27 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरराजकीयमुख्यमंत्री शिंदेंनी २५ लाख दिले नाहीत, रुसवा मात्र शरद पवारांवर!

मुख्यमंत्री शिंदेंनी २५ लाख दिले नाहीत, रुसवा मात्र शरद पवारांवर!

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या पुसेसावळी गावात १० सप्टेंबर रोजी हिंसाचार घडला. त्या रात्री मुस्लीम समाजावर हल्ला झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नौशाद शिकलगार यांनी केला आहे. या हल्ल्यात नुरुलहसन शिकलगार या ३० वर्षांच्या युवकाची हत्या करण्यात आली. शिवाय या हिंसाचारात १५ ते १८ जण जखमी झाल्याचाही दावा नौशाद शिकलगार यांनी केला आहे.

या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नुरुलहसन यांच्या कुटुंबाला सरकारने २५ लाख रुपयांची मदत करावी, असे पत्र नौशाद शिकलगार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठवले होते. नुरुलहसन यांची पत्नी ७ महिन्यांची गरोदर असून त्यांचे आईवडीलही वृद्ध आहेत. पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून नौशाद यांच्या पत्राची दखल घेतली नाही. शिवाय या पत्राच्या प्रत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही पाठवली होती. त्यांनीही हे पत्र बेदखल केल्याचा, नौशाद यांचा आरोप आहे.

सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री शिंदे यांनी नुरुलहसन यांच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत न केल्याचा रुसवा नौशाद यांनी वेगळ्या पद्धतीने काढला आहे. त्यांनी थेट शरद पवारांना पत्र लिहून पक्षातील पद आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

पक्षाचा राजीनामा देताना नौशाद शिकलगार यांनी दिलेले कारण खूप महत्त्वाचे आहे. सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात मुस्लीम समाजातील लोकांची १० सप्टेंबरला दुकाने फोडण्यात आली, काहींना मारहाण झाली. यात हत्या झालेल्या नुरुलहसन यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही मोठा नेता तिथे गेला नाही, यामुळे नौशाद व्यथित झाले आहेत. म्हणूनच त्यांनी थेट शरद पवारांना पत्र लिहून पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

हे ही वाचा

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मुस्लिमांबद्दल पुतणा मावशीचे प्रेम, पदाधिकाऱ्याचा पक्षाला ‘रामराम’

मंत्रालयात आता कुत्री, मांजरी यांना नो एन्ट्री; मंत्रालयातील प्रवेशाचे नियम आणखी कडक

‘ड्रीम11’ला 40 हजार कोटींचा करचुकवल्याची नोटीस? कंपनीची थेट उच्च न्यायालयात धाव

१६ सप्टेंबर रोजी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटलो होते. तेव्हा त्यांनी नुरुलहसन यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची विनंती केली होती. तसेच नुरुलहसन यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून २५ लाख रुपयांची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचीही विनंती केली होती. त्यानंतरही काहीही फरक न पडल्याने नौशाद शिकलगार दु:खी झाले आणि थेट पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला. अखेर काल 26 सप्टेंबर रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांन पत्र लिहून त्यांचा निर्णय कळवला. दरम्यान, नौशाद यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारला की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, या निमित्ताने आपली नाराजी व्यक्त करण्याची संधी नौशाद यांनी साधली, एवढे मात्र नक्की.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी