31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
HomeराजकीयChandrakant Patil : चंद्रकांत दादा तुमचं काम किती तुम्ही बोलताय किती ?

Chandrakant Patil : चंद्रकांत दादा तुमचं काम किती तुम्ही बोलताय किती ?

ॲड. विश्वास काश्यप

चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) तुम्हाला नाही वाटत का, तुम्ही जरा जास्तच बोलत आहात. तुमच्या नशिबाने तुम्हाला गेल्या पाच साडे पाच वर्षात बरंच काही मिळालंय. जे एक सामान्य राजकीय कार्यकर्त्याला संपूर्ण आयुष्य पक्षासाठी देऊन सुद्धा मिळत नाही.

साडे पाच वर्षांपूर्वी तुमच्या पक्षाला सत्ता मिळाली आणि अचानक महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर तुमचा ( Chandrakant Patil )  उदय झाला. त्या अगोदर तुमच्या पक्षातील २ – ४ कार्यकर्ते सोडल्यास तुम्ही कोणालाही माहीतही नव्हता. परंतु पडद्यामागून तुम्ही चंद्रकांतचे चंद्रकांतदादा ( Chandrakant Patil ) कधी झालात हे समजलेच नाही. सगळी कृपा अमितभाईंची !

Dr. Amol Kolhe

महाराष्ट्रात तुम्ही काही मोठे सामाजिक आंदोलन केले किंवा मोठ्या सभा गाजविल्या आहेत असे कधीही आमच्यासारख्या सामान्य माणसाला दिसलेले नाही. डायरेक्ट क्रमांक दोनचे मंत्री झाल्यावरच तुम्ही जनतेसमोर दिसलात.

अमितभाईंमुळे आपण स्वतःला मोठे नेते समजू लागलात. सुरूवातीला तुमचे बोलणे बऱ्यापैकी नम्र वाटायचे. हळूहळू त्यात घमेंडखोरपणा येऊ लागला. सत्तेची नशा तुमच्यामध्ये लवकर आणि झटपट दिसू लागली.

तुम्ही शरद पवारांसारख्या नेत्यांबद्दल काहीही बरळू लागलात. त्यांच्या बारामतीत जाऊन त्यांनाच धमकाऊ लागलात. अगदी कालपरवापर्यंत तुम्ही ( Chandrakant Patil ) खडसेंच्या बाबतीत दिलेल्या मुलाखतीपर्यंत. सगळीकडे घमेंडखोर भाषा. इतकी कशी हिम्मत होते आपली ? आपल्या पक्षातील लोकांनी संपूर्ण आयुष्य पक्षासाठी पणाला लावले त्यांच्याशी तरी थोडे वेगळ्या भाषेत बोला. तुम्ही त्यांना मुळापासूनच उखडून टाकण्याचा प्रयत्न करताय. हे बरे नव्हे.

दादा, महाराष्ट्र सरकार कोरोनाला हाताळण्यात अयशस्वी ठरला आहे म्हणून तुम्ही निदर्शने, काळ्या रंगाचे कपडे वगैरे घालून काही तरी इव्हेन्ट करणार आहात म्हणे. तुमची इव्हेन्ट पार्टी असल्यामुळे ते तुम्ही नक्कीच करा. आपण एका प्रमुख पक्षाचे राज्यप्रमुख असल्याने आपल्याला तो अधिकार घटनेनेच दिला आहे.

परंतु सध्या तो कोरोनो महोत्सव चालू आहे त्याचे काय ? कोरोनो महोत्सव तुमच्याच केंद्रातील पक्षाने आपल्या देशात चालू केला आहे त्याचे काय ? नरेंद्र मोदी साहेबांनी वेळीच त्याकडे लक्ष दिले असते तर भारतात ही अराजकता दिसून आलीच नसती. ते अहमदाबाद मध्ये ट्रम्प महाशयांबरोबर लाखोंच्या संख्येने इव्हेन्ट करीत बसले आणि इकडे संपुर्ण भारतात कोरोना महोत्सव सुरू झाला. असो. त्यावर लिहिणे म्हणजे पी. एच. डी.चा तो स्वतंत्र विषय होईल. त्यावर पुन्हा कधीतरी.

का हो, तुम्हाला सत्तेची चटक पाच वर्षात इतकी लागली की, तुम्ही सत्तेशिवाय राहूच शकत नाही ?  तुम्हाला ( Chandrakant Patil ) ऐनकेन प्रकारे महाराष्ट्रातील सरकार उलथवूनच टाकावयचे आहे का ? केंद्रातून तसे तुम्हाला काही आदेश प्राप्त झालेत का ?

कोरोना महोत्सव राबवून तुम्हाला राज्यात राष्ट्रपती राजवट आणावयाची आहे का ? त्यानंतर राज्यपालांमार्फत तुम्हाला सत्ता ताब्यात घ्यायची आहे का ?  इतका उतावीळपणा का चालला आहे तुमचा ? तुम्हाला वाटते की जनतेला काहीच कळत नाही का ? सगळेच अंधभक्त वाटतात का तुम्हाला ? अरे चाललंय काय ? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न राज्यात राष्ट्रपती राजवट आल्याने कोरोना महोत्सव बंद होणार आहे का ?

