33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमंत्रालयमंत्रालयातील प्रवेशाचा नियम, कुणाचा 'वरचा मजला' रिकामा? नोकरशाहीवर टीकेचा आसूड

मंत्रालयातील प्रवेशाचा नियम, कुणाचा ‘वरचा मजला’ रिकामा? नोकरशाहीवर टीकेचा आसूड

मंत्रालयात सुरक्षेच्या कारणास्तव काही कठोर नियम करण्यात आले आहेत. या नियमावरून बराच गदारोळ सुरू झाला आहे. आता मंत्रालयात येणाऱ्या जिथे जायचे आहे त्याच मजल्यावरचा पास दिला जाईल. त्यासाठी विशिष्ट रंगाचा पास असेल. या नियमावरूनच ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळकर यांनी घणाघाती टीका केलीय. असा आदेश काढणाऱ्या नोकरशाहीचा ‘वरचा मजला’ रिकामा आहे काय? असा थेट सवाल शेजवळकर यांनी केला आहे. एवढेच नाही तर यासाठी यासाठी शेजवालकर यांनी थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला आहे. त्यामुळे आता तरी नवा नियम सरकार बदलणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

काही दिवसांपूर्वी मंत्रालयात आलेल्या एक युवकाने शिक्षक भरतीसाठी जाळीवर उडी मारून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. असे प्रकार वारंवार घडत असल्याने सरकारने लगेचच मंत्रालयाची सुरक्षा कडक करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर तातडीने काही नियम बनवण्यात आले. या नियमांमध्ये भेटीसाठी आलेल्यांना ज्या मजल्यावर जायचे आहे त्याच मजल्याचा पास दिला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. एवढेच नाही तर प्रत्येक मजल्यासाठी रंग ठरवला जाईल आणि त्याच रंगाचा पास अभ्यागतांना दिला जाईल. म्हणजे ही मंडळी मंत्रालयात भटकत राहणार नाहीत.

पण ज्यांना अनेक विभागांमध्ये कामे आहेत, त्यांनी काय करायचे याबाबत नियमांमध्ये काहीही स्पष्टता नाही. मंत्रालयात येणारे अनेकवेळा तीन-चार खात्यांची कामे घेऊन येतात. संबंधित खात्यांची कार्यालये एकाच मजल्यावर असण्याची शक्यताही नाही. अशा लोकांची खूप गैरसोय होणार आहे. त्यांना एका विभागाचे काम झाल्यानंतर पुन्हा वेगळ्या मजल्यावरील विभागाचा पुन्हा पास काढावा लागेल. ही प्रक्रिया त्यांच्यासाठी वेळखाऊ आणि किचकट ठरू शकते.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अशी मंडळी मंत्रालयात रोज येत असतात. सुरक्षेच्या नव्या नियमामुळे गरजू लोकांची खूप  अडचण होणार आहे. म्हणूनच ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळकर यांनी ट्वीटच्या माध्यमातून मंत्रालयातील नोकरशाहीवर सडकून टीका केली आहे.

दिवाकर शेजवालकर यांनी ट्वीट करत काय टीका केलीय पाहुया, ‘मंत्रालयात एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यास लोकांना बंदी! हा माथेफिरू आदेश काढणाऱ्या नोकरशाहीचा ‘वरचा मजला’ रिकामा आहे काय? एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाता न येणाऱ्या इमारतीची उपमा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 4 वर्ण असलेल्या व्यवस्थेला दिली होती!’

हे ही वाचा

मंत्रालयाबद्दल IPS देवेन भारतींनी चिंता व्यक्त केली, पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी त्यावर उपाय शोधून दिला !

मंत्रालयात उड्या मारणाऱ्यांवर जाळीचे कोंदण !

सामान्य जनतेसाठी मंत्रालयात हुकूमशाही, दलालांना मात्र मुक्त प्रवेश !

आपले नोकरशहा एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यास लोकांना मनाई करत आहेत. याची तुलना ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाकारलेल्या चातुर्वण्य व्यवस्थेशी केली आहे. जसे चातुर्वर्ण्य बदलता येत नव्हते तसेच सामान्यांना एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जात नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चातुर्वर्ण्य व्यवस्था मान्य नव्हती. जातीविरहित व्यवस्था खूप महत्त्वाची असल्याचे डॉ. आंबेडकर म्हणायचे. आणि मंत्रालयात सुरक्षेच्या कारणास्तव नेमके उलटे होत असून त्याला शेजवळकर यांनी आक्षेप घेतला आहे. सुरक्षेसाठी सरकारने बनवलेल्या नव्या नियमावर किती नाराजी आहे, याचा हा उत्तम दाखल आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी