27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयफडणवीस यांनी डाव मांडला, पण हुकुमाचे पत्ते दूर सारले

फडणवीस यांनी डाव मांडला, पण हुकुमाचे पत्ते दूर सारले

सत्ता सुंदरीचा नयन कटाक्ष अनेकांना घायाळ करतो, काही हुशार राजकारणी या सुंदरीचा आपल्या परीने वापर करतात. माजी मुख्यमंत्री आणि आजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यापैकी एक. पक्षातील विरोधक संपवण्यासाठी त्यांनी विविध युक्त्या लढवत भाजपातील बहुजन आणि ब्राह्मण स्पर्धकांना संपवल्याची जोरदार चर्चा भाजपात आहे.फडणवीस यांनी राज्यात सत्तेचा डाव मांडला, पण हुकुमाचे पत्ते दूर सारले, अशी कुजबूज भाजपात आहे. अहंकारी स्वभावाने त्यांनी आधी पक्षातील स्पर्धकांना संपवण्याचे काम केले. नंतर नैसर्गिक मित्र असलेल्या शिवसेनेचा काटा दिल्लीश्वरांकडून काढला. फडणवीस यांनी हे केले नसते तर शिवसेना- भाजपा युती तर राहिली असती, नव्हे तर महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात झाला नसता; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याची वेळ आली नसती. असे आता भाजपाचे जुने कार्यकर्ते बोलू लागले आहे.

2019 मध्ये भाजपला 105 जागा मिळाल्या, पण मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपात जुंपली. अखेर दोघांची युती तुटली आणि शिवसेना दोन्ही कॉँग्रेसची महाआघाडी अस्तित्वात आली. गोपीनाथ मुंडे या लोकनेत्यामुळे भाजपा राज्यात रूजली. माळी, धनगर आणि वंजारी (माधव) यांची लोकसंख्या जास्त असूनही सत्तेत त्यांना नीटसे सामावून घेतले जात नव्हते. हाच धागा पकडून भाजपने माधव फॉर्म्युला राबवला आणि हे सत्तेपासून उपेक्षित घटक भाजपकडे आकृष्ट झाले. मुंडे यांनी राज्य पिंजून काढत भाजपा राज्यात रुजवला. नंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपची युती झाली. ती पंचवीस वर्षाहून अधिक काळ टिकली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा करिष्मा, त्यात भाजपने घेतलेल्या लहान भावाच्या भूमिकेमुळे शिवसेनेबरोबर भाजपा अल्पावधीत राज्यात रुजू लागली. नव्वदच्या दशकात शिवसेना-भाजपा सत्तेवर आली आणि भाजपला सत्तेची चटक लागली. असा भाजपचा एकूण इतिहास आहे. अशा या भाजपची खरी ओळख केडरबेस पार्टी अशी होती. पण गोपीनाथ मुंडे गेल्यावर फडणवीस यांच्याकडे राज्याच्या भाजपची सूत्रे आल्यावर भाजपात बेरजेचे राजकारण सुरू झाले. पण हे राजकारण करताना एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे आदी बहुजन नेत्यांकडे फडणवीस यांनी दुर्लक्ष केले. नव्हे तर हेच त्यांचे पक्षातील प्रतिस्पर्धी असल्याने या मंडळींचे अस्तित्व संपवण्यासाठी फडणवीस यांनी आपली बुद्धी आणि ताकद वापरली, भाजपातील ब्राह्मण नेतृत्व संपवण्यात फडणवीस यांची महत्वाची भूमिका राहिली आहे.

तत्कालीन आमदार गिरीक्ष बापट यांना थेट दिल्लीचा रस्ता दाखवण्यात, विनय सहस्त्रबुद्धे यांनी रेल्वे राज्यमंत्री होऊ नये, मेधा कुलकर्णी यांचे पुण्यात प्रस्थ निर्माण होऊ नये यासाठी त्यांचे तिकीट चंद्रकांत पाटील यांना पुढे करून कापणे, प्रकाश मेहता हे केंद्राच्या सत्ता केंद्राजवळ जाताच त्यांचा पत्ता कापणे, संघाच्या जवळचे असणारे ठाण्याचे आमदार संजय केळकर राज्याचा राजकारणात येऊ नये यासाठी फडणवीस यांनी केळकर यांच्यापेक्षा जूनियर रवींद्र चव्हाण यांना दोनदा मंत्री करून बळ दिले. आपली सगळी शक्ती, युक्ती वापरुन राज्यात देवेंद्रशिवाय दिल्लीपतीचे पान हलू नये याची तजवीज केली अशी चर्चा भाजपच्या जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यामध्ये आहे. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय नेतृत्वाने मोकळीक दिल्याने सध्या राज्याचे वाटोळे झाले असून यात भाजपा हकनाक बदनाम होत असल्याचे निरीक्षण हे कार्यकर्ते व्यक्त करत आहे.

हे सुद्धा वाचा:

हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल; चांद्रयान- ३ च्या यशस्वी उड्डानानंतर मोदींच्या शुभेच्छा

आमदार अपात्रतेबाबत चालढकल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना भोवण्याची शक्यता; सुप्रीम कोर्टाची नोटिस

राज्याच्या शाळा व्यवस्थापनाचा दर्जा सुधारण्यासाठी वेळीच उपाययोजना करायला हव्यात; शरद पवारांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र

2019 मध्ये भाजपला 105 जागा मिळाल्या. अंतर्गत लाथाळीमुळे या निवडणुकीत भाजपाने सहा आमदार गमावले. जर या आमदारांना निवडून दिले असते तर आज भाजपाचे विधानसभेत 111 आमदार असते, पण 2019 च्या विधानसभा निवडणूक प्रचारात ‘मी पुनः येईन, मी पुनः येईन’ अशी घोषणा केलेल्या फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून फोडून अडीच वर्षाने सत्तासुंदरी मिळवली. पण हे करत असताना नको त्या तडजोडी करत अखेर शरद पवार यांचा पक्ष फोडून सत्ता अधिक मजबूत केली. अजित पवार हे फडणवीस आणि शिंदे यांना किती पुसतात, हे येत्या काळात दिसेल, पण सत्तेसाठी भाजपने केलेल्या तडजोडीने सर्व सामान्य कार्यकर्ता तर दुखावलेला आहेच, दरम्यान, भाजपने केलेल्या अंतर्गत चाचण्यात भाजपाविरोधात जनमत असल्याची बाब समोर आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी