31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयशरद पवारांनी उघड केले, अजित पवारांचे भाजपसोबत जाण्याचे कारण

शरद पवारांनी उघड केले, अजित पवारांचे भाजपसोबत जाण्याचे कारण

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतीने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्याच्या आदल्या दिवाशी नेहरू सेंटरमध्ये बैठक सुरू होती. या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांसोबत माझे तीव्र मतभेद झाले. त्यानंतर मी तिथून गेलो. आताच जर असे मतभेद होत असतील तर पुढे काय होणार अशा भावना अजित पवार यांनी व्यक्त केली. त्यानंतर ते थेट फडणवीस यांनाच जाऊन भेटल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या खास मुलाखतीत पवार यांनी ही माहिती दिली.

पवार म्हणाले की, नेहरू सेंटरमध्ये आमची बैठक सुरू होती. काँग्रेससोबत आमचे मतभेद झाले. त्यामुळे मला सहकाऱ्यांनी सुचविले की, आम्ही चर्चा करतो. तुम्ही गेला तरी चालेल. तुम्हाला नंतर बोलावतो. त्यानुसार मी तिथून निघून गेलो. काँग्रेसच्या टोकाच्या भूमिकेवर अजित पवार नाराज झाले होते. त्यामुळे या आघाडीत सहभागी होण्यास माझा आक्षेप असल्याचे अजित पवार म्हणाले, आणि ते देवेंद्र फडणवीसांना जाऊन मिळाले.

शिवसेनेसोबत आमची चर्चा सुरू होण्यापूर्वी फडणवीसांना व भाजपच्या लोकांनाही वाटायचे की, आमच्याशी बोलले पाहीजे. फडणवीसांची आमच्या काही लोकांशी बोलायची इच्छा होती. अजित पवारांनीही मला विचारले होते की, देवेंद्र फडणवीसांना काही बोलायचे आहे. बोलू का. त्यावर संवाद साधण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे मी बोल असे म्हणालो होतो. त्यानंतर एके दिवशी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस काय म्हणताहेत हे मला सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु यावर आपण नंतर बोलू असे मी सांगितले. शिवसेना – काँग्रेससोबतची चर्चाही बरीच पुढे गेली होती. आमचे काँग्रेस – शिवसेनेसोबत जाण्याचे निश्चित झाले होते. संजय राऊतांनी आम्हाला सांगितले होते की, आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत. शिवसेना भाजपपासून वेगळी होत असेल तर महाराष्ट्रात एक वेगळी स्थिती होऊ शकते, हा विचार मी केला होता. आणि त्यातूनच शेवटी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत जायचा निर्णय घेतला होता.

आम्ही आमच्या बैठकांमध्ये आमदारांच्या सह्या घेतलेल्या होत्या. अजित पवारांची पक्षनेते निवड झालेली होती. त्यातील एक यादी अजित पवारांनी घेतली. नेहरू सेंटरमध्ये झालेल्या मतभेदानंतर ते रागाने फडणवीसांना भेटले. त्यावेळी अजित पवारांना भाजपने आग्रह केला होता की, आमच्यासोबत यायचेच असेल तर आताच शपथ घ्या. नाहीतर नको. त्यातून अजित पवारने शपथ घेतली. मला याबद्दल काहीच माहित नव्हते. पहाटे सहा वाजता सुप्रियाने मला उठविले आणि हा सगळा प्रकार सांगितला. मला त्यावेळी विश्वासच बसत नव्हता.

आमचे काही आमदार तिथे गेले होते. माझ्या नावाचा वापर करून त्यांना तिथे नेले होते. ही चुकीची दिशा अजितने पकडली आहे. हा प्रकार मोडून काढायचा. त्याचे परिणाम जे व्हायचे ते होऊद्या, असा मी विचार केला. त्यानंतर दोन – तीन तासांत ही परिस्थिती अटोक्यात आल्याचे पवार म्हणाले.

लोकांमध्ये समज होता की, पवारांच्या संमतीनेच अजित पवार तिकडे गेले असावेत. हा समज खोटा ठरविणे गरजेचे होते. त्यामुळे मी पहिला फोन उद्धव ठाकरे यांना केला. त्यांना विश्वासात घेतले. आम्ही दोघांनी पत्रकार परिषद घेतली. माझा पाठिंबा नाही म्हटल्यावर पक्षातील नेत्यांनाही आत्मविश्वास आला होता. जे अजित पवारांबरोबर गेले होते, त्यांच्यावर दबाव आला. ते सगळे परत मला भेटले. अजितच्याही हे लक्षात आले. आमच्या कुटुंबातही अजितने केलेला हा प्रकार आवडला नव्हता. त्यामुळे एका सकाळी अजित माझ्याकडे आला. माझ्याकडून चूक झाल्याचे तो म्हणाला. त्यावर ही अक्षम्य चूक आहे. त्याची किंमत तुझ्यासह अनेकांना भोगावी लागेल, हे मी त्याला सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही प्रश्न असेल तर आमदार, नेते व कार्यकर्ते अजित पवारांकडे जातात. माझे दैनंदिन कामात लक्ष नसते. अजित त्यात लक्ष घालतो, आणि तो प्रश्न सोडवतो. अजितला मानणारा मोठा वर्ग पक्षात आहे. या वर्गाला वाटत होते की, अजितने चुकीचे केले आहे. पण त्याच्यावर कारवाई करू नये. मंत्रीपदाची शपथ जयंतराव व भुजबळ यांनी घेतली. त्यावेळी अजितचे नाव चर्चेत होते. पण जयंतराव मजबुतीने उभे राहिले होते म्हणून त्यांना शपथ दिली. अजित पवार चुकले म्हणून त्यांना शपथ दिली नाही. स्वतः अजितचे म्हणणे होते की, बिघडलेले वातावरण व्यवस्थित होईपर्यंत त्याने शपथ घ्यायला नको. अजितने परत यायचा निर्णय घेतला तेव्हा पहिला फोन सुप्रियालाच केला होता, याचीही आठवण पवार यांनी यावेळी सांगितली.

नरेंद्र मोदींनी ऑफर दिली होती

राज्यातील सत्ता संघर्ष टिपेला पोचला होता. त्याच काळात विदर्भातील अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेलो होतो. मी पूर्वीच वेळ मागितली होती. पण त्यांच्या कार्यालयाने मला नेमकी हीच वेळ दिली होती. कदाचित गैरसमज वाढावेत म्हणून ही वेळ दिली असेल. शेतकऱ्यांना केंद्राने मदत देणे गरजेचे आहे या भावनेतून मी पंतप्रधानांना भेटायला गेलो होतो. विदर्भातील अतिवृष्टीची माहिती मी त्यांना त्यावेळी दिली. तिथून मी निघत असताना पंतप्रधानांनी मला थांबविले. आपण एकत्र काम केल्यास आनंद वाटेल असे ते म्हणाले. सुप्रियालाही मंत्रीपद देतो असे ते म्हणाले. त्यावर हे राजकीयदृष्ट्या योग्य होणार नाही असे मी त्यांना सांगतिले. आमच्या पक्षाला एक वेगळी दिशा दिलेली आहे. त्यामुळे तुमच्यासोबत यायचे म्हणजे वेगळ्या दिशेला नेल्यासारखे होईल, असे पंतप्रधानांना सांगितल्याचे पवार म्हणाले.

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे तयार नव्हते

आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह धरलेला नव्हता. जर तो धरला असता तर ते पद अडीच वर्षांसाठी मिळालेही असते. पण अजित पवारांमुळे निर्माण झालेले वातावरणानंतर लवकर तोडगा काढायचा होता. त्यामुळे त्या फंदात आम्ही पडलो नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायला तयार नव्हते. शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असा शब्द दिलेला आहे. त्यासाठी मी मुख्यमंत्री व्हायची आवश्यकता नाही असे ते म्हणायचे. पण तिन्ही पक्षांमध्ये सहजवाक्यता राखण्यासाठी उद्धव ठाकरे हीच एकमेव पात्र व्यक्ती होती. त्यासाठी मी त्यांना आदेशवजा सांगितले की तुम्हीच मुख्यमंत्री व्हा. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी तयार झाले.

मी रिमोट कंट्रोल म्हणून काम करणार नाही

उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांना सहकार्य करणे हीच माझी भूमिका असेल. त्यांनी विचारला तरच मी सल्ला देईन. अखंडपणे नियंत्रण ठेवत बसलो तर प्रशासन नीट चालणार नाही. आम्ही जो कार्यक्रम आखला आहे त्यानुसार ते काम करतील. त्याबाबत चर्चा केली आहे. आणखीही चर्चा करणार आहोत. उद्धव ठाकरे चांगले काम करतात. महापालिकेतील त्यांची कार्यपद्धत मी पाहिलेली आहे. प्रशासन यंत्रणेत अधिकाऱ्यांना विश्वासात घेतले, त्यांना प्रोत्साहन दिले तर ते चांगला रिझल्ट देतात. उद्धव ठाकरे यांची कार्यपद्धत दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करणारी नाही. त्यामुळे ते चांगले काम करतील.

आरेचा निर्णय योग्यच

राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे काही खर्च थांबवावे लागतील. बुलेट ट्रेनची आपल्याला गरज आहे का. त्याला प्राधान्य गरजेचे आहे का. त्याची उपयुक्तता आहे का. उपयुक्तता नसेल तर एवढा मोठा खर्च महाराष्ट्राने पेलावा का याचा विचार करायलाच हवा. मेट्रोच्या बाबतीत वृक्षवल्लीचा विचार करायला हवा. मुंबईत आरेसारखी केंद्र फुफ्फुसाचे काम करतात. ते मुंबईला ऑक्सीजन पुरवते. त्याचा विचार व्हायलाच हवा.

पंकजा मुंडे भाजप सोडतील असे वाटत नाही

एकनाथ खडसे, पंकजा पुंडे नाराज आहेत. मी पंकजा मुंडेंबद्दल वाचलं. निवडणुकीत पराजय झाला, त्यात त्यांच्या पक्षातील लोकांकडून दगाफटका झाल्याची भावना पंकजा यांची आहे. पण त्या पक्षाची चौकट सोडून वेगळा निर्णय घेतील असेल मला वाटत नाही.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांना ‘त्या’ संतप्त कार्यकर्त्याचे पुन्हा पत्र !

शरद पवारांनी शिवसेना स्टाईलमध्ये दिला ‘हा’ आदेश

खळबळजनक : भाजपने लपविलेले पाच आमदार कडक पहारा फोडून शरद पवारांनी आणले परत

शरद पवार म्हणाले, अजित पवारांना माझा छुपा पाठिंबा सुद्धा नाही

शरद पवार समजून घेण्यासाठी भाजपला १०० जन्म लागतील : संजय राऊत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी