28 C
Mumbai
Monday, September 18, 2023
घरराष्ट्रीयमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचले काश्मीरला; दिली श्रीनगर येथील गणेशोत्सव मंडळास भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचले काश्मीरला; दिली श्रीनगर येथील गणेशोत्सव मंडळास भेट

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या धडाकेबाज कामामुळे प्रसिद्ध आहेत. गेल्या वर्षी शिंदे यांनी त्यांच्या मतदार संघातील सामान्य कार्यकर्त्यांच्या घरगुती गणेशाचे दर्शन घेऊन नव्या आदर्श निर्माण केला होता. हेच एकनाथ शिंदे काश्मीरच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज श्रीनगर येथील लाल चौकातील गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. येथील स्थानिक मराठी सोनार समाजामार्फत गेल्या २४ वर्षांपासून येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी मंडळास गणेशमूर्ती भेट दिली. जम्मू काश्मीरवरची सर्व प्रकारची विघ्ने, संकटे दूर होऊ देत, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी गणरायाला केली.

श्रीनगरमधील लाल चौकात मराठी सोनार समाज राहतो. पूर्वी घरीच गणपतीची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव साजरा केला जात असे. पण २४ वर्षांपूर्वी चौकातील पंचमुखी हनुमान मंदिरात सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. यामध्ये स्थानिक मुस्लिम समाजाचाही मोठा सहभाग असतो. दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रासह देश- विदेशातील मराठी समाज गणेशोत्सव उत्साहात साजरा करतो. श्रीनगरमधील मराठी समाजामार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. आज या मंडळास भेट देऊन त्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
हे सुद्धा वाचा
कचरामुक्त होणार मुंबईचा गणेशोत्सव
शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी धक्कादायक
कोकणवासीय गणेश भक्तांना वाहतूक कोंडी आणि खड्ड्याचे विघ्न
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार म्हणाले की, श्रीनगर येथील लाल चौकात साजरा होणारा गणेशोत्सव हा महाराष्ट्र आणि काश्मीरमधील सौहार्दाचे प्रतीक आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव उत्साहात साजरा करण्याचे नियोजन स्थानिक गणेशोत्सव मंडळाने केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी