30 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
HomeमुंबईUnlock 5 : ठाकरे सरकारची नवी नियमावली जाहीर, मेट्रो, मोनो धावणार, दुकानेही...

Unlock 5 : ठाकरे सरकारची नवी नियमावली जाहीर, मेट्रो, मोनो धावणार, दुकानेही सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत उघडी रहाणार, लायब्ररी उघडण्यास व आठवडा बाजारालाही परवानगी

टीम लय भारी

मुंबई : राज्यात मिशन बिगेन अगेन (Unlock 5) अंतर्गत सरकारने आणखी एक दिलासा दिला आहे. मुंबई मेट्रो सुरु करण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात त्रास कमी होणार आहे. मेट्रो सेवा सुरु करण्याबाबतची नियमावली लवकरच जारी करण्यात येणार आहे. मेट्रोसह दुकाने उघडी ठेवण्याच्या वेळेत दोन तासांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत दुकाने उघडी राहू शकतात. तसेच सर्व शासकीय आणि खाजगी लायब्ररी उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतू सामाजिक अंतर आणि स्वच्छताविषयक नियमांचे अनुसरण करणे आवश्यक असणार आहे. तसेच स्थानिक साप्ताहिक आठवडा बाजार उघडण्यासही परवानगी देण्यात आली आहे. कंटेनमेंट झोन वगळता आठवडी बाजार भरवता येणार आहे. याबद्दलचा निर्णय घेण्यास पालिका प्रशासनाला अधिकार देण्यात आले आहे.

राज्य सरकारने मुंबई मेट्रो सेवा सुरू करण्यास आज हिरवा कंदील दाखवला. ही सेवा १५ ऑक्टोबरपासून सुरू करता येईल, असे सरकारने सांगितले. त्यावर सोमवार दि. १९ ऑक्टोबरपासून मेट्रो चालवण्याचा निर्णय ‘मुंबई मेट्रो’ने घेतला असतानाच आता मोनो रेल्वेबाबतही दिलासा देणारी बातमी पुढे आली आहे. सरकारच्या आदेशात मोनो रेल्वेबाबत उल्लेख नसला तरी मेट्रोच्या धर्तीवर नियमांचे पालन करून मोनोही सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर गेल्या सात महिन्यांपासून या सेवांना ब्रेक लागला आहे. अनलॉक काळात मुंबईतील तिन्ही मार्गावर विशेष लोकल धावत असल्या तरी नियमित लोकल सेवा मात्र अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. लोकलवर विसंबून असलेल्या लाखो नोकरदारांना व अन्य प्रवाशांना त्याची प्रतीक्षा असताना मेट्रो आणि मोनोबाबत मात्र आज खूप मोठे निर्णय झाले आहेत. राज्य सरकारने आज मेट्रो सेवेला परवानगी देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार १९ ऑक्टोबरपासून मेट्रो धावणार आहे.

‘मुंबई मोनो रेल’ने ट्वीटरच्या माध्यमातून आपली सेवा पूर्ववत करण्यात येत असल्याबाबत घोषणा केली आहे. रविवार दि. १८ ऑक्टोबरपासून मोनो रेल सेवा सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासोबतच प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. ‘मास्क नाही तर प्रवास नाही’ असे स्पष्ट करण्यात आले असून जे प्रवासी मास्क घालतील त्यांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासोबत अन्य आवश्यक सूचना व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करता यावी यासाठी प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहनही मोनोरेलने केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी