न्यायालयाने ओढले होते. न्यायालयाच्या ह्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. आणि मी ह्या आधी म्हणलं तसं होर्डिंग संस्कृती जर सगळे राजकीय पक्ष बंद करणार असतील तर माझा पक्ष पहिला त्यात उतरेल. त्याच धर्तीवर, ह्या उत्सवातल्या काही खटकणाऱ्या गोष्टी दूर करायला संपूर्ण राजकीय व्यवस्था तयार असेल तर माझा पक्ष त्यात सगळ्यात पुढे असेल,” असे राज ठाकरे यांनी सांगितले.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले असून यंदाच्या निवडणुकांमध्ये मनसे काय रणनीती आखणार हे याबद्दल उत्सुकता असेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी