27 C
Mumbai
Thursday, June 27, 2024
Homeटॉप न्यूजशरद पवारांची खेळी, अजित पवारांना एकटे पाडण्यासाठीचे प्रयत्न सुरू; अजित पवारांचा मुक्काम...

शरद पवारांची खेळी, अजित पवारांना एकटे पाडण्यासाठीचे प्रयत्न सुरू; अजित पवारांचा मुक्काम श्रीनिवास पवारांच्या घरात

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : राजकारणातील गद्दारीचा नवा अंक अजित पवार यांनी आज लिहिला. पण या गद्दारीविरोधात शरद पवार यांनी बडगा उगारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सह्यांची यादी अजित पवारांनी कार्यालयातून घेतली, आणि त्या आधारे राज्यपालांनी सरकार बनविण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांची ही कृती राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाविरोधात आहे. राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यकर्ताला पटणारी नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. आमदारांची बैठक आज होणार आहे. त्यात पक्षाचे आमदार अजित पवारांवर कारवाईचा निर्णय घेतील, असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे – पाटील, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते.

काय म्हणाले शरद पवार ?

काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी एकत्रित बसून महाराष्ट्रात सरकार बनविण्याची तयारी केली आहे. आमच्याकडे एकूण 170 आमदारांचे बहुमत आहे. काल आमची बैठक झाली होती. त्यानंतर काही गोष्टी घडल्या. आज सकाळी साडे सहा ते पावणेसात वाजता मला एका सहकारी आमदाराचा फोन आला. आम्हाला राजभवनावर आणलं गेल्याचे त्यांनी सांगितले. राज्यपाल पहाटेच कार्यक्षम झाल्याचे पाहून मला आश्चर्य व आनंदही वाटला. त्यानंतर थोड्याच वेळात मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस, व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ अजित पवार यांनी घेतल्याचे पाहिले. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या धोरणाच्या विरोधातील निर्णय आहे. जो राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे तो भाजपसोबत सरकार बनविण्याच्या प्रक्रियेत जाणार नाही. जे आमदार अजित पवार यांच्या बरोबर गेले आहेत, किंवा जाणार आहेत त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई होईल. महाराष्ट्रात सध्या भाजपच्या विरोधात जनमत आहे. त्यामुळे अजित पवार व त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांच्या भूमिकेला मतदारसंघातील मतदार सुद्धा पाठिंबा देणार नाहीत. त्यांना राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर पुन्हा होणाऱ्या निवडणुकांमध्ये तिन्ही पक्ष एकत्र येऊन त्यांचा पराभव करण्याची काळजी तिन्ही पक्ष घेतील.

पक्षांतील 56 आमदारांच्या सह्यांची यादी पक्षाकडे होती. मतदारसंघनिहाय आमदारांचे नाव त्यात होते. त्यातील दोन याद्या अजित पवार यांनी कार्यालयातून घेतल्या. त्या त्यांनी राज्यपालांना सादर केल्याची शक्यता आहे. या यादींमुळे 54 जणांचा पाठिंबा आहे की काय, अशी राज्यपालांना वाटले असेल. पण राज्यपालांचीही फसवणूक केल्याचे दिसत आहे.

भाजपला सदनामध्ये बहुमत स्पष्ट करता येणार नाही. ती संख्या त्यांच्याकडे नाही. त्यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही, याची खबरदारी आम्ही तिन्ही पक्ष घेऊ. कसलेही संकट आले तरी आम्ही संघर्ष करू. अजित पवारांवर कारवाईचा निर्णय घ्यावा लागेल, आणि तो घेतला जाईल. अजित पवार फुटून जातील असे मला वाटले नव्हते. पण अशा फाटाफुटीच्या राजकारणातून मी गेलेलो आहे. 1988 मध्ये असे अनेकजण सोडून गेले होते. त्या सगळ्यांचा नंतर पराभव झाला. सुप्रिया सुळेंना राज्यात मुख्यमंत्रीपदी नेमले जाणार असल्याच्या चर्चेत तथ्य नाही. सुप्रिया सुळेंनाही राज्यात स्वारस्य नाही.

उद्धव ठाकरे काय म्हणाले ?

शरद पवारांनी स्पष्ट शब्दांत सगळे सांगितले आहे. लोकशाहीच्या नावाखाली भाजपने खेळ मांडला आहे. भाजपचे हे नवहिंदूत्व आहे. लोकशाहीची नवी मूल्ये ते प्रस्थापित करीत आहेत. ईव्हीएमवरील घोळ कमी पडतो की काय अशी स्थिती आहे. शिवसेना उघडपणे राजकारण करते. पण भाजप माणसे फोडत आहे. मराठी मालिका रात्रीस खेळ चाले या प्रमाणे भाजप कारस्थाने करीत आहे. भाजपने हरियाणा, बिहारमध्ये सरकार फोडून सरकार स्थापन केले. पाठीत कुणी वार करू नये. पवार साहेब व आम्ही एकत्र आलो आहोत. पहाटे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक झाला होता का पहाटे मंत्रीमंडळाची बैठक घ्यायला ?.