महाराष्ट्राचा विचार करता कधी नव्हे ते राज्यात चिनी संकट तुमच्या केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे आले आहे. या संकटात राज्य सरकारला साथ देण्याऐवजी तुम्ही हे कोणत्या पद्धतीचे नीच राजकारण खेळताय ? पी. एम. केअरला मदत करून हिशोब मात्र  सी. एम. केअरला विचारताय ? म्हणजे असे झाले की शेजारणीला पगार देऊन जेवण बायकोकडे मागताय !

आपल्या महाराष्ट्राचा राजकीय, सामाजिक वारसा माहीत आहे का तुम्हाला ( Chandrakant Patil ) ? कधी तसा अभ्यास करण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे का ? अहो, अशा संकटात महाराष्ट्र सर्व राजकीय मतभेद विसरून, जात पात विसरून एक होत असतो.

तुम्ही या वैभवशाली इतिहासाचा यु. पी., बिहार का करीत आहात ?  कशाला राज्याच्या इतिहासाला धक्का लावताय. साडे चार वर्षाने पुन्हा निवडणुका होणारच आहेत की. मग घ्या परत सत्ता ताब्यात. इतके कसे तुम्ही ( Chandrakant Patil ) सत्तेसाठी लाचार झालात ? आंधळे झालात ? तुमच्या या घाणेरड्या राजकारणाबद्दल जनता तुम्हाला काय म्हणत असेल ह्याचा तुम्ही विचार करताय की नाही ? थोडी सुद्धा तुम्हाला भीती वाटत नाही का हो ?

तुम्ही गल्लीत गोंधळ घालून दिल्लीत मुजरा करणार आहात काय ?

तुम्ही म्हणताय, लॉकडाऊन घोषित झाल्यापासून तुम्ही राज्य सरकारवर लक्ष ठेवून होता. तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही गप्प राहिलात. आता तुम्हाला समजले की, राज्य सरकार अपयशी ठरत चालले आहे. म्हणून तुम्ही काळे कपडे घालून निदर्शनाचा इव्हेन्ट करणार आहात.

तुम्ही केरळ राज्य आणि महाराष्ट्र राज्य यांची तुलना करून केरळ राज्य किती चांगले म्हणून गुणगान गाताय. अहो केरळ राज्यात कम्युनिस्ट सरकार आहे. विसरलात की काय ? तुम्ही ( Chandrakant Patil ) आपल्या महाराष्ट्राची गुजरातशी तुलना का नाही केली ? कारण तुम्हाला माहीत आहे की, गुजरातची आपल्यापेक्षा भयंकर वाईट अवस्था आहे. असो.

आमची महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती आहे की, अशा कोरोनाच्या काळात निदर्शने करणाऱ्या लोकांवर कडक कायदेशीर कारवाही करा. त्यांच्यावर गुन्हे नोंदवा. सरकारने अत्यंत कडक भूमिका घ्यावी. पोलिसांना थोडे जास्त काम करावे लागेल. पण नाईलाज आहे.

या कोरोनो महोत्सवात सगळ्यात जास्त हाल आणि मनुष्यहानी पोलीस खात्याची झाली आहे. परंतु चंद्रकांतदादा, तुम्हाला त्याचे काय ? पोलिसांसाठी तुमच्या पक्षाला कधी सहानुभूती वाटली आहे का ?

आणि हो तुम्ही त्या शिवसैनिकांच्या झटक्याबाबत विसरलात वाटतं. सध्या त्यांचे राज्य आहे म्हणून ते बिचारे गप्प आहेत. परंतु एकदा का त्यांची सटकली की, सरकार वगैरे गेलं उडत, ते तुमची पळताभुई करून सोडतील. त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.

कोणतेही आंदोलन करताना पुढे शिवसैनिक आहेत याचा विचार दहा वेळा करीत चला. तुम्ही फक्त उद्धवजींना पाहत आहात. त्यांच्या मागे असलेल्या प्रचंड शक्तिशाली शिवसैनिकाला पाहतच नाही. मागे तुम्ही कोल्हापूर मधून पुण्याला आलात. शिवसैनिक जर चिडले तर ते तुमचं पार्सल सरळ सुरतला पाठवतील.

असो, तुम्हाला एक फुकटचा पुणेरी सल्ला देतो. तुम्ही ( Chandrakant Patil ) त्या देवेंद्र महाशयांच्या नादी काही लागू नका. ते तुमचा कधी विनोद, खडसे, मुंडे, बावनकुळे करून टाकतील हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. कारण पंतांच्या पुढे कोणी गेलेलं त्यांना आवडत नाही. त्यांना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत दुसरा कोणी चालत नाही.

पंत नेहमी म्हणतात, मी काहीही करेन पण मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. इतकं उघड गणित असताना तुम्ही कशाला या उठाठेवी करताय ? कशाला मेहनत घेताय राव ?  तुम्ही पाटील मेहनत करणार आणि मलई पंत खाणार. बघा बाबा ( दादा ) तुमचं काय ते.

(लेखक निवृत्त पोलीस अधिकारी आहेत, व सध्या मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतात)

हे सुद्धा वाचा

Coronavirus : उद्धव ठाकरे यांना पत्र !

Devendra Fadanvis : फडणवीसजी, आपण इतके कसे महाराष्ट्रद्वेषी ?

Arnab Goswami : भारतीय पत्रकारितेला चिटकलेला ‘कोरोना’

ExplainSpeaking: Why Atmanirbhar Bharat Abhiyan economic package is being criticised

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी