30 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
HomeमुंबईCoronavirus : उद्धव ठाकरे यांना पत्र !

Coronavirus : उद्धव ठाकरे यांना पत्र !

आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब ,

सप्रेम जय महाराष्ट्र !

आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य आणि महत्वाचा घटक म्हणजे फेरीवाला. आपल्या आजूबाजूला सतत दिसून सुद्धा दुर्लक्षित असलेला. ‘कोरोना’मुळे  ( Coronavirus ) सध्या पुरता उद्ध्वस्त झालेला. 

फेरीवाले आम्हाला हवेत परंतु ते माझ्या घरासमोर नको. माझ्या येण्या जाण्याच्या रस्त्यात नको अशी, एकूणच समाजाची दुटप्पी भूमिका.

‘कोरोना’च्या ( Coronavirus ) जागतिक महामारीत आपण समाजाच्या प्रत्येक घटकांकडे जातीनं लक्ष देताय. त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.

महोदय, लाखो फेरीवाल्यांचा ज्वलंत प्रश्न आपल्यासमोर काही दिवसांतच येणार आहे. कोरोनाच्या ( Coronavirus ) पार्श्वभूमीवर या विषयाकडे आपल्याला आता वेगळ्या भूमिकेतून पाहावे लागणार आहे.

महोदय, सध्या फेरीवाल्यांची फार वाईट अवस्था आहे. सुरवातीपासूनच हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबाचे हाल भयंकर होत आहेत. या ‘कोरोना’च्या ( Coronavirus ) साथीने त्यांना अक्षरशः भिकारी करून सोडले आहे. मुळातच घरची गरिबी,  झोपडपट्टी / चाळीत असलेले वास्तव्य, व्यसनाधीनता यांमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.

Coronavirus
‘कोरोना’मुळे फेरीवाल्यांची अवस्था आणखी वाईट होणार आहे

कित्येक वर्षांपासून सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यांच्या तथाकथित संघटनेने फक्त वर्गणी गोळा करण्याव्यतिरिक्त ठोस असे काहीच केले नाही. बिचारे फेरीवाले महापालिका आणि पोलीस यांना चिरीमिरी देऊन आपला व्यवसाय करीत आलेले आहेत.

महोदय, फेरीवाल्यांकरिता पुढील काही सूचना नम्रपणे आपल्यापुढे सादर कराव्याशा वाटतात.

१. फेरीवाल्यांकडे फेरीवाला म्हणून न पाहता एक व्यावसायिक म्हणून पाहावे.

२. फेरीवाल्यांना असंघटित कामगार म्हणून मान्यता / दर्जा द्यावा.

३. फेरीवाल्यांची कायदेशीर गणना करून त्यांची नोंद सरकार दरबारी ठेवण्यात यावी. ( या अगोदर ती बऱ्याचवेळा झालेली आहे. त्याची छाननी तात्काळ करण्यात यावी).

४. फेरीवाल्यांचा विमा काढण्यात यावा.

५. फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्यात यावे.

६. फेरीवाल्याला जागेचे लायसन्स देण्यात यावे.

७. फेरीवाल्यांना बँकेकडून कमी व्याजदरांत तात्काळ कर्ज मंजूर व्हावे. ( बँकेने कागदपत्रांचा घोळ न घालता शासनाचे फेरीवाला ओळखपत्र, आधारकार्ड इतकेच कागदपत्र तपासावेत. बँकेने फेरीवाल्यांची थोडीसुद्धा काळजी करू नये. ते देश तर सोडाच, शहर सुद्धा सोडून जाणार नाहीत).

८. फेरीवाल्याला साडे तीन फूट बाय साडे तीन फुटाची जागा उपलब्ध करून देण्यात यावी.

९. फेरीवाल्यांकडे महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक करावे.

१०. जर फेरीवाल्यांसाठी हॉकर प्लाझा सारख्या इमारती बांधणार असाल, तर त्या ठिकाणी फक्त किरकोळ विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांनाच जागा देण्यात यावी. होलसेलमध्ये विक्री करणाऱ्या घाऊक व्यापाऱ्यांना जागा देण्यात येऊ नये.

११. सरकारने दिलेल्या जागेवर त्या लायसन्स धारकालाच फेरीवाल्याचा व्यवसाय करता येईल. फार फार तर त्याच्या घरातील दुसऱ्या व्यक्तीला त्या जागेवर धंदा करता येईल. कोणत्याही परिस्थितीत तिऱ्हाईत व्यक्तीस ती जागा भाड्याने देता येणार नाही. तसे आढळल्यास ती जागा शासनाने परत ताब्यात घ्यावी.

१२. एका फेरीवाल्याच्या नावावर एकच जागा देण्यात यावी.

१३. सध्या सरकार दरबारी नोंद असलेल्या फेरीवाल्यांना आर्थिक पॅकेज तात्काळ जाहीर करावे.

महोदय, रस्त्यावरील फेरीवाला गुन्हेगार नसून तो सुद्धा स्वाभिमानी भारतीय व्यावसायिक आहे.  स्वतः अशिक्षित असूनसुद्धा बऱ्याच फेरीवाल्यांनी फेरीच्या व्यवसायावर त्यांच्या मुलांना उच्च शिक्षित केले आहे. परंतु ती संख्या फारच कमी आहे.

महोदय, फेरीवाल्यांचे धोरण हे लवकरात लवकर ठरविण्यात यावे. उगाचच वेळ घालवू नये. बाबू लोकांनी बरीच वर्षे घोळ घालविण्यातच वेळ घालविला आहे.

Coronavirus

कोरोनानंतर ( Coronavirus ) आर्थिक व्यवस्था डळमळीत होणार आहे. त्यामुळे फेरीवाल्यांचा प्रश्न फारच गंभीर आणि उग्र होऊ शकतो. त्यावर आताच संबंधित अधिकाऱ्यांना योग्य तो आदेश देऊन फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर तात्काळ उपाययोजना आखण्यात यावी ही नम्र विनंती .

आपला नम्र ,

अ‍ॅड. विश्वास काश्यप 

( लेखक माजी पोलीस अधिकारी असून सध्या मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतात)

हे सुद्धा वाचा

Coronavirus : ‘शरद पवार साहेब, आपण घराबाहेर पडू नका’

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या आमदारकीने भाजपच्या मनसुब्यांवर पाणी

COVID-19 | Why the migrant crisis stings CM Uddhav Thackeray more

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी