33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमुंबईकाँग्रेस, राष्ट्रवादीने मागे हटू नये, शिवसेनेसोबत एकत्र सरकार बनवावे : खासदार संजय...

काँग्रेस, राष्ट्रवादीने मागे हटू नये, शिवसेनेसोबत एकत्र सरकार बनवावे : खासदार संजय राऊत यांचे आवाहन

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई :  भाजपने देशात व राज्यात चुकीच्या पद्धतीने काम केले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भाजपचा राज्यात मुख्यमंत्री होऊ नये अशी विधाने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली होती. आता या भूमिकेवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ठाम राहावे व शिवसेनेसोबत सरकार बनवावे, असे जाहीर आवाहन खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

राऊत पुढे म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कसोटीचा हा क्षण आहे. त्यांनी आपल्या आधीच्या वक्तव्ये स्मरून निर्णय घ्यावा. आपण सगळेजण एकत्र येवून सरकार बनवूया. शेतकरी, बेरोजगारी, महिला, युवा इत्यादी मुद्द्यांवर ‘समान किमान कार्यक्रम’ हाती घेऊन राज्याचा विकास करता येईल.

काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला आहे. केंद्रामध्ये एका मंत्रीपदासाठी कशाला राहायचे ?. त्यामुळे केंद्रीय मंत्री सावंत राजीनामा देत आहेत. याचा जो काही अर्थ काढायचा असेल तो काढावा.

– खासदार संजय राऊत

राज्यपालांनी सरकार बनविण्यासाठी दिलेला 24 तासाचा वेळ फारच कमी आहे. आम्हाला जास्त वेळ द्यायला हवा होता. भाजपला 72 तासांचा वेळ दिला होता. त्या तुलनेत आम्हाला त्यांनी खूपच कमी वेळ दिला आहे. आमच्याकडे आमदारांची कमी संख्या आहे. अशा परिस्थितीत अनेक पक्षांचे सरकार बनविण्यासाठी अधिक वेळ देणे अपेक्षित होते. राज्यपालांनी सरकार बनविण्यासाठी आम्हाला निमंत्रित केले आहे. आम्ही सरकार बनवू इच्छितो.

– संजय राऊत

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पाकिस्तानातील पक्ष नाहीत. ते या मातीतलेच पक्ष आहेत. त्यांचे देश विकासामध्ये मोठे योगदान आहे. काही मुद्द्यांवर आमचे मतभेद असू शकतात. पण महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची अस्थिरता राहू नये. राष्ट्रपती राजवटीच्या माध्यमातून स्वतःकडेच सत्ता ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न साध्य होऊ नये, यांवर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात एकमत आहे. या तिन्ही पक्षांच्या सगळ्याच वरिष्ठ नेत्यांचा एकमेकांशी व्यवस्थित संवाद सुरू आहे. यातील एकही नेता सत्तेसाठी हापापलेला नाही. परंतु भाजपविरोधात तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमत असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

महत्वाची बातमी : काँग्रेसची दिल्लीत, तर राष्ट्रवादीची मुंबईत तातडीची बैठक

मोठी बातमी : शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा राजीनामा, शिवसेनेची एनडीएसोबत काडीमोड

भाजप शिवसेनेच्या पाठी फिरतेय, अन् शिवसेना काँग्रेस – राष्ट्रवादीकडे भीक मागतेय : मनसेचा निशाणा

फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत, याचा विनोद तावडेंना आनंद, मनसेने उडविली खिल्ली

दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना यांची विचारधारा भिन्न असल्याबाबत विचारले असता, मेहबुबा मुफ्ती आणि भाजप यांची विचारधारा एक होती काय ? तरीही हे दोन्ही घटक काश्मिरमध्ये कसेकाय एकत्र आले. त्यांच्यात लव्ह जिहाद होता का ? असाही उलटा सवाल राऊत यांनी केला.

राऊत यांनी यावेळी भाजपचा चांगलाच समाचार घेतला. भाजप सत्ता स्थापन करू शकला नाही, याचे खापर शिवसेनेवर फोडणे चुकीचे आहे. युती करण्यापूर्वी जे ठरले ते केले असते तर विरोधी पक्षात बसू अशी सांगण्याची वेळ भाजपवर आली नसती. आम्ही विरोधी पक्षात बसू, सत्ता लाथाडू, पण शिवसेनेला अडिच वर्षे मुख्यमंत्रीपद देणार नाही. 50 – 50 टक्के वाटा देणार नाही. हा भाजपाची अहंकारी भूमिका आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका टिप्पणी करू नये. भाजपने राज्यपालांना सांगितले, सरकार बनवू शकत नाही. शिवसेना आमच्यासोबत येत नाही. त्यांच्याकडे बहुमत नाही. भाजपने महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला आहे. भाजपने परस्पर विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली आहे. हे भाजपचे मोठे षडयंत्र आहे. दोघांमध्ये जे ठरले होते, ते व्हायला हवे होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी