23 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeराजकीयआमदार अपात्रतेचा निकाल २०२४ मध्येच? विधानसभा अध्यक्षांकडून सुनावण्यांचे वेळापत्रक जाहीर

आमदार अपात्रतेचा निकाल २०२४ मध्येच? विधानसभा अध्यक्षांकडून सुनावण्यांचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे राजकारण ढवळून टाकणाऱ्या आमदार अपात्रतेचा निकाल यंदा म्हणजेच २०२३ मध्ये लागण्याची शक्यता मावळली आहे. कारण शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या ५४ आमदारांनी एकमेकांविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर कशी सुनावणी करणार, याचे वेळापत्रक विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याकडे दिले आहे. हे वेळापत्रक ५ ऑक्टोबरपूर्वी सर्वोच्च न्यायालयात सादर करायचे आहे. या वेळापत्रकानुसार उलटतपासणी २३ नोव्हेंबरपासून सुरू होईल. दोन्ही पक्षांच्या वकिलांना सोयीनुसार तारखा देण्यात येतील. ही प्रक्रिया संपल्यानंतर दोन आठवड्यांनी सुनावणीची तारीख निश्चित होईल. त्यामुळे आमदार अपात्रतेचा निकाल २०२४ मध्येच लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या वेळापत्रकावरून ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘न्यायाला उशीर म्हणजे अन्याय’, अशी टीका केली आहे.

आमदार अपात्रतेची पहिली सुनावणी २५ सप्टेंबरला झाली. त्यानंतर पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला होणार आहे. आमदार अपात्रतेच्या निर्णयाला विलंब होत असल्याची तक्रार ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेतून केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीचा तपशील सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते. एवढेच नाही तर राहुल नार्वेकर या प्रकरणात एक लवाद म्हणून जबाबदारी पार पाडत असल्याचेही स्पष्ट केले होते.

या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी सुनावणीचे वेळापत्रक सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यासाठी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याकडे दिले आहे. हे वेळापत्रक कसे आहे, कोणत्या दिवशी कोणते कामकाज केले जाईल, पाहुया

१३ ऑक्टोबर २०२३ – या आधी २५ सप्टेंबरच्या सुनावणीत सर्व याचिका एकत्र करून सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती, तर प्रत्येक याचिकेवर वेगळी सुनावणी घ्यावी, अशी मागणी शिंदे गटाने केली होती. त्यामुळे या दोन्ही मागण्यांवर १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी घेतली जाईल.
१३ ते २० ऑक्टोबर – दोन्ही पक्षांच्या वकिलांना कागदपत्रे तसेच आदेशांची पाहणी करण्यासाठी संधी देण्यात येईल
२० ऑक्टोबर – याचिकांवर वेगवेगळी सुनावणी घ्यावी की एकत्रित यावर अध्यक्ष निर्णय जाहीर करणार
२७ ऑक्टोबर – कोणती कागदपत्रे स्वीकारायची आणि कोणती कागदपत्रे नाकारायची, यावर शिंदे गट आणि ठाकरे गट म्हणणे मांडतील
६ नोव्हेंबर – अपात्रतेबाबत दोन्ही पक्ष त्यांची भूमिका लेखी स्वरुपात स्पष्ट करतील
१० नोव्हेंबर – आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकतील
२० नोव्हेंबर – दोन्ही बाजूंच्या पक्षाकडून साक्षीदारांची यादी आणि प्रतिज्ञापत्र सादर केली जातील
२३ नोव्हेंबर – आठवड्यातून दोनदा अशा पद्धतीने उलटतपासणीला सुरुवात होईल. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या आमदारांना आणि वकिलांना त्यांच्या सोयीनुसार तारीख दिली जाईल.
निर्णयापूर्वी अंतिम युक्तिवादाची संधी – वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन आठवड्यांनी सुनावणीची अंतिम तारीख ठरेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी