29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयशिंदे – फडणविसांच्या नावाने शेतकऱ्यांचा ‘ठणाणा’

शिंदे – फडणविसांच्या नावाने शेतकऱ्यांचा ‘ठणाणा’

टीम लय भारी

मुंबई : नवे सरकार हे शेतकरी, कष्टकरी व सामान्य जनतेसाठी काम करेल, अशी घोषणा नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. परंतु सत्तेवर येताच त्यांनी पहिला झटका शेतकऱ्यांनाच दिला आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी शिंदे – फडणवीस यांच्या नावाने ठणाणा करू लागले आहेत.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला ५० हजार सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय ‘महाविकास आघाडी’ सरकारने घेतला होता. राज्यातील जवळपास ६० ते ७० टक्के शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार होता.

सरकारने जाहीर केलेले अनुदान लवकरच आपल्याला मिळेल अशा आशा शेतकऱ्यांना लागून राहिल्या होत्या. राज्यात सध्या पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली आहे. नवीन पिके घेण्यासाठी या ५० हजार अनुदानाचा फायदा होईल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली होती.

परंतु एकनाथ शिंदे सरकार सत्तेवर येताच त्यांनी पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना ५० हजार रूपये अनुदान देण्याचा निर्णय रद्दबातल केला. त्यामुळे शेतकऱ्यांचा पुरता हिरमोड झाला आहे. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शेतकऱ्यांकडून उघड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा :

‘या’ जिल्ह्यात घेण्यात येणार ‘अग्निपथ’ सैन्य भरती मेळावा

VIDEO : एकनाथ शिंदे म्हणतात, उद्धव ठाकरेंच्या आदेशापुढे मंत्रीपद मोठे नाही

भाजप – शिंदे सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला?

सातारा जिल्ह्यातील दादा पाटील या कार्यकर्त्याने सांगितले की, गेल्या तीन महिन्यांपासून अधिकाऱ्यांनी तगादा मागे लावला होता. गेल्या जवळपास तीन वर्षांतील कर्जफेडीची आकडेवारी अधिकाऱ्यांनी जमा करून नेली होती. त्यामुळे लवकरच ५० हजार रुपयांचे अनुदान मिळेल, अशी आशा आमच्या गावातील शेतकऱ्यांना लागली होती. मावळत्या सरकारने ही घोषणा केल्यामुळे शेतकरी आनंदीत झाले होते. नव्या सरकारने हे अनुदान रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांचा पुरता हिरमोड झाला असल्याचे ते म्हणाले.

प्रशांत विरकर या कार्यकर्त्यानेही अशाच भावना व्यक्त केल्या आहेत. शिंदे सरकारचा ‘महाविकास आघाडी’ सरकारवर राग असू शकतो. परंतु मागच्या सरकारवर राग काढण्यासाठी शेतकऱ्यांचे नुकसान करणे योग्य नाही. हे सरकार शेतकरी, कष्टकऱ्यांचे आहे, हे तोंडाने बोलून उपयोग नाही. कृती तशी व्हायला हवी. पण शिंदे यांनी पहिल्याच बैठकीत शेतकरी विरोधी निर्णय घेऊन फार वाईट पायंडा पाडला आहे. सत्तेचे वादात शेतकऱ्यांचे नुकसान करू नका, अशीही भावना विरकर यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी