मुंबईच्या मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर यांना मराठी आहेत म्हणून जागा नाकारण्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला. त्यानंतर कांदिवलीत परप्रांतीय तरुणांकडून मराठी युवकाला मारहाणीचा प्रकारही सोमवारी उघडकीस आला आहे. हे कमी म्हणून की काय जव्हारमध्ये एका आदिवासी ग्रामसेवकाला परप्रांतीयाने मारहाण केल्यामुळे आदिवासी समाज आक्रमक झालाय. महाराष्ट्रात परप्रांतीयांची मुजोरी वाढत असून मराठी माणसावरच दादागिरी, घर नाकारण्याची त्यांची हिंमत होत असल्याचे राज्यात संतापाची लाट उसळलीय. या तिन्ही घटनांनंतरही सरकारकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे राजकीय पक्षांनीही सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर तृप्ती देवरुखकर यांनी आज शिवतीर्थावर जाऊन शर्मिला ठाकरे यांची भेट घेऊन वेळीच पाठिशी उभे राहिल्याबद्दल आभार मानले आहेत.
तृप्ती देवरुखकर यांना मुलुंडमधील एका सोसायटीत ऑफिससाठी जागा हवी होती. पण त्या मराठी असल्याचे सांगत त्यांना मानहानीकारक पद्धतीने जागा नाकारण्यात आली होती. त्यांनी हा अनुभव सोशल मीडियावर शेअर करताच वातावरण चांगलेच तापले. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारताच त्यांची चांगलीच तंतरली. अखेरी त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी तृप्ती देवरुखकर आणि मराठी माणसांची माफी मागितली. त्यानंतर आज तृप्ती देवरुखकर यांनी शर्मिला ठाकरेंची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
दरम्यान, यावरून राज ठाकरेंनीही ट्वीट करत चांगलाच दम भरलाय. ‘हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित.’ असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. त्याचवेळी सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे, असे सरकारला सुनावले आहे.
मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने…
— Raj Thackeray (@RajThackeray) September 29, 2023
जव्हारमध्येही परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला मारहाण करण्याची घटना घडलीय. या ग्रामसेवकाने त्याची दुचाकी जव्हारमधील एसटी स्टँड परिसरात लावली होती. तिथेच या फूलविक्रेत्याचा स्टॉल आहे. यावरून त्यांने ग्रामसेवकाला बेदम मारहाण केली. या प्रकरणानंतर आदिवासी संघर्ष समिती आक्रमक झाली असून या परप्रांतीय फूलविक्रेत्यावर कारवाई करावी, तसेच बस स्टँड परिसरातील अतिक्रमण करणाऱ्या सर्व गाड्या हटवण्याची मागणी केली आहे. याची दखल जव्हारच्या मुख्याधिकाऱ्यांनी घेतली असून अतिक्रमक हटवण्याची कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
हे ही वाचा
मराठी महिलेला जागा नाकारण्यावरून सेना-मनसेत चिखलफेक!
मंत्रालयातील प्रवेशाचा नियम, कुणाचा ‘वरचा मजला’ रिकामा? नोकरशाहीवर टीकेचा आसूड
तर सोमवारी कांदिवलीतही सिद्धार्थ किसन अंगुरे या मराठी युवकाला काही परप्रांतीय तरूणांनी अडवले आणि जय श्रीरामच्या घोषणा देण्याची जबरदस्ती केली. सिद्धार्थने घोषणा करण्यास नकार दिला म्हणून त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. सिद्धार्थवर कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.