काँग्रेस नेते खासदार अहमद पटेल (स्वतंत्र परिषदेत) काय म्हणाले ?

आजचा शपथविधी काळ्या शाईने लिहिला जाईल. राज्यपालांनी शिवसेनेला पुरेसा वेळ दिला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसलाही पुरेसा वेळ दिला नाही. काँग्रेसला तर संधी दिलीच नाही. एक नेता लिस्ट घेऊन जातो, राज्यपाल त्याची खातरजमा करीत नाहीत. कायदेशीर खातरजमा केली नाही. गुपचूप शपथविधी घेतला गेला. संविधान, लोकशाहीची मूल्ये जपणारी महाराष्ट्राची जनता आहे. बेशरमपणाचा कळस केला आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. लोकशाहीनुसार हे झाले नाही. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत आमची चर्चा झाली. उद्धव ठाकरेंची सोनिया गांधींसोबत चर्चा झाली. त्यानंतर आमच्या बैठका झाल्या. सगळ्या गोष्टी निश्चित झाल्या. एक – दोन मुद्दे चर्चेचे होते. त्यासाठी आज 12.30 वाजता आमची बैठक होणार होती. पण त्या अगोदरच कांड झाले. त्याबद्दल बोलण्यासाठी काहीच शब्द नाहीत. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. भाजप व त्यांना पाठिंबा देणाऱ्यांच्या विरोधात आम्ही मतदान करू. पवार साहेबांनी सांगितले आहे की, आज त्यांच्या आमदारांची बैठक होईल. त्यात नवा विधीमंडळ नेता निवडला जाईल. व्हिपसुद्धा जारी केला जाईल.

शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत आमदार राजेंद्र शिंगणे व संदिप क्षीरसागर हे सुद्धा उपस्थित होते. अजित पवारांनी कसे फसविले याची माहिती त्यांनी दिली.

डॉ. राजेंद्र शिंगणे : रात्री 12 वाजता मला फोन आला. मला धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर सकाळी 7 वाजता पोहोचायला सांगितले. त्यानुसार मी सकाळी 7 वाजता पोहोचलो. त्यावेळी तिथे 10 ते 11 आमदार होते. एका ठिकाणी जायचे असल्याचे आम्हाला सांगितले. तेथून आम्हाला राजभवनावर हॉलमध्ये नेण्यात आले. कुणाला काहीच माहित नव्हते. नंतर तिथे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील व काही भाजपचे नेते आले. त्यानंतर राज्यपालही आले. आम्हाला पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती. आम्ही अस्वस्थ होतो. तिथे धनंजय मुंडे मी, झिरवळ, संदिप क्षीरसागर इत्यादी आमदार होते. शपथविधी झाल्यानंतर मी तिथून पवार साहेबांकडे गेलो. आम्ही पवार साहेबांबरोबर आहोत.

संदिप क्षीरसागर : शिंगणे यांच्याप्रमाणेच मलाही अजितदादांनी फोन केला. राजभवनला जाईपर्यंत कळले नाही. पण बाहेर आल्यानंतर आम्ही शरद पवार साहेबांबरोबरच आहोत.

अजित पवारांबरोबर कोणते आमदार गेले होते ?

धनंजय मुंडे, दिलीप बनकर, नरहरी झिरवळ, माणिकराव कोकाटे, राजेंद्र शिंगणे, अनिल पाटील, संदीप क्षीरसागर, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे हे आमदार अजित पवार यांच्यासोबत शपथविधीसाठी गेले होते. त्यातील पाच जण परत आल्याचे सूत्रांनी सांगितले.

अजित पवार एकटे पडणार ?

अजित पवार यांनी काही आमदारांना आपल्यासोबत नेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यातील पाच आमदार परत शरद पवार यांच्याकडे आले आहेत. त्यामुळे अजित पवार एकटे पडतील असे चित्र दिसत आहे.

शरद पवारांचे भाऊ श्रीनिवास पवारांच्या घरात अजित पवार

शरद पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे मुंबईत नेपियन्सी रोड येथे घर आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर थेट या घेरी गेले होते. तेथे त्यांनी श्रीनिवास पवार यांच्यासोबत जेवण घेतले. तिथे बराच वेळ ते होते. त्यामुळे शरद पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांनी आपले बंधू शरद पवार यांच्यापेक्षा पुतण्या अजित पवाराला कौटुंबिक पाठिंबा दिला आहे की काय, असेही बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा

शिवरायांच्या महाराष्ट्रावर केंद्राचा सर्जिकल स्ट्राइक : उद्धव ठाकरे

आम्हीच सरकार स्थापन करू : शरद पवार

अजित पवारांनी 54 आमदारांच्या सह्यांचे पत्रही पळवले

अजित पवारांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला, रात्री 9 वाजल्यानंतर झाले होते गायब

भावनिक झालेल्या सुप्रिया सुळेंच्या तोंडून शब्दही फुटेना, अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा

काकाने पावसात कमविले, पुतण्याने रातोरात गमावले : सोशल मीडियावर फटकेबाजी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